Close
  • Gha Gharacha

बेडरूमची स्वच्छता : भाग दुसरा (बेड आणि आजूबाजूच्या इतर गोष्टी)

ह्या आठवड्यापासून आपण बेडरूमच्या स्वच्छतेला आणि आवराआवरीला सुरुवात केली. मागच्या भागात आपण हेडबोर्ड, उश्या, बेडमधलं स्टोअरेज ह्याबद्दल बोललो.  आज आपण बोलणार आहोत अंथरूण, पांघरूण आणि बेडसाइड टेबल ह्याविषयी.

१. बेड साइड टेबल :
शक्यतो बेड साइड टेबलला ड्रॉवर असतात. पण आम्ही मुद्दामच इथे ड्रॉवर केले नाहीत. ड्रॉवर केले की (ड्रॉवरमध्ये आणि ) त्यावर पसारा साठत जातो. त्यामुळे, आम्ही जुना ट्रंक बेड साईड टेबल म्हणून वापरायचे ठरवले. रोज झाकण उघडून आतल्या वस्तू काढायच्या किंवा ठेवायच्या असल्याने ट्रंकवर सहसा पसारा होत नाही. जिथे बेडरूम लहान असेल किंवा स्टोअरेजसाठी जागा कमी पडत असेल तिथे ह्या बेड साइड टेबलचा खूप उपयोग होतो. आपण आपली ज्वेलरी किंवा रोज वापरायचे क्रीम, लोशन, घड्याळ, कानातलं, क्लिप्स ह्यासारख्या वस्तू ठेवू शकतो. बेड साइड टेबलवर किंवा ड्रॉवरमध्ये साधारणपणे १. घड्याळ, २. डायरी/ पुस्तकं, ३. चार्जर, ४. एसी रिमोट, ५. चष्मा, ६.पाण्याचं तांब्या भांडं, ७. मेडिसिन – विक्स, झेंडूबाम, ८. बॉडी लोशन ९.लॅम्प इत्यादी वस्तू ठेवतात. ह्यापेक्षा जास्त पसारा तिथे होणार नाही याची काळजी घ्या. जर जास्त वस्तू असतील तर त्यांच्या वापरानुसार किंवा आपल्या गरजेनुसार वर्गीकरण करून वेगवेगळ्या बॉक्समध्ये किंवा डब्यांमध्ये ठेवा. शक्यतो टेबलचा वरचा भाग रिकामा ठेवा म्हणजे पुसून घायला सोपं पडतं. तिथे पसारा असेल तर एवढा सगळा पसारा उचलून मग पुसून घ्यायचा कंटाळा येतो आणि वस्तू बाहेर राहिल्याने धूळ बसून खराब होतात.

२. अंथरूण पांघरूण :
आपल्याकडे प्रत्येकासाठी स्वतंत्र असे एक पांघरूण असते. एकमेकांचे पांघरूण वापरू नये. हवामान, तपमानानुसार वेगवेगळ्या ऋतुंमध्ये आपण वेगवेगळे पांघरूण वापरतो. त्यामुळे घरातल्या प्रत्येका व्यक्तीसाठी उन्हाळ्यासाठीचे पातळ पांघरूण आणि हिवाळ्यासाठीचे जाड पांघरूण असे दोन पांघरूण ठेवावे. बाकी सगळ्या जादाच्या उश्या आणि पांघरूण मी बेडमध्ये ठेवते. मी लहानपणी आईला विचारलं की एखादी वस्तू कुठे आहे? तर ती म्हणायची “तिथेच आहे” ह्या ‘तिथेच आहे’ चा मला भयंकर राग यायचा. मला कसं कळणार तिथेच म्हणजे नेमकं कुठे ते? (म्हणजे ते खरंच तिथेच असायचं फक्त ते मला दिसायचं नाही.) त्यामुळे सगळ्याला आम्ही स्टोअर करून ठेवताना प्रत्येकावर नावं लिहून ठेवलेले आहेत. त्यामुळे घरातील इतर व्यक्तींनासुद्धा सोपं जातं आणि कशात काय ठेवलंय हे हुडकत बसावं लागत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं मी अश्या प्रकारे वर्गीकरण करते:

