Close
  • Gha Gharacha

डिजिटल डीक्लटरिंग

मला माझ्या बाबांचं (खरंतर ह्या पिढीचंच) एका गोष्टीसाठी खूप कौतुक वाटतं. लहान असताना, स्वतः जाऊन एकमेकांना निरोप पोचवणारी ही लोकं, हळूहळू पत्रं लिहायला लागले. मग टेलिफोन, पेजर वापरायला लागले. त्यानंतर याहू किंवा गुगलवर अकाऊंट उघडून हळूहळू ईमेल वापरायला लागले. मग खूप महागडे ठोकळ्यासारखे, इनकमिंगलाही पैसे मोजावे लागतील असे मोबाईल फोन्स आले आणि लगोलग स्मार्ट फोन्स आले, तेही वापरले. मुलं परदेशात स्थायिक व्हायला लागली त्यामुळे व्हिडीओ कॉल करायला लागले आणि आता लोकांशी संपर्कात राहता यावं म्हणून व्हाट्सअप, फेसबुकसुद्धा वापरायला लागले. व्हीसीआर ते नेटफ्लिक्स हा बदल एका दमात पचवणारी ही मंडळी खरोखरच ग्रेट आहेत. माणूस कोणतेही बदल फार पटकन अॅक्सेप्ट करत नाही. परंतु, ह्यांनी मात्र कधी मोठ्यांसाठी कधी लहानांसाठी म्हणून सगळे बदल आवडीने आत्मसाथ केले. घराची स्वच्छता करतानासुद्धा काळानुरूप होणारे हे बदल लक्षात घेऊन त्यानुसार घरातल्या स्वच्छता मोहिमेत ‘डिजिटल क्लटरिंग’ आणि ‘डिजिटल साफसफाई’ ह्या गोष्टींचा समावेश व्हायला हवा असं मला वाटतं.
 
काही वर्षांपूर्वी मी माझ्या लॅपटॉपवरचा ड्राफ्ट तपासून घेण्यासाठी म्हणून आमच्या सरांकडे गेले होते. ड्राफ्ट तपासण्यापूर्वी मी त्यांचे बोलणे खाल्ले आणि त्याचं कारण होतं, ‘आयकॉन्सनी खचाखच भरलेली होमस्क्रीन’. होम्स्क्रीनवरची जत्रा आधी काढून टाक आणि मग मला ड्राफ्ट दाखव असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हापासून मी सर्व होमस्क्रीन जास्तीत जास्त रिकाम्या ठेवते.
खरंतर ह्यामुळे आपल्याला गोष्टी सापडायला मदत होते.
 
हल्ली मोबाईलमध्ये, ‘गरज लागली की करा डाऊनलोड’ अशी सोय असल्याने उपयोगी अॅप्ससोबत काही अनावश्यक अॅप्सपण सेव्ह होतात. कधीतरी एकदा लागलं होतं म्हणून एखादं अॅप मोबाईलमध्ये ठेवून जागा अडकवण्यात काहीच अर्थ नाही. त्याने अॅप्सची गर्दी होते. गरजेच्या वेळी लागणारे अॅप्स शोधायला खूप वेळ जातो. मोबाईलमधली जागा (स्टोअरेज स्पेस) अनाठायी अडकून राहते आणि मोबाईल स्लो व्हायला लागतो. त्यामुळे न लागणारी सगळी अॅप्स तत्काळ डिलीट करावीत. एकाच कामासाठी दोन दोन अॅप्स साठवून ठेवण्याची गरज नसते (म्हणजे ट्रेनचे टाइम टेबल बघायचे असेल तर एकच अॅप पुरते दोन वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी अॅप डाऊनलोड करण्याची गरज नसते.) रोज लागणारे अॅप्स आपण अर्थातच पहिल्या स्क्रीनवर आणि कधीतरी लागणारे अॅप्स पुढच्या पानांवर/स्क्रीनवर ठेवतो. माझ्या नवऱ्याने, मोबाईलमध्ये असणारे अॅप्स त्यांच्या गरजेनुसार/ वापरानुसार वेगवेगळ्या फोल्डरमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे एक सोशल मिडिया फोल्डर ज्यात फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम असे सगळे अॅप्स आहेत. एक मेसेजिंग फोल्डर, एक ट्रॅव्हल फोल्डर ज्यात मॅप्स, तिकट बुकिंग अश्या संदर्भातील सगळे अॅप्स आहेत. ह्यामुळे खूप कमी प्रमाणत शोधाशोध करावी लागते.
 
मोबाईलमध्ये असणारे व्हीडीओ सगळ्यात जास्त जागा खातात. त्यामुळे खरंच गरजेचे असतील आणि जे सतत लागणार असतील असेच व्हीडीओ मोबाईलमध्ये ठेवावेत. जर रेफरन्स व्हिडीओ असेल आणि तो ऑनलाईन उपलब्ध असेल तर असे व्हिडीओ सेव्ह करून जागा वाया घालवण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. त्यासोबतच फोनमध्ये असणारे आणि न लागणारे फोटो, ज्यांचा बॅकअप घेऊन ठेवलेला आहे, असे फोटो डिलीट करून टाका. ‘एका रोलमध्ये फक्त ३६ फोटो’ अशी काटकसर नसल्याने आपण एकाच क्षणाचे भरमसाठ फोटो काढतो. त्यामुळे त्यातले काही फोटो डुप्लिकेट होतात, काही फोटो ब्लर झालेले असतात. असे सगळे अनावश्यक फोटो आपण नक्कीच डिलीट करू शकतो. न लागणारे फोटो, मेसेजेस ह्यांनी फक्त जागेची अडचण वाढत राहते. बॅकअप घेतला की तत्काळ मेसेजेस, फोटो, व्हिडीओ डिलीट करून टाकावे. इतर स्वछातेसारखं हेसुद्धा दर महिन्याला एक दिवस ठरवून ही साफसफाई करणं गरजेचं आहे. फोन बंद पडेपर्यंत वाट न बघता वेळच्या वेळी त्यातली नको असलेली माहिती काढून टाकल्याने फोनमध्ये जागा योग्य प्रकारे वापरता येते. नाहीतर १२५ जीबीचा फोन घेतला तरीही अपूराच पडेल.
 
