Close
 • Gha Gharacha

डायनिंग एरिया

हल्ली खूप कमी लोकांकडे स्वतंत्र अशी डायनिंग रूम असते. फ्लॅटमधील इंच इंच वापरताना ओपन किचन आणि लिविंग रूमच्यामध्ये डायनिंग एरिया दिलेला असतो. ओपेन किचन आणि लिविंग रूम ह्या दोघांना जोडणारा हा भाग असल्याने यामध्ये दोन्ही भागातल्या डेकोअरला साजेल अश्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आज आपण बोलणार आहोत डायनिंग एरियाबद्दल :

१. डायनिंग टेबल :
डायनिंग टेबलने सगळ्यात जास्त भाग व्यापलेला असतो. डायनिंग टेबल किती माणसांसाठीचं आणि कोणत्या आकाराचं असावं हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. अवास्तव मोठ्या आकाराच्या डायनिंग टेबलने संपूर्ण घराचा चेहरा मोहरा बदलून जातो. घरात किती जागा उबलब्ध आहे, घरात किती माणसं राहतात (आणि घरी पाहुण्यांची आवक जावक जास्त असेल आणि सतत घरी पाहुणे पंगतीला असतील तर ह्याही गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं) ह्यावर साधारणपणे किती सीटर डायनिंग टेबल घ्यावा हे ठरवावं लागतं. डायनिंग टेबलचे टॉप सर्वसाधारणपणे तीन
प्रकारात बघायला मिळतात. १. काचेचा टॉप, २. लाकडी टॉप, ३. टाइल्स टॉप. परंतु, डायनिंग टेबलचा बेस आणि खुर्च्या मात्र सर्वसाधारणपणे लाकडी किंवा रॉट आयर्न अश्या प्रकारात बघायला मिळतात.
बऱ्याचदा असं होतं की डायनिंग टेबलची एखादी बाजू भिंतीला टेकून असते आणि तिथे रोज कोणीही बसत नसल्याने त्या भागात खूप धूळ साठून राहते किंवा एखाद्या वेळी टेबलचा एखादाच भाग रोज वापरला जात असल्याने तेवढाच भाग आपोआप स्वच्छ होतो. त्यामुळे, डायनिंग टेबल स्वच्छ करताना सगळ्या खुर्च्या बाजूला करून, जर टेबलला खालच्या बाजूला कप्पा असेल तर त्यावरचं सगळं समान, टेबलावर ठेवलेलं सगळं समान बाजूला काढून ठेवावं आणि मगच स्वच्छता करावी.
काचेचा किंवा टाइल्स टॉप पुसण्यासाठी ग्लास क्लीनरचा वापर करावा. जर लाकडी टेबल असेल तर फार केमिकल किंवा क्लीनर्स वापरू नयेत. त्यामुळे लाकूड, त्यावरचं पॉलिश खराब होतं. कोरड्या नॅप्कीनने फक्त धूळ पुसून घावी आणि गरज असल्यास थोडसं पाणी मारून पासून घ्यावं किंवा थोड्याश्या ओल्या फडक्याने पुसून घ्यावं. हा डायनिंग एरिया असल्याने शक्य असेल तेव्हा डीसइन्फेक्टन्टने पुसून घ्यावा. हे सर्व पुसताना कोणत्या प्रकारचे किंवा पोताचे नॅप्कीन वापरावेत ह्याबद्दल मी “नॅप्कीनचे प्रकार ” ह्या ब्लॉगमध्ये माहिती लिहिलेली आहे त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. त्याची लिंक सोबत जोडत आहे.

नॅप्कीनचे प्रकार

काही डाग आणि ते काढण्याच्या पद्धती यांची एक यादी तयार केली आहे त्याची लिंक लेखाच्या शेवटी दिलेली आहे.

