Close

डीक्लटर आणि मिनीमलीजम

  • Gha Gharacha

लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बरेच बदल घडत असतात. माझ्या लग्नानंतर, नवऱ्यामुळे, मला काही चांगल्या सवाई लागल्या, माझ्या विचारसरणीत काही बदल झाले आणि त्यातला अत्यंत महत्वाचा बदल म्हणजे ‘मिनीमलीजम’. मी अत्यंत शॉपोहोलिक होते (आणि थोड्याफार प्रमाणात अजूनही आहे 😉 ) पण नवऱ्यासोबत शॉपिंगला गेलं की तो कायम मला म्हणतो “अमुक एक वस्तू घरासाठी घेणार असशील तर, त्या ऐवजी घरातली कोणती जुनी वस्तू टाकून देणार? आणि ही वस्तू घरात कुठे ठेवणार ?” मला पूर्वी भयंकर राग यायचा. मी इतक्या उत्साहात काहीतरी छान वस्तू घेऊया म्हणते आणि ह्याचं काहीतरी निराळंच चालू असतं. पण ४-५ महिन्यांनी आम्ही घर आवरलं तेव्हा मला त्याचा प्रत्येक प्रश्न क्षणाक्षणाला आठवत होता. घरात निर्माण होणारी अडगळ एका रात्रीत जमा होत नाही आणि ती अडगळ मुळात खरेदीमुळे तयार होण्याआधी आपल्या “विचारसरणी” मुळे तयार होते. कधीतरी लागेल अश्या आशेने आपण अनावश्यक गोष्टींचं मोठं दुकान आपल्या घरात मांडून ठेवतो.

खूप लोकांचा गैरसमज असतो की मिनीमलीजम म्हणजे कमी गोष्टी विकत घेणं, कमी वस्तूंमध्ये संसार करणं म्हणजे अगदी प्रसंगी आपल्या गरजा मारूनसुद्धा. पण मिनीमलीजम म्हणजे आपल्या गरजा ओळखून अनावश्यक सामनापासून स्वतःची सुटका करून घेणं आहे असं मला वाटतं. अनावश्यक वस्तू खरेदी करणं, त्याची घरात अडगळ तयार होणं, घरातल्या वाढत चालेल्या पसाऱ्याचा त्रास होणं, त्याची स्वच्छता करता न येणं, केवळ खूप पैसे खर्च करून वस्तू विकत घेतली आहे ह्या गिल्टमुळे ती वस्तू घरात ठेवणं आणि सरतेशेवटी, कसंतरी करत पसारा/अडगळ काढून टाकणं हे एक खूप मोठं दुष्टचक्र आहे. दैनंदिन आयुष्यातला समतोल राखण्यासाठी बदलती परिस्थिती आत्मसाथ करणं म्हणजे डीक्लटर असं मला वाटतं. काळापरत्वे आणि वयोमानापरत्वे आपल्या गरजा, आवडीनिवडी बदलत जातात. आपल्या आयुष्यात, राहणीमानात, विचारसरणीत होत असणारे बदल आपल्याला ओळखता यायला हवे. “आता मी अश्या प्रकारची मोठी गळ्यातली वापरत नाही किंवा आता मला ह्या साईजचे कपडे बसत नाहीत” हे स्वतःच्या लक्षात येणं आणि त्यानुसार त्याची वेळच्यावेळी विल्हेवाट लावणं गरजेचं आहे.

