Close
 • Gha Gharacha

सगळं काम मीच करायचं का?

मी शाळेत असताना मधल्या सुट्टीत आम्हा मैत्रिणींचा एक मोठा चर्चेचा विषय असायचा ‘आज आई काय ओरडली?’ आणि आम्हाला कायम आश्चर्य वाटायचं की सगळ्यांच्या आया सारख्या शब्दात कश्या काय ओरडतात? म्हणजे अगदीच सेम डायलॉग. आपल्या आया 'मुलांना कसं ओरडायचं ह्याच्या क्लासला जात असाव्यात आणि सगळ्यांना सारखंच शिकवत असल्याने सगळ्यांच्या घरी सेम डायलॉग येत असणार, असा आम्हा मैत्रिणींचा समज झाला होता. थोडं मोठं झाल्यावर आमचं कोडं आम्हाला उलगडायला लागलं.

आपल्याला घरात कराव्या लागणाऱ्या कामांपेक्षा “मला कोणीच मदत करत नाही” याचा जास्त ताण येतो. घरातली सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात त्यामुळे वेळेचं आणि कामाचं नियोजन करूनदेखील त्रास होतो, अशी परिस्थिती खूप जणांची असते. माझे बाबा म्हणतात, “इतरांकडून काम करून घेणं ही एक कला आहे. दुसऱ्याला न
दुखावता, त्याच्याकडून, आपल्याला हवं तसं काम करून घेता आलं पाहिजे” त्यांचं हे वाक्य मला फार आवडतं आणि पटतंसुद्धा. घरातल्या कामांची यादी करून त्याची एकमेकांच्या मदतीने आणि सोईने वाटणी केली तर आपल्याला बरीच मदत होते. घरकामात, घरातल्या इतर मंडळींची आपल्याला मदत का होत नाही याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा काही करण माझ्यासमोर आली आणि आज ती तुमच्यासमोर मांडणार आहे.

काम न करण्याची मुख्य कारणं:
१. नेमकं काय काम करणं अपेक्षित आहे हे कळत नाही
२. जे काम करणं अपेक्षित आहे ते काम करता येत नाही
३. जे काम करणं अपेक्षित आहे ते काम करायला आवडत नाही
४. जे काम करणं अपेक्षित आहे ते करायला पुरेसा वेळ मिळत नाहीत
५. काम करण्याची पद्धत निराळी असते
६. कामासंदर्भात सांगितलेल्या सूचना कळत नाहीत.
७. कोणतच काम करायला आवडत नाही
८. घरातले मोठेही तसंच वागतात मग मी का नको वागू ?
९. अव्यवस्थित किंवा अस्वच्छ राहायला आवडतं/चालत
१०. आपण केलेल्या कामाचं कौतुक होत नाही

 • नेमकं काय काम करणं अपेक्षित आहे हे कळत नाही:
  बऱ्याचदा अडचण अशी असते की मदत करायची इच्छा असते, पण मदत म्हणजे नेमकं काय करायचं हे कळत नाही. आपण नुसतंच "तुम्ही मला काही मदत करत नाही" अशी general statements करत असतो पण “मदत” म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे हे सांगितलं तर समोरच्याला जरा सोपं जाऊ शकतं. आपण ही कामं रोज करत असल्याने ती आपल्याला अंगवळणी पडलेली असतात. त्यामुळे ती कामं आपण हातासरशी करून टाकतो. जेव्हा समोरच्याला काम सांगतो तेव्हा एक मुख्य काम सांगतो पण त्यातली छोटी छोटी काम सांगत नाही (कारण ती मुख्य कामासोबत आपोआप होतीलच अशी आपली अपेक्षा असते) पण समोरचा हे काम रोज करत नसल्याने ही सगळी छोटी छोटी कामंसुद्धा त्याला सविस्तर सांगणं गरजेचं असतं असं मला वाटतं.
  उदाहरणार्थ : जर आईने ४ वाजताचा चहा करायला घेतला तर, आई दहा मिनिटं आधी फ्रीजमधून दूध बाहेर काढून ठेवेल, मग दुधावरची साय बाजूला काढून विरजण लावेल, चहा टाकेल, त्यासोबतच बाजूच्या गॅसवर दूध तापवेल, चहा झाल्यावर ओट्यावरचे चहा साखरेचे डबे जागच्या जागी ठेवेल, ओट्यावर दुधाचे ओघळ/ डाग पडले असतील तर ते पुसून घेईल, चहा गाळल्यानंतर गाळण्यातली चहाची पावडर ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकेल, गाळणं विसळून मगच बाहेर येईल. हेच जर बाबांना चहा करा म्हणून सांगितलं ते फक्त चहा करतील आणि दुधाचे पातेलं तसच ओट्यावर असेल, चहा साखरेचे डबे ओट्यावर असतील, दुधाचे ओघळ ओट्यावर तसेच असतील, गाळण्यात चहा पावडर तशीच असेल. हा फरक व्याक्तिंमधला, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती/उत्साह ह्यासोबतच ‘रोज काम करणं’ आणि ‘गेस्ट अपिरिअन्स देणं’ ह्यातला आहे. त्यामुळे गेस्ट अपिरिअन्स देणाऱ्यांना मदत म्हणजे नेमकं काय काय करण गरजेचं आहे हे सविस्तर सांगावं असं मला वाटतं. त्यामुळे आपल्या अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोचून, ज्यांना खरंच मदत करायची आहे त्यांना उपयोग होईल आणि आपली जरा चिडचिड कमी होईल.
 •  