रोज रात्रीच्या जेवणानंतरची आवराआवरी करताना आपण डायनिंग टेबल (टेबल टॉप) पुसून घेतोच परंतु, त्याखालचा टेबल किंवा खुर्च्या रोज पुसल्या जात नाहीत. टेबलाच्या खालच्या बाजूला खूप धूळ साठलेली असल्याने ती धूळ कोरड्या नॅप्कीनने झटकून घ्यावी आणि नंतर टेबल पुसून घ्यावा. मी वर म्हणल्याप्रमाणे, जर लाकडी टेबल असेल तर खूप क्लीनर्स किंवा केमिकलचा वापर न करता पुसून घ्यावं आणि गरज असल्यास थोडसं पाणी मारून पासून घ्यावं किंवा थोड्याश्या ओल्या फडक्याने पुसून घ्यावं. खुर्च्यांसुद्धा अश्याच प्रकारे स्वच्छ कराव्यात. काहीवेळा खुर्च्यांच्या पाठीला नक्षीकाम केलेलं असतं त्यामुळे त्यात बरीच धूळ अडकून बसलेली असते. जर ती धूळ निघत नसेल तर टूथब्रशने (कोरड्या) स्वच्छ करावी. खुर्च्यांच्या कुशनसाठी जाड कापड किंवा सॉफ्ट लेदर वापरलं जातं. कुशन सुटे निघत असतील तर ते घरच्या घरी धुता येतात मात्र जर ते निघत नसतील तर क्लीनर्सना बोलवावे लागते. हल्ली‘होम डीप क्लिनिंग’ करणाऱ्या खूप कंपन्या आपली सर्व्हिस देण्यासाठी उत्सुक असतात. अश्या प्रकारच्या खुर्च्या हे लोक उत्तम पद्धतीने स्वच्छ करतात. काही जण, कुशन खराब होऊ नये म्हणून जेवायला बसताना त्यावर नॅप्कीन ठेवून बसतात म्हणजे कुशन्स लवकर खराब होत नाहीत.

२. टेबल मॅट्स आणि टी-कोस्टर्स :
टेबल मॅट्स वेगवेगळ्या प्रकारात आणि डिझाईनमध्ये उपलब्ध असतात. कपड्याच्या, क्रोशाच्या कागदाच्या (एकदा वापरून टाकून देता येतील अश्या) कागद/कापड लॅमिनेट करून तयार केलेल्या, वेताच्या, लाकडाच्या, प्लास्टिकच्या अश्या नानाविध प्रकारात उपलब्ध असतात. जेवणानंतरच्या आवराआवरीमध्ये आपण ह्या टेबल मॅट्स झटकून, पुसून घेतो पण ते वरवरचं असतं असं मला वाटतं. जर ह्या टेबल मॅट्स कापडाच्या असतील तर दर आठवड्याला स्वच्छ धुवाव्यात. जर प्लास्टिकच्या असतील तर क्लीनरने स्वच्छ कराव्यात शक्य असल्यास डिश लिक्विडने स्वच्छ कराव्यात. सतत स्वच्छ केल्याने ह्या टेबल मॅट्स लवकर खराब होतात, त्याचा रंग उडून जातो त्यामुळे खराब झालेल्या टेबल मॅट्स ताबडतोब टाकून द्याव्यात. जी गत टेबल मॅट्सची तीच टी-कोस्टर्सची. बरेच जण टी-कोस्टर्स वापरतात पण ते स्वच्छ करत नाहीत. त्यावर कपचे डाग/ व्रण तसेच असतात. चहा कॉफीचे डाग एकदा वाळले की काढायला कठीण जातं
आणि ते तसेच ठेवले तर पुढच्या वेळी इतरांना ते कोस्टर्स वापरताना अस्वच्छ वाटतं. त्यामुळे चहाचे कप घासताना सोबत कोस्टर्ससुद्धा रोज स्वच्छ करावेत.
वेगवेगळ्या समारंभासाठी, घरी पाहुणे येणार असतील तेव्हा वापरण्यासाठी म्हणून आपण काही वेगळे टेबल मॅट्स आणि टी-कोस्टर्स आणून ठेवलेले असतात. ह्या सर्व गोष्टी डायनिंग टेबलच्या आसपासच्या कपाटातच ठेवाव्यात, जेणेकरून आपल्याला शोधात बसावं लागणार नाही. हे ठेवणीतले टेबल मॅट्स आणि टी-कोस्टर्ससुद्धा स्वच्छ करून ठेवावेत. खूप दिवस वापरले गेले नसतील तर ते एकमेकांना चिकटून बसतात आणि खराब होतात. त्यामुळे वार्षिक स्वच्छता करताना हे सगळे बाहेर काढून, त्यातले खराब झालेले, न लागणारे, न वापरणारे टाकून द्यायचे आणि उरलेले सगळे स्वच्छ करून मगच जागच्या जागी ठेवायचे.