एखादी हौसेने विकत आणलेली गोष्ट कधी अडगळ होते आपल्याला कळतही नाही. डीक्लटर आणि मिनीमलीजम हा विचारसरणीतला आणि लाईफस्टाईलमधला बदल आहे. एका दिवसात पसारा काढून अडगळ दूर करणं हे क्रॅशकोर्स करून आठवड्याभरात बारीक होण्याईतकच तात्पुरतं आहे असं मला वाटतं. आपण जसं बारीक होण्यापेक्षा फिट राहण्याला महत्व देतो हेदेखील तसंच काहीसं आहे. काळापरत्वे आणि वयोमानापरत्वे आपल्या गरजा, आवडीनिवडी बदलत असल्याने डीक्लटर हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. आपल्या आयुष्यात, राहिमानात, विचारसरणीत होत असणारे बदल आत्मसात करणं ही एकदाच करायची गोष्ट असू शकत नाही. जुने कपडे खराब होत राहणार, आपण नविन कपडे घेत राहणार, जुन्या कपड्यांची विल्हेवाट लावावी लागणार असं हे सतत चालू राहणारं रहाटगाडगं आहे.

घरातल्या अडगळीची आवरावरी करताना ३ मुख्य गोष्टी असतात
– भावनिक गुंतागुंत
– वेळेचे नियोजन
– वस्तूंचे नियोजन

भावनिक गुंतागुंत:

अडगळ काढून टाकताना प्रत्येकजण सुरुवातीला वैतागलेला, कंटाळलेला, निराश, हताश झालेला असतो. केवढा हा पसारा ह्याचं मनावर नकळतपणे दडपण यायला सुरुवात होते. हजार रुपये देऊन विकत घेतलेली वस्तू आपण एकदाही वापरली नाही हे जाणवू लागल्याने मनातलं गिल्ट वाढायला लागतं. घरात मला कोणीच मदत करत नाही, हे काय माझ्या एकटीच काम आहे का? मी एकटीच का करू हे सगळं ? ह्या गोष्टींनी मनातली निगेटीव्हीटी वाढत जाते. पसारा आवरण्यापेक्षा जास्त त्रास “हा पसारा मी एकटीनेच का आवरायचा ?” ह्याचा होतो आणि आपल्या अपेक्षांचं आपल्यालाच ओझं व्हायला लागतं. त्यामुळे डीक्लटर करताना निरुत्साही, कंटाळवाण्या मूडने सुरुवात करू नये. आपल्याला हे काम करायचं आहे याचं ओझं मनावर येत असेल तर त्या कामाचा आपण आनंद घेऊ शकत नाही. एखादी वस्तू टाकून द्यायची का नाही ? द्यायची असेल तर त्याची विल्हेवाट कशी लावायची? ह्यासाठी आपण सर्वांगाने विचार करतो त्यामुळे, मी वर म्हणल्याप्रमाणे डीक्लटर हे काम जेवढं शारीरिक कष्टाचं आहे तेवढंच वैचारिक, बौद्धिक आणि मानसिक ताण निर्माण करणांर आहे. त्यामुळे उत्साही वातावरणात रोज थोडा वेळ ठरवून जर हे काम केलं तर ते जास्त योग्य पद्धतीने आणि कमी त्रासाचं होऊ शकतं.

वेळेचे नियोजन:

लहानपणी आपण परीक्षा जवळ आली की एक भयंकर अवाजवी टाइम टेबल तयार करायचो. एका दिवसात अख्खा विषय संपवू असं काहीतरी त्यात ठरवलेलं असायचं आणि अभ्यासाला बसल्यावर कसाबसा ३-४ धड्यांचा अभ्यास व्हायचा. तसंच काहीसं अडगळ आवरताना होतं. आज आपण पूर्ण घर आवरूनच टाकायचं म्हणून आरंभशूर होतो, दुपार व्हायला लागली की आपल्यातला उत्साह मावळतो आणि मग अजूनही काहीच आवरल्यासारखं वाटत नाही म्हणून वैताग येतो आणि चिडचिड होते. आवराआवरीमध्ये वेळेच्या नियोजनाला खूप महत्व आहे. सगळं काम एकत्र न करता आपल्याला उपलब्ध असणारा वेळ समान भागात विभागून रोज थोडं थोडं काम केलं तर त्याचं ओझं होत नाहीत.