 • जे काम करणं अपेक्षित आहे ते काम करता येत नाही:
  प्रत्येकाला सगळं येतंच असं नसतं. समोरच्याने जे काम करण अपेक्षित आहे ते जर त्याला येत नसेल तर, “एवढं साधं सोपं काम कसं येत नाही” म्हणून वाद घालण्यापेक्षा त्याऐवजी त्याला इतर कोणत्या कामात मदत करायला आवडेल हा विचार करायला हरकत नाहीत. जोपर्यंत समोरच्याला आपल्याला मदत करायची इच्छा आहे तोपर्यंत आपणही थोडी तडजोड करायला हरकत नाही. आपलं काम कमी झाल्याशी कारण. मग चार कामांपैकी कोणतीही दोन कामं कमी झाली तरी “तुका म्हणे त्यातल्या त्यात” असं त्याकडे सकारात्मक नजरेने बघायला हरकत नाही.
 •  

 • जे काम करणं अपेक्षित आहे ते काम करायला आवडत नाही:
  कामात मदत नं करण्यामागचं हे एक मुख्य कारण आहे असं मला वाटतं. आपल्यला ज्या कामात मदत अपेक्षित आहे ते काम कदाचित समोरच्याला आवडत नसतं. नावडतं काम करण्यासाठी माणसाचा उत्साह आपोआपच कमी होतो. त्यामुळे त्याला जे काम करायला आवडेल अशीच कामं आपण समोरच्याला द्यावी. एखाद्यला बाहेरची काम करायला खूप आवडतं तर एखाद्यला घरात राहून मदत करायला आवडतं. मग अश्यावेळी आवडीनिवडी जपत कामांची विभागणी केली तर कोणालाही कामाचा ताण येत नाही असं मला वाटतं.
 •  

 • जे काम करणं अपेक्षित आहे ते करायला पुरेसा वेळ मिळत नाहीत:
  कामाची विभागणी करताना एकमेकांची सोय लक्षात घ्यायला हवी. तसं न करता नुसत्याच कामाच्या याद्या थोपवत राहिलो तर कोणाचाच फायदा होणार नाही. समोरच्याला आपल्याला मदत करायची इच्छा आहे ह्या गोष्टीचं आपल्यला समाधान वाटत असतं. त्यामुळे त्याला हे काम करायला वेळ नसेल तर आपणही थोडं फ्लेक्झिबल होऊन त्याच्याकडे जेव्हढा वेळ आहे तेवढंच काम त्याला द्यावं किंवा शक्य असेल तर आहे ते काम करण्यासाठीचा वेळ वाढवून द्यावा. आपण समोरच्याची अडचण समजून घेतल्याने त्याच्या मनातही हेच विचार यायला सुरुवात होते.
 •  