३. ट्रे :
आपण सर्व्हिंगसाठी ट्रे वापरत असल्याने ते फारसे किंवा पटकन खराब होत नाहीत. पण ह्यावर पटकन धूळ जमा होते. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या आकाराचे ट्रे असतात. मी सर्व साधारणपणे ४-६ वेगवेगळ्या आकाराचे ट्रे घरात ठेवते :

 • दोन जणांसाठी पाण्याचे ग्लास नेता येतील असे ट्रे
 • सहा- आठ जणांसाठी पाण्याचे ग्लास नेता येतील असे ट्रे (ह्याच ट्रे मध्ये चार जणांसाठी चहाचे कप आणि बश्या मावू शकतात)
 • दोन जणांसाठी छोट्या डिश नेता येतील असे ट्रे (ह्याच ट्रे मध्ये दोन जणांसाठी चहाचे कप आणि बश्या मावू शकतात)
 • सहा जणांसाठी चहाचे कप आणि बश्या मावू शकतील किंवा छोट्या डिश मावू शकतील असे ट्रे

ह्यापेक्षा जास्त पाहुणे एकावेळी आले तर जास्त वेळा फेऱ्या मारते 😉 कधीतरी १२ माणसं येतील म्हणून खूप मोठे ट्रे घरात सांभाळून ठेवायचे आणि त्याने घरातली जागा अडवून ठेवायची हे मला फारसं पटत नाही.

४. क्रोकरी :
आपल्याकडे हौसेने जमा केलेल्या खूप वस्तू असतात आणि त्यात क्रोकरीचा नंबर पहिला असतो. वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळे पदार्थ वाढण्यासाठी, वेगवेगळ्या रंगाची खूप भांडी असतात. आपण वापरत असो अथवा नसो, पण अशी भांडी स्वयंपाकघरातून काढून टाकणं आपल्याला जड जातं. आपण एकावेळी किती माणसांना घरी जेवायला बोलावतो किंवा किती माणसांचा स्वयंपाक करतो ह्यावर घरतल्या क्रोकरीची संख्या ठरवावी लागते. सर्व साधारणपणे १५-२० माणसांना जेवायला बोलावत असू असं गृहीत धरलं तर प्रत्येका गोष्टीचे दोन डझनाचे सेट घरात ठेवायला हरकत नाही :

 • पाण्याचे ग्लास
 • छोट्या प्लेट्स (क्वाटर प्लेट्स)
 • मोठ्या प्लेट्स (मिल प्लेट्स)
 • चमचे (सूप स्पून्स, टेबल स्पून्स, डेझर्ट स्पून्स, फोर्क )
 • छोटे बोल
 • सूप बोल
 • चटण्या/ कोशिंबिरी वाढण्यासाठी छोट्या आकाराचे बोल्स
 • भाजी, भात, आमटी वाढण्यासाठी मध्यम आकाराचे बोल्स
 • डेझर्ट बोल्स
 • कप आणि बश्या
 • कॉफी मग
 • इतर गोष्टी