वस्तूंचे नियोजन:

प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, त्यांच्या प्रायोरिटीज, घरात उपलब्ध असणारी जागा, घरातील मंडळी आणि त्यांच्या सवई ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे डीक्लटरिंगसाठी गणितासारखा २+२ = ४ असा समान मापदंड प्रत्येकाला लावता येत नाही. मला असं वाटतं खालील गोष्टींची उत्तरं ‘फक्त वर्तमानकाळापुरती’ नकारार्थी आली तर ती वस्तू/गोष्ट अडगळ म्हणून घोषित करायला हरकत नसावी.

  • वापर
  • गरज
  • जागा
  • इच्छा/आवड
  • लाईफस्टाईल

– ती गोष्ट आपण आत्ता वापरणार आहोत का ? जर ती आत्ता वापरणार नसू तर पुढेही वापरण्याची शक्यता कमी असते. पुढे कधीतरी वापरू ह्या आशेवर घरतल्या वस्तू वाढवत राहाणं अयोग्य आहे. मी थोड्या दिवसांत बारीक होईन आणि मग हे कपडे वापरू शकेन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

– ती गोष्ट आत्ता आपल्याला गरजेची आहे का? कधीकधी काही विषेश कारणांसाठी आपण खरेदी करतो म्हणजे व्यायाम करायचं म्हणून घरी ट्रेडमिल/सायकल आणतो पण त्याचा वापर कपडे वाळतघालण्यासाठी होत असेल तर त्या वस्तूची गरज संपलेली असते. किंवा पाहुणे येणार आहेत म्हणून त्यावेळी एखादी गोष्ट आणतो पण आता त्याचा उपयोग जर संपला असेल तर वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्यास हरकत नसते.

– ती गोष्ट ठेवण्यासाठी घरात जागा आहे आहे का? ती गोष्ट घरात ठेवल्याने जागा अडून राहील का ?

– एखादी गोष्ट आपण घेतो तेव्हा ती आपल्याला आवडते पण नंतर ती गोष्ट तितकीशी आवडत नाही. मग अश्या वस्तू वेळच्या वेळी काढून टाकाव्यात.

– पूर्वी मी अमुक एक प्रकारचे कपडे वापरायचे आता मी तसे कपडे वापरत नाही किंवा पूर्वी अमुक एका पद्धतीची ज्वेलरी वापरायचे आता ती वापरत नाही असे छोटे छोटे बदल आपल्या नकळत आपल्या आयुष्यात होत असतात. त्याची नोंद घेऊन अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्या लागतात.

आवराआवर करताना:


१. मी, पसारा आवरताना कायम उभं राहून काम करते. एकदा खाली बसलं की मग उठायचा कंटाळा येतो आणि “उठल्यावर हे ठेवू” असं म्हणून पसारा आहे तसाच राहतो. त्या ऐवजी टेबलवर किंवा दिवाणावर जर पसारा ठेऊन आवरलं तर ते पटपट होतं असा माझा अनुभव आहे.

२. पसारा आवरताना तीन मुख्य पायऱ्यांचा वापर करते.

  • वर्गीकरण करायचं : समोर आलेल्या वस्तूंचे किंवा गोष्टींचे त्याच्या वापरानुसार (किंवा इतर कोणत्याही आधारे) वर्गीकरण करायचं. म्हणजे आपण कपाट आवरत असू तर कुर्ते, साड्या, शर्ट अश्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे गठ्ठे करायचे.
  • अडगळ काढून टाकायची:वर्गीकरण झाल्यानंतर त्यातल्या प्रत्येका गठ्यातील न वापरल्या जाणाऱ्या वस्तू किंवा न लागणाऱ्या वस्तू बाजूला काढून टाकायच्या म्हणजे वरील कपाटाच्या आवराआवरीचं उदाहरण द्यायचं झालं तर १. पुन्हा वापरणारे कपडे, २. यापुढे न वापरणारे कपडे आणि ३. कदाचित वापरेन, घालून बघावे लागतील, अश्या तीन पद्धतीत वर्गीकरण करायचं.
  • व्यवस्थित आवरून ठेवायचं: आता ज्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत किंवा लागणार आहेत त्या वस्तू व्यवस्थित लावून ठेवायच्या.

