आपण खूप हौसेनी वेगवेगळे अप्लायन्सेस घेत राहतो. सुरवातीला ‘त्याची आपल्याला गरज आहे’ किंवा ‘आपण हे सगळं घरीच करूया’ ह्या आरंभशूर विचारातून ते घेतो. उदा. बर्फाचा गोळा बनवायचं मशीन, वॉफल मशीन, फ्रॉथर इ. पण ते घेतल्यानंतर फारतर फार दोन चारदा वापरलं जातं आणि नंतर त्यावर धूळ बसायला लागते आणि अश्या उपकरणांची अडगळ होते. घरात असणारी अशी सगळी छोटी मोठी उपकरणं बाहेर काढा आणि ह्यांची आपल्याला खरंच गरज आहे का? हे आपण गेल्या ४-६ महिन्यात वापरलं आहे का? ते न वापरल्याने आपलं काही अडणार आहे का? हे वापरणं सोयीचं आहे का? हे स्वतःलाच विचारून बघा आणि जर गरज नसेल तर अशी सगळी उकरपणं काढून टाका. उरलेल्या सगळ्या उपकरणांसाठी स्वयंपाकघरातलं एक कपाट ठरवून त्यात, जे खरंच लागणार आहे तेवढंच स्टोअर करा. स्वयंपाकघरातली ही छोटी उकरपणं दोन भागांत विभागली जाऊ शकतात. स्वयंपाकाच्या तयारीसाठी लागणारे उकरपणं म्हणजे मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर इत्यादी आणि स्वयंपाक करताना लागणारे उकरपणं म्हणजे ओव्हन, मायक्रोव्हेव, इलेक्ट्रिक कुकर, टोस्टर, कॉफी मेकर इत्यादी. गेल्या दोन भागांत आपण स्वयंपाकघरातल्या विविध गोष्टींच्या स्वच्छतेविषयी बोलत होतो. आज आपण बोलणार आहोत स्वयंपाकघरातल्या विद्युत उपकरणांच्या स्वच्छतेविषयी.
१. एक्झॉस्ट फॅन :
स्वयंपाकघरातला धूर / हवा शोषून घेऊन बाहेर फेकण्याचं काम एक्झॉस्ट फॅन करत असल्याने, तो खूप लवकर खराब होतो. एक्झॉस्ट फॅनची स्वच्छता करताना सगळ्यात आधी बटण बंद करून प्लग बाजूला काढून ठेवा. काही वेळा फॅन डिसमेंटल करणं शक्य असतं, अश्या वेळी डिसमेंटल करून मगच स्वच्छता करा. परंतु बऱ्याचदा तसं करता येऊ शकत नाही. अश्यावेळी निदान समोर बसवलेली जाळी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात साबण/ डिश लिक्विड सोप घालून ही जाळी त्यात ठेवा.
जाळी पाण्यात ठेवलेली असताना उरलेल्या फॅनची स्वच्छता करा. स्वयंपाकघरातला एक्झॉस्ट फॅन खूप खराब होत असल्याने निदान महिना – दोन महिन्याला स्वच्छ करायला हवा. जर खूप दिवस तो स्वच्छ केला नाही तर त्यावर तेल आणि धुळीचे थर साठतात आणि मग ते काढणं कष्टाचं होतं. गरम पाण्यात थोडसं डिश लिक्विड सोप घालून त्यात स्क्रब बुडवून फॅनची सगळी पाती पुसून घ्या. त्यानंतर नुसत्या पाण्यात स्पंज/कापड बुडवून व्यवस्थित पिळून घ्या आणि पुन्हा एकदा पुसून घ्या जेणेकरून पात्यांना लागलेला साबण निघून जाईल.
जर फॅन खूपच खराब झाला असेल तर, एका छोट्या कापसाच्या बोळ्यावर खोबऱ्याचं तेल घ्या आणि संपूर्ण फॅनला त्या कापसाच्या बोळ्याने तेल लावा. तेल लावून झाल्यावर ३०-४० मिनिटं तसंच ठेवा आणि त्यानंतर कापूस किंवा टीशूपेपरने पुसून घ्या. (जर कापूस किंवा टीशूपेपरने पुसून घेताना सगळं ग्रीस निघून येत नसेल तर याचा अर्थ अजून थोडा वेळ तेल लावून ठेवण्याची गरज आहे.) अजिबात ताकद न लावता सगळी घाण/ ग्रीस निघून जाईल. जोर लावून, अॅसिड वापरून किंवा अणकुचीदार वस्तूंनी खरवडत बसायची गरज लागणार नाही.
२. चिमणी / हूड :
चिमणीचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे फिल्टर असणारी चिमणी आणि दुसरं म्हणजे एक्झॉस्ट पाईप असणारी चिमणी. रोजचा स्वयंपाक करताना होणारा धूर, वाफा हे सगळं चिमणी शोषून घेत असल्याने ती रोजच्या रोज थोडी तरी स्वच्छ करायला हवी. चिमणीला असणारे दिवे, डीजीटल पॅनल, फिल्टरची बाहेरची बाजू ह्या गोष्टी निदान आठवड्यालातरी (खरंतर दररोज पण अगदीच जमत नसेल तर निदान आठवड्याला तरी) पुसून घेतल्या पाहिजेत. दिवे, डीजीटल पॅनल पुसून घेताना त्यावर डायरेक्ट क्लीनर स्प्रे करू नका, त्याचे ओघळ येतात. त्याऐवजी नॅप्कीनवर थोडसं क्लीनर स्प्रे करा आणि त्याने पुसून घ्या.