आपण वस्तू कितीही व्यवस्थित झाकून ठेवल्या तरी त्यावर धूळ बसतेच. त्यामुळे ही सगळी क्रोकरी एकदा बाहेर काढून निदान त्यावरची सगळी धूळ कोरड्या फडक्याने स्वच्छ करावी (शक्य असल्यास सगळी कोकरी स्वच्छ घासून पुसून मगच आत ठेवावी). क्रोकरी स्वच्छ करताना आपल्याला जाणवेल की खूपसाऱ्या न लागणाऱ्या, न वापरणाऱ्या, तुटलेल्या, खराब झालेल्या वस्तू आपण जपून ठेवलेल्या आहेत. त्या सगळ्या काढून टाकाव्यात. खूप दिवस कप मायक्रोव्हेवमध्ये वापरल्याने आतल्या बाजूने काळे पडायला लागतात, त्यावरची प्रिंट खराब होते त्यामुळे खराब
झालेले आणि ह्यापुढे न लागणारे कप बश्या तत्काळ काढून टाकाव्यात.

५. लॅम्प / शोपिस :
बऱ्याचदा डायनिंग टेबलच्या बरोबर मध्यात वरच्या बाजूला एक हँगिंग लॅम्प असतो आणि तो खूप दिवस स्वच्छ केलेला नसतो. बऱ्याचदा हे लॅम्प नाजूक असतात त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक स्वच्छ करावे लागतात. काही ठिकाणी शोपिस लावलेले असतात किंवा एखादी फ्रेम लावलेली असते. अश्या सगळ्या गोष्टींवर खूप धूळ जमा होते आणि शोपिस मधला “शो” निघून जातो आणि तिथे नुसताच “पिस” उरतो. त्यामुळे असे सगळे लॅम्प / शोपिस यांची काळजीपूर्वक स्वच्छता करावी.

६. जेवायला वाढून घेताना लागणाऱ्या बहुतांश गोष्टी आपण टेबलावर किंवा टेबलाजवळ ठेवतो. टेबलावर ठेवल्या तर टेबल भरून गेल्यासारखं वाटतं आणि जेवायची पानं वाढायला जागा राहत नाही.त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक ट्रे तयार केला तर ते जास्त सोपं जातं आणि जेवायला वाढून घेताना काही विसरत नाही. ट्रे केल्यामुळे गोष्टी हलवणं पण
सोपं जातं.

टेबलावर किंवा टेबलाजवळ ठेवायच्या वस्तू
पाण्याचा जग/तांब्या आणि ग्लास
कोस्टर
तुपाचं छोटं भांडं
चटण्या / लोणचं, मीठ
चमच्याचं स्टॅन्ड
टेबल मॅट

हौसेने जमा केलेल्या वस्तू काढून टाकणं खूप जीवावर येतं. पण मी मागे म्हणलं तसं, १. आता आपण त्या वस्तूचा वापर करत आहोत का ? २. आता त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज आहे का? ३. आता ती वस्तू ठेवायला आपल्याकडे जागा आहे का ? ४. आता ती वस्तू आपल्याला खरंच आवडते का? किंवा सोईची आहे का? ५. आता आपल्या जीवनशैलीत ती वस्तू योग्य प्रकारे बसते का ? ह्या गोष्टींचा नक्की विचार करा आणि न लागणाऱ्या जास्तीत जास्त वस्तू काढून टाकायचा प्रयत्न करा. ह्यामुळे घरातले काही कप्पे नक्कीच रिकामे होतील. जुन्या झालेल्या, वापरून खराब झालेल्या, रंग उडालेल्या, तुटलेल्या टेबल मॅट्स / टी-कोस्टर्स, टिकटणं, ट्रे, टेबल क्लॉथ, जादाचं चमचा स्टॅन्ड, तुटलेली, तडा गेलेली, न लागणारी क्रोकरी काढून टाका.

डायनिंग एरियाच्या स्वच्छतेबाबतचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. पुन्हा भेटू पुढच्या सदरात…!!!

 

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!