३. अडगळ काढून टाकायची म्हणजे सगळंच रद्दी किंवा भंगारमध्ये टाकायचं असं नाही. आपल्याला गरजेची नसणारी वस्तू एखाद्याला गरजेची वाटू शकते त्यामुळे अडगळ काढून टाकणं जसं महत्वाचं आहे तसच त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. आपल्या घरातील वस्तू आपण :

  • दुसऱ्या कारणासाठी पुनर्वापर वापरू शकतो. ( म्हणजे घरातील काचेची डिश जुनी झाली/ खराब झाली तर मी ती कलर पॅलेट म्हणून वापरते. )
  • विकू शकतो ( हल्ली रिसेलचं जमाना आहे. आपल्याला लागत नसलेली गोष्ट आपण इतरांना कमी किमतीत उपलब्ध करुन देऊ शकतो आणि आपले सगळे पैसे वाया गेले नाहीत याचं थोडंफार समाधान मिळतं. )
  • आपल्या इतर नातेवाईकांपैकी कोणी वापरू शकणार असेल तर त्यांना देऊ शकतो. ( घरामधली मोठ्या बहिणीचे कपडे चांगले असतात परंतु उंची वाढल्याने ते वापरता येत नाहीत अश्या वेळी ते धाकट्या बहिणीला देऊ शकतो. फक्त आपल्या वागण्यातून समोरच्याला आक्षेपार्ह वाटणार नाही याची काळजी घ्यायला हवी.)
  • गरजू व्यक्तींना देऊ शकतो.
  • समाजउपयोगी कामासाठी वापरू शकतो (म्हणजे घरातील पुस्तकं, जी एकदा वाचून झाली आहेत आणि आता परत वाचणार नाही अशी पुस्तकं वाचनालयात देऊ शकतो, एखाद्याला आश्रमात देऊ शकतो).
  • कचऱ्यात टाकून देऊ शकतो.

अडगळ काढून टाकाताना एक काळजी मुख्य करून घ्यायला हवी ती म्हणजे आपण जर एखादी वस्तू इतरांना देत असू, मग ते रिसेल असू देत किंवा डोनेट करत असू, ती वस्तू योग्य आणि वापरण्याच्या स्थितीत आहे ना याचा विचार करा. तुटकंमुटकं, फाटलेलं, वापरता न येणाऱ्या, खराब झालेल्या वस्तू इतरांना वापरायला देऊ नका. आपल्या कोणत्याही वागण्याने समोरच्याला अपमानास्पद वाटणार नाही याची आपणच काळजी घ्यायला हवी.

४. मी पसारा आवरताना खोलीतला इतर भाग पूर्ण रिकामा करते. जिथे पसारा आवरायचा तिथेच जर पसारा असेल तर आपल्याला गोंधळून जायला होतं आणि काही सुचत नाहीत. कपाटातले कपडे काढून तिथल्याच निमुळत्या जागेत आवरायला लागलो तर आपल्यालाच सुचत नाही त्यापेक्षा ते कपडे दिवाणावर ठेवले तर त्याचे वेगवेगळे गठ्ठे करायला सोपे जाते. त्यामुळे ज्या खोलीत आवराआवरी करायची आहे त्या खोलीतले टेबल, दिवाण किंवा स्वयंपाकघर असेल तर ओटा पूर्ण रिकामा करून ठेवते. म्हणजे मग त्यावर सगळ्या सामानाचे वर्गीकरण करणे सोपं जातं.
५. आरंभशूर होऊन एकाच दिवशी सगळं भरभर आवरायला घेतलं की आपण खूप दमून जातो, एवढे कष्ट घेऊनही end result मिळाला नाही की हताश व्हायला होतं आणि मग पुन्हा कधी पसारा आवरायचा म्हणलं की जीवावर येत. त्यामुळे रोज ठरवून घरातला थोडा भाग, किंवा काही गोष्टी, असं जर आवरलं तर आपल्याला त्याचा ताण येत नाही.