चिमणी जेव्हा पूर्ण स्वच्छ करणार असू तेव्हा वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत स्वच्छ करत या. जर दोन कपाटांच्या मधल्या भागात चिमणी बसवली असेल तर चिमणीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असणारे कपाटांचे सर्फेससुद्धा खराब होतात ते देखील स्वच्छ करा. चिमणी स्टीलबॉडीची असेल तर पाण्यात डिश लिक्विड घालून किंवा काचेची असेल तर ग्लास क्लीनरचा वापर करून बाहेरून स्वच्छ करू शकता.
चिमणीचे फिल्टर्स स्वच्छ करण्यासाठी – एका मोठ्या पातेल्यात किंवा डबलबोल सिंक असल्यास त्यापैकी एका बोलमध्ये गरम पाणी घेऊन त्यात डिश लिक्विड सोप घाला (१ कप पाण्याला साधारण ४ चमचे). ह्या साबणाच्या पाण्यात फिल्टर्स बुडवून ठेवा. काहीजणी चिमणीचे फिल्टर्स रात्रभर साबणाच्या पाण्यात ठेवतात आणि मग सकाळी उठल्यावर स्वच्छ करतात. पण माझ्यामते आपण नियमितपणे फिल्टर्स स्वच्छ करत असू तर, एक तास जरी साबणाच्या पाण्यात फिल्टर्स ठेवले तरी स्वच्छ निघतात. तासभरानंतर टूथब्रश आणि स्क्रबने फिल्टर्स साफ करून स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा विसळून घ्या जेणेकरून साबणाचे अंश राहणार नाहीत. गरम पाण्यात डिश लिक्विड सोपऐवजी व्हेनिगरसुद्धा घालू शकता.
जर दुसऱ्या प्रकारातली म्हणजे एक्झॉस्ट पाईप असणारी चिमणी असेल तर त्याचा एक्झॉस्ट पाईप स्वच्छ करण्यासाठी कंपनीची माणसं दर सहा महिन्यांनी घरी येतात. त्यामुळे आठवणीने त्यांना बोलवायचं इतकंच.
३. वाटर प्युरीफायर :
प्रत्येकाकडे येणारं पाणी आणि त्यात असणारं क्षाराचं प्रमाण भिन्न असल्याने फिल्टर/त्याची जाळी किती दिवसांनी बदलावी हे सांगू शकत नाही. पण दर महिन्याला फिल्टर चेक करून त्याची जाळी खराब झाली असेल तर जुनी टाकून देऊन नविन बसवावी. आपल्याकडे फिल्टर हा शक्यतो सिंकजवळ ठेवलेला असतो. भांडी घासताना, सिंकमध्ये काम करताना पाण्याचे, साबणाचे शिंतोडे उडून फिल्टर/ पिंप बाहेरच्या बाजूने खराब होतो. त्यामुळे रोज रात्री पाणी भरताना पिंप/ फिल्टर बाहेरून आणि आतून स्वच्छ करावा.
अॅक्वागार्ड किंवा तत्सम ऑटोमॅटिक/ इलेक्ट्रोनिक मशीन असल्यास आपण आतून स्वच्छ करू शकत नाही. दर तीन महिन्याला कंपनीचा माणूस घरी येऊन पाणी तपासून आणि फिल्टरचा मेंटेन्सन करून जातो. फक्त आपण त्याला आठवणीने बोलावायचं. बाकी हे फिल्टर आपण बाहेरून स्वच्छ ठेवू शकतो.
४. ब्लेंडर :
एक मोठं (उंची जास्त असणारं) पातेलं घेऊन भांड्याच्या १/४ भागात पाणी भरून घ्या आणि १-२ चमचे डिश लिक्विड सोप घाला (व्हेनिगर घातलं तरी चालेल). आता ह्या भांड्यात ब्लेंडर ठेवून लो स्पीडवर फिरवा. प्रत्येक ब्लेड घालून १०-१५ सेकंद फिरवा. ब्लेडचे पाते छोटे असल्याने आत अडकून बसलेले कण काढणं अवघड जातं. अश्या प्रकारे स्वच्छ केल्याने सर्व पाती व्यवस्थित स्वच्छ होऊ शकतात. त्यानंतर ते खराब पाणी टाकून द्या आणि चांगलं पाणी त्या भांड्यात घेऊन पुन्हा एकदा सगळे ब्लेड्स पाण्यात टाका किंवा डायरेक्ट नळाखाली धरले तरी काही अडचण नाही (ब्लेड्सला असलेला साबण काढून टाकणे हा हेतू आहे). ब्लेंडरच्या ब्लेड्स सुती कपड्यावर ठेवून पूर्ण कोरड्या होऊ देत, नाहीतर त्यांना गंज चढू शकतो. ब्लेंडर जिथे धरतो तिथे खरकटे हात लागलेले असतात, कधी हळदीचे डाग पडलेले असतात तेसुद्धा डिश लिक्विड सोपने स्वच्छ करावे.
आज इथेच थांबू. स्वयंपाकघरातल्या उर्वरित उपकरणांच्या स्वच्छतेबद्दल पुढच्या भागात बोलूया. तेव्हा लवकरच भेटू पुढच्या भागात…!!!
Pratibha Kelkar
खूप छान माहिती दिलीत thanks, मला माहिती havi आहे.
माझ्या gharat khup spiders zhale आहे. काय करावे. Pl सांगा.
तनुजा पडवळ
उपयोगी टिप्स,आभार
घ घराचा
@Tanuja धन्यवाद