– नॅप्किन्स
– टॉवेल्स
– जादाचे टॉवेल्स
– जादाचे पिलो कव्हर
– क्विल ट
– सतरंज्या
– जादाच्या उश्या
– गादया

सिंगल बेड
– जादाच्या बेडशीट
– हिवाळ्यासाठीची जाड/उबदार बेडशीट
– उन्हाळ्यासाठी कॉटनच्या फेंट रंगाच्या बेडशीट
– हिवाळ्यासाठीची जाड/उबदार पांघरूणं
– उन्हाळ्यासाठीची पातळ पांघरूणं

डबल बेड
– जादाच्या बेडशीट
– जादाचे पिलो कव्हर
– हिवाळ्यासाठीची जाड/उबदार बेडशीट
– उन्हाळ्यासाठी कॉटनच्या फेंट रंगाच्या बेडशीट
– सण समारंभासाठीच्या बेडशीट
– हिवाळ्यासाठीची जाड/उबदार पांघरूणं
– उन्हाळ्यासाठीची पातळ पांघरूणं

आणिक एक गोष्ट म्हणजे सगळ्या बेडशीट एकाच पद्धतीने घडी केल्या तर साधारण समान आकाराच्या घड्या होतात आणि ते ठेवायला सोपं जातं. घरातल्या प्रत्येका व्यक्तीसाठी किती पांघरुणं  ठेवायची आणि पाहुण्यांसाठी किती ठेवायची, प्रत्येक बेडसाठी किती बेडशीट ठेवायच्या याचा आकडा ठरवून घ्या आणि त्यापेक्षा जास्त काहीही ठेऊ नका. आपण दर आठवड्याला बेडशीट बदलतोच. पण जर दरवेळी बेडशीटला इस्त्री करत नसू तर बेडशीट धुतल्यानंतर मशीनमधून ताबडतोब बाहेर काढा आणि लगेच वाळत घाला. वाळत घालताना तीन चार वेळा जोरात झटका. ह्यामुळे बेडशीट जास्त चुरगळली जात नाही किंवा कमी चुण्या पडतात.

जर कम्फर्टर वापरत असाल तर ते व्यवस्थित सुती कपड्यात गुंडाळून ठेवा जेणेकरून धुळीमुळे ते खराब होणार नाही. एखाद्या ठिकाणी डाग पडला असेल तर तो आधी स्वच्छ करा (किंबहुना तेवढाच भाग स्वच्छ करा). कम्फर्टर सतत धुतल्याने त्यात असणारा स्पंज/ फोम/ मेमरी फोम आकसतो, त्यातला मऊपणा निघून जातो आणि ते तितकीशी उब देऊ शकत नाही. धुताना स्वच्छतेच्या संकेतचीन्हांकडे लक्ष्य द्या. प्रत्येका पांघरुणाला असणारे टॅग बघा. स्वच्छतेच्या संकेतचिन्हांबाबत मी एक ब्लॉग लिहिला आहे त्याची लिंक सोबत जोडत आहे.

स्वच्छतेच्यासंकेत चिन्हांचा अर्थ

बेडरूमची स्वच्छता करताना कपाट, बेड ह्यासारख्या मोठ्या मोठ्या गोष्टींची आपोआप स्वच्छता होत राहते. पण त्यासोबतच स्वीचबोर्ड, दिवे किंवा लॅम्पशेड्स, सिलिंग फॅन ह्या सारख्या गोष्टींचीसुद्धा स्वच्छता करावी लागते. ह्या सगळ्यांच्या स्वच्छतेबद्दल मी पूर्वी माहिती दिली आहे. त्याची लिंक सोबत जोडत आहे. ‘स्वयंपाकघराची स्वच्छता’