डीक्लटरींगसाठी काही टिप्स:
१. अडगळ कमी करण्यासाठी आपण “नाही” म्हणायला शिकलं पाहिजे. आपण कधीतरी बारीक होऊ ह्या दिवास्वप्नात आपण जगत असतो आणि म्हणून कोणत्याही गोष्टी टाकून देत नाही आणि मग घरातला पसारा वाढत जातो. नाही म्हणायला शिकणं हे खूप अवघड असतं पण तरीही ती सगळ्यात उत्तम गोष्ट असते. फ्री सॅम्पल्स, दुकानातून सामान विकत घेताना मिळणाऱ्या पिशव्या यांची जर खरंच गरज नसेल तर नाही म्हणता यायला हवं. एखादी गोष्ट लागणार नसेल तर नम्रपणे नाही म्हणणं ह्यात काहीही गैर नाही.
२. अडगळीची सुरुवात अनावश्यक खरेदीतून होते त्यामुळे खरेदी करायला जाताना शक्यतो आपल्याला लागणाऱ्या सामानाच्या याद्या करून जायचं म्हणजे कोणतीही वस्तू आणायची विसरत नाही आणि अनावश्यक गोष्टी घेतल्या जात नाहीत. ह्यावर मी अजून एक उपाय केला होता आणि मला तो लागू पडला. खरेदीला जाताना मी खूप कमी वेळ ठेवायचे. म्हणजे ६ वाजता सिनेमाला जायचं असेल तर ५.१५ ला दुकानात शिरायचे. त्यामुळे यादीत ठरवलेल्या गोष्टी पटकन घेऊन व्हायच्या इकडेतिकडे रेंगाळत बसायला फारसा वेळ नसायचा आणि त्यामुळे अनावश्यक खरेदी कमी व्हायला लागली.
३. कोणत्याही खरेदीला जाताना आपल्याला नेमकं काय घाय्यचं आहे याचा विचार करून बाहेर पडावं असं मला वाटतं. सेल चालू आहे म्हणून, स्वस्त मिळतय म्हणून, इतरांकडे आहे म्हणून आपल्याकडून अनावश्यक गोष्टी घेतल्या जातात. आपल्यासमोर जर कोणत्याही वस्तूचा किंवा मशीनचा डेमो दिला तर आपण लगेच भारावून जातो आणि आपल्याला
वाटतं हे आपल्याला खूपच उपयोगी पडणारं आहे आणि आपण आपल्याला उपयोगी नसली तरी ती गोष्ट विकत घेतो. कोणतीही गोष्ट विकत घेताना ती किती रुपयांना आहे ह्याआधी ह्या गोष्टींचा विचार करावा असं मला वाटतं:

  • त्या वस्तूची आपल्याला खरच गरज आहे का?
  • ती वस्तू ठेवायला घरात जागा आहे का ?
  • आपल्यला ती वस्तू खरंच आवडली आहे का?
  • ती वस्तू घरी आणल्यावर, घरातल्या जुन्या वस्तूंपैकी आपण काय टाकून देऊ शकतो?