हल्ली सणवार म्हणलं की आपलं इनबॉक्स खचाखच भरतो. हे आलेले शुभेच्छांचे मेसेज वेळच्यावेळी डिलीट करायला हवेत. बऱ्याच दुकानाच्या आणि इतर सर्विसेसचे खूप सारे मेसेजेस आणि इमेल्स येत असतात. ते इमेल्स ज्या त्या वेळी डिलीट करावेत. शक्य असल्यास अश्या इमेल्सला अनसबस्क्राइब करा. जंक डिलीट करा. सोशल मीडियावरसुद्धा आपण ज्या ज्या पेजला लाईक करतो त्यांचे नोटिफिकेशन्स/अपडेट्स आपल्याला येत राहतात. एक वेळ अशी येते की नोटिफिकेशन्सनीच फोन भरून जातो. जर आपण एखाद्या ब्रँड मध्ये इंटरेस्टेड नसू तर तात्काळ अनसबस्क्राइब करा. इमेल्सच कमी आले तर ते वर्गीकरण करणं आणि पर्यायाने डिलीट करणं सोपं जाईल आणि बराच वेळ वाचू शकेल. आपल्या डिजिटल स्टोअरेजसाठी उत्तम बॅकअप सोल्यूशन शोधणं ही आत्ताची गरज आहे. त्यामुळे आपल्याला जे योग्य वाटेल, सोईचं वाटेल त्याची निवड करून त्यात सगळं डेटा स्टोअर करून ठेवा.
 
बदलत्या काळासोबत आपणही बदलत असतो, आपल्या नकळत. बाजारात नविन मोबाईल आला की आपण आवर्जून जातो आणि घेऊन येतो. मात्र तितक्याच काळजीपूर्वक पद्धतीने घरतल्या जुन्या मोबाईलची विल्हेवाट लावली पाहिजे. घरामध्ये असणारी उपकरणं, त्यांच्या वायर्स, चार्जर्स हे व्यवस्थित एका ठिकाणी लावून ठेवावेत. त्याबद्दलचे नियोजन हे एक स्वतंत्र विषय आहे त्यामुळे त्याबद्दल पुन्हा केव्हातरी बोलू.
 
माझा नवरा दर आठवड्याला मोबाईलस्क्रीन आणि मोबाईल कव्हर स्वच्छ करतो. मोबाईल आणि कव्हरच्या खाचेत बरीच धूळ अडकून राहते त्यामुळे मोबाईल आणि त्याचे कव्हर दोन्ही स्वच्छ पुसून घ्यावेत. मोबाईल स्वच्छ करण्यापूर्वी तो स्वीच ऑफ करा. आपण स्क्रीनवर सतत बोट लावत असतो त्यामुळे स्क्रीन फार पटकन खराब होते. त्यासाठी ऑप्टिकल क्लॉथ घ्या (म्हणजे दुकानातून चष्मा विकत घेतना जो सोबत देतात तो. हल्ली काही कंपन्या मोबाईलच्या बॉक्समध्येही अश्या प्रकारचा छोटासा क्लॉथ द्यायला लागल्या आहेत. जर अगदीच आपल्याकडे ऑप्टिकल क्लॉथ नसेल तर जाड टिशू पेपर घ्या) त्यावर थोडंसच पाणी स्प्रे करा आणि डाव्या कोपऱ्यापासून इंग्रजी ‘s’ अक्षराप्रमाणे स्क्रीन पुसायला सुरुवात करा. इंग्रजी ‘s’ प्रमाणे पुसून घेतल्यास स्क्रीन उत्तमप्रकारे स्वच्छ होते आणि फराटे दिसत नाहीत. चुकून एखाद्यावेळी एखादा डाग पडलेला असेल आणि तो निघत नसेल तर गोलगोल फिरवून तेवढाच भाग आधी स्वच्छ करून नंतर संपूर्ण स्क्रीन पुसून घ्या. (पाणी किंवा कोणत्याही प्रकारचं लिक्विड मोबाईल स्क्रीनवर स्प्रे करू नये, त्याने उपकरण खराब होण्याची शक्याता असते.) मोबाईलस्क्रीन स्वच्छ करताना कोणत्याही प्रकारचे क्लीनर वापरायची गरज नसते. सध्या पाण्यानेसुद्धा स्क्रीन उत्तम प्रकारे स्वच्छ होते. हीच प्रोसेस, टॅबलेट, लॅपटॉप स्क्रीन ह्या सगळ्यासाठी वापरू शकता.
 
आज इतेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या सदरात.. लवकरच..!!!

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!