 • काम करण्याची पद्धत निराळी असते:
  प्रत्येकाची काम करण्याची पद्धत निराळी असते. एका घरात राहूनसुद्धा दोन माणसं सारख्या पद्धतीने वागत नाहीत किंवा काम करण्याची पद्धत सारखी नसते. अगदी भाजी निवडायला सांगितली तर काही लोकं आधी कात्रीने कापतात आणि नंतर निवडतात आणि काहींना ते अजिबात आवडत नाहीत. एकदा एक काम सांगितल्यावर त्यातल्या खूप बारीक सारीक गोष्टीत लक्ष घालू नये असं मला वाटतं. घरातल्या मोठ्या मंडळींना तर ते अजिबात आवडत नाही. त्यामुळे वैतागून “करतोय नं मी काम ?” अशी उत्तरं यायला सुरुवात होते. आपल्यावर अंकुश असलेला जसं आपल्याला आवडत नाही तसंच ते समोरच्यालाही आवडत नसणार याचा विचार प्रमुख्याने व्हावा असं मला वाटतं. जोपर्यंत “end result” व्यवस्थित आहे तोपर्यंत फार लक्ष नाही घातलं तर ते सर्वांसाठीच उत्तम असतं असं मला वाटतं.
 •  

 • कामासंदर्भात सांगितलेल्या सूचना कळत नाहीत:
  एकदा आमच्याकडे पाहुणे येणार होते. आई स्वयंपाक करत होती. फ्रीजमधलं आलं काढलं तर खराब झालेलं होतं. आई पटकन बाबांना म्हणाली, “ जरा आलं आणून देता का हो?” बाबा पटकन बाजूच्या दुकानात गेले आणि अर्धा किलो आलं घेऊन आले. आई रोज भाजी आणायला जात असल्याने ‘जरासं आलं’ ह्याचा अर्थ ‘२-५ रुपयांचं आलं’ असं आईला वाटलं (किंवा तिने तसं गृहीत धरलं). पण बाबा कधीच भाजी आणायला जात नसल्याने ‘थोडं’ म्हणजे २० माणसांच्या स्वयंपाकाला अंमळ जास्तच आणू म्हणून बाबांनी अर्धा किलो आणलं होतं. त्यामुळे मी वर म्हणल्याप्रमाणे आपण सांगितलेल्या सूचना/कामं ही खूप सविस्तर असावीत जेणेकरून गडबड व्हायला फार स्कोप राहणार नाही.
 •  

 • घरातले मोठेही तसंच वागतात मग मी का नको वागू ?
  आपल्यात उपजत असणाऱ्या स्वभावधर्मापैकी एक म्हणजे ‘तुलना’. आपल्या नकळत आपण इतरांशी तुलना करत राहतो. “शेजारचे बघा त्यांच्या बायकोला किती मदत करतात” हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येकाचे घरातल्यांशी असणारे नाते त्यांचे स्वभाव खूप भिन्न असतात. त्यामुळे कुणाचीही कधीच कुणाशीही तुलना करू नये असं मला वाटतं. कदाचित आपल्यालाही, आपली कोणासोबत तुलना केली तर राग येऊ शकतो. ‘तुम्ही मला घरात मदत करावी’ ही अपेक्षा रास्त आहे पण शेजारी त्यांच्या घरी खूप मदत करतात म्हणून तुम्ही मला मदत करावी असं म्हणणं चुकीचं आहे असं मला वाटतं. आपण घरात एकमेकांशी कसं वागतो, कसं बोलतो ह्या सगळ्या गोष्टी घरातली लहान मुलं बघत असतात आपणच एकमेकांना आदराने वागवलं नाही तर तीदेखील तशीच वागायला लागतात. बाबा घरात कुठे मदत करतात मग मी का करू असे प्रश्न पडतात. त्यामुळे घरातल्या मोठ्या मंडळीनीदेखील एकमेकांशी बोलताना, वागताना ह्या गोष्टींचा विचार करायला हवा असं मला वाटतं.
 •  