आपण न लागणाऱ्या वस्तू विकत घेतो, मग त्या घरात इतरत्र पडलेल्या असतात. आपण त्याचा उपयोग/वापर करत नाही आणि त्याचं काय करायचं ते कळत नाही.  ‘आपण उगाच पैसे वाया घालवले’ याचं गिल्ट मनात सतत येत राहतं त्यामुळे आपण गोष्टी टाकून देत नाही आणि मग पसारा वाढत जातो. हे सगळं एक मोठं दुष्टचक्र आहे. त्यामुळे सुरुवातीलाच, त्याला आळा घालायला हवा.
४. अडगळ कमी करण्याचा आणिक एक मुख्य उपाय म्हणजे घरात फर्निचर करताना स्टोरेजसाठी कमी जागा करणं. घरात जागा असली की समान वाढत जातं आणि आपण घरातले कप्पे खचाखच भरायला लागतो. पण घरात जागाच नसेल तर नाईलाजाने आपल्याला गोष्टी काढून टाकाव्याच लागतात.
५. वार्षिक आवरावर करण्यापेक्षा प्रत्येक ऋतू बदलानंतर किंवा दर चार महिन्यांनी घरातली आवराआवर करावी. त्यामुळे दोन गोष्टी होतात एकतर पुढच्या वेळी खरेदी करताना आपल्याला “घरातल्या अनावश्यक टाकून दिलेल्या वस्तू आणि त्यासाठी मोजलेले पैसे आठवतात” आणि एकाच वेळी सगळा पसारा आवरल्याने निर्माण होणारा ताण येत
नाही.
६. लोक काय म्हणतील म्हणून जर आपण मेकअप करून तयार व्हायला लागलो तर आपल्याला त्याचं बर्डन येतं आणि त्रासही होतो. पण छान राहिलेलं किंवा आवरलेलं आपल्याला आवडतं म्हणून रोज मेक अप केला तर त्याच बर्डन येत नाही. आपणच उत्साही, आनंदी, प्रफुल्लीत राहतो. तसंच लोक मला काय म्हणतील म्हणून घरातली अडगळ काढून टाकण्यापेक्षा आपल्याला बरं वाटेल म्हणून ते केलं तर त्यामुळे त्याचा मानसिक ताण येत नाही.
७. इमोशनल डीक्लटर हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. त्यावर आपण सविस्तर चर्चा करावी असं मला वाटतं. आपल्याला मिळालेल्या भेटवस्तूची विल्हेवाट लावणं हे मानसिक ताण आणणारं  काम असतं आणि ते जमवणं तितकंच कठीणही असतं.

मी वर म्हणल्याप्रमाणे डीक्लटर आणि मिनीमलीजम हा एक जीवनशैलीचा भाग आहे. आयुष्यात एकदाच करून भागणाऱ्यातली ही गोष्ट नाही. त्यामुळे त्याची आपल्याला सवय करून घ्यायला हवी. आपल्यात बदल करायचे असतील तर ते एका रात्रीत होऊ शकत नाहीत. त्यासाठी काही काळ जावा लागतो. परंतु प्रत्यन करत राहणं सोडायचं नाही. आपण, जेव्हा अडगळ होणार नाही याची काळजी घेतो तेव्हा खरंतर आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतो आणि पर्यायाने स्वतःची. त्यामुळे ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी कधीतरी सुरुवात करावी लागेल ती लवकरात लवकर करूया. डीक्लटर आणि मिनीमलीजम ह्या विषयांवर लिहिणं जेवढं अवघड आहे त्याहीपेक्षा जास्त ते आचरणात आणणं अवघड आहे आणि मला त्याची पूर्ण कल्पना आहे. मी वर लिहिलेल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील परंतु, ‘कळतं पण वळत नाही’ अशी आपल्या सगळ्यांची परिस्थिती असते. तेव्हा लवकरात लवकर ह्या बदलांना सुरुवात करूया.

डीक्लटर आणि मिनीमलीजमवरचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे जरूर कळवा. तुम्ही कश्याप्रकारे घरातली अडगळ बाजूला करता तेही कळवा. पुन्हा भेटू लवकरच एका नव्या सदरामध्ये…!!

Related Posts

4,303 thoughts on “डीक्लटर आणि मिनीमलीजम

  1. Sneha karle - Sawkar

    Far surekh aani Sundar lekh lihilay.mala far aawadalay. Savistar aslyane ek far chhan fayda zalay Maza, yhatale barech mudde navyane laxat aalet. Tasach karaych tharavalay. Manpasun thank you.