कोणतीही नविन वस्तू आणली की त्यासोबत येणारे पुठ्ठ्याचे बॉक्स ‘कधीतरी लागतील’ ह्या नावाखाली बेडरूममधील माळ्यावर किंवा कपाटाच्या वरच्या बाजूला (किंवा कुठेही) ठेवलेले असतात. आपल्याला असं वाटतं की आपण त्यापासून दुसरं काहीतरी बनवू.  पण तसं होत नाही आणि फक्त पसारा वाढत जातो. असे सर्व बॉक्सेस काढून टाका. हल्लीच्या घरांना माळे नसतात. परतू जुन्या घरांमध्ये माळे असतात आणि त्यात अक्षरशः ब्रम्हांड मावलेलं असतं.  बऱ्याचश्या न लागणाऱ्या वस्तू ‘कधीतरी लागतील’ म्हणून आपण माळ्यावर ठेवलेल्या असतात. त्यातल्या सगळ्या जुन्या, अनावश्यक गोष्टी, अप्लायन्सेसची खोकी, गणपती आणि दिवाळीचं डेकोरेशनचं सामान (जे आपण यापुढे वापरणार नाही असे) अश्या सगळ्या वस्तू काढून टाकाव्या. जुन्या, तुटलेल्या/ फाटलेल्या ट्रॅव्हलिंग बॅग्स जर दुरुस्त करून वापरणार नसू किंवा बेडस्टोअरेजसाठी वापरणार नसू तर त्याही काढून टाकाव्या. माळ्यावरही जळमटं झाली असतीलच तीदेखील काढावीत.  माळ्यावर खाली पेपर टाकला असेल तर तो बदलावा. माळा बराच मोठा आहे त्यामुळे बसेल तेवढं समान माळ्यावर ठेवू उरलेलं काढून टाकू असं म्हणण्यापेक्षा ‘जेवढा जास्त माळा रिकामा ठेवता येईल तेवढा जास्त रिकामा ठेवू’ असा प्रयत्न करा. बाकी प्रत्येकाच्या माळ्यावर असणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असतात त्यामुळे त्यांची यादी कारणं जरा अवघडच आहे.

बेडरूममध्ये ए सी लावलेला असेल तर तोसुद्धा बाहेरच्या बाजूने स्वच्छ करा. ए सी मेन्टेनन्ससाठी कंपनीचा माणूस ठराविक काळानंतर येत असेलच. जर बऱ्याच दिवसात ए सीच्या आतल्या भागांची साफसफाई किंवा डागडुजी झाली नसेल तर कंपनीच्या माणसाला ताबडतोब बोलवून घ्या. बेडरूमच्या खिडक्या आणि पडदे यांचीसुद्धा स्वच्छता करावी लागते. ह्याबाबत सविस्तर माहिती मी लिहिलेली आहे. त्या ब्लॉगची लिंक सोबत जोडत आहे. बेडरूम मध्ये असणाऱ्या फोटो फ्रेम्स, इतर शोभेच्या वस्तू किंवा इतर फर्निच, दाराचे  हॅन्डल्स ह्या सगळ्या गोष्टींची स्वच्छता करावी (फर्निचर स्वच्छ करताना काही नाजूक वस्तू असतील तर सरळ बेबी वाईप्स किंवा वेट टिशू ने पुसून घ्यावं. घरात लहान मुलं असतील तर खूप हार्श क्लीनर्स वापरू नयेत.  त्यापेक्षा बेबी वाईप्सने पुसलं तरी चालू शकतं.) मी वर म्हणल्याप्रमाणे आपल्या बेडरूममध्ये कोणकोणत्या शोभेच्या वस्तू असतील किंवा काय काय फर्निचर असेल याची यादी करणं अवघड आहे. पण ज्या कोणत्या वस्तू असतील त्या सर्वांची स्वच्छता करणं गरजेचं आहे.

आज इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या सदरामध्ये…!!!

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!