 • कोणतच काम करायला आवडत नाही/ अव्यवस्थित किंवा अस्वच्छ राहायला आवडतं/चालत:
  मला असं वाटतं की, फक्त आपली कामं कमी व्हावीत म्हणून घरातल्यांनी कामात मदत करायला हवी असं नाही परंतु, एखादी व्यक्ती जेव्हा स्वतः काम करते तेव्हा घराबद्दलचा आपलेपणा, जिव्हाळा वाढतो कारण स्वतः घेतलेल्या कष्टांची माणूस सगळ्यात जास्त किंमत ठेवतो. स्वतःचं कपड्याचं कपाट स्वतःला आवरायला लागलं की पुढच्या वेळी कपडे फेकून देताना अपोआप विचार केला जातो. ज्यांना खरंच मनापासून मदत करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण तडजोड करायला हरकत नसावी. “मला वेळ कमी आहे, हे काम जमत नाही” अश्या त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हरकत नसावी. पण कधी कधी ह्या सगळ्या गोष्टी ‘काम टाळण्यासाठीचं बळकट कारण’ म्हणून वापल्या जातात आणि ते आपल्या लक्षातही येतं. ह्या सगळ्यावरचा उपाय म्हणजे आपली “acceptance level” वाढवणं. आपण घर स्वच्छ ठेवतो कारण ‘ते आपल्याला आवडतं आणि गरजेचं वाटतं म्हणून’असा एकदा विचार केला की मग गोष्टींचा फार त्रास होत नाही. काही माणसं अशी असतात की त्यांच्यापुढे कितीही उपाय घेऊन गेलात तरी उपयोग नसतो ते नवनविन कारणं शोधात राहतात. परंतु सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात. स्वच्छ आणि नीटनेटकं राहणं हा जसा आपल्या सवईचा किंवा स्वभावाचा भाग आहे तसंच अव्यवस्थित राहणं हा त्यांच्या सवईचा किंवा स्वभावाचा भाग आहे. आपण माणूस आणि त्यांचे स्वभाव बदलू शकत नाही. फारतर फार सुवर्णमध्य काढू शकतो. आपण ऑफिसमध्ये जातो, सगळी कामं एकटा माणूस करू शकत नाही म्हणून काही कामं ही इतरांकडून करून घेतो, ज्याला जे काम चांगलं जमतं त्याच्याडून ते करून घ्यावं लागतं, आपलं सगळ्यांशी पटत असू अथवा नसू पण लोकांना सांभाळून घेऊन एकत्रपणे पुढे जावं लागतं. हेच सगळे मॅनेजमेण्ट टेकनिक आपण योग्य पद्धतीने घरात आणि घराच्या नियोजनात वापरले तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे म्हणजे आपले आयुष्य अत्यंत काबाडकष्टात घालवणे असा समज आपण दूर करायला हवा.
  घरातून आपल्याला काहीच मदत मिळत नसेल तर आपण “मदतनीस” ठेवू शकतो. परंतु, ते प्रत्येकालाच जमतं, आवडतं असं नाही. अश्यावेळी काय काय कामं करणं अपेक्षित आहे त्याची एक यादी करून कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा. जी कामं करावीच लागणार आहेत ती बाजूला काढावीत आणि जी कामं नाही केलीत तरी चालतील किंवा नंतर केली तरी चालतील अशी कामं बाजूला काढावीत. आपण एकटीनेच कामं करायची असल्याने आपल्या मर्यादा आपल्यला ठाऊक असणारच. उरलेल्या कामांचा आटापिटा न करता डोकं शांत ठेऊन जमेल तेवढंच काम करावं. घर स्वच्छ, नीटनेटकं, टापटीप असावं हे जरी खरं असलं तरी आपण कामाचा, स्वच्छतेचा तगादा लावल्याने घरात वाद होणार असतील तर आपणच विचार करायला हवा. स्वच्छ, नीटनेटक्या घरात वातावरण प्रसन्न नसेल तर त्या स्वच्छतेचा कितपत उपयोग होतो हे आपणच ठरवायला हवं नाही का ?
 •  

 • आपण केलेल्या कामाचं कौतुक होत नाही
  कोणत्याही व्यक्तीला केलेल्या कामाचं कौतुक केलं की काम करायला उत्साह येतो. साग्रसंगीत स्वयंपाक केल्यावर “आज छान झालाय स्वयंपाक” हे एक वाक्य ऐकलं की आपलं पोट भरतं. तोच नियम इतरांनादेखील लागू होतो. काम करणाऱ्या माणसाला “तुम्हाला काहीच कसं जमत नाही? तुम्ही मला मदत केली तर मला त्याचा त्रासच जास्त होतो, तुमची मदत मला परवडत नाही, तुम्हाला एवढं साधं एक काम जमत नाही, एक काम सांगितलेलं धड करत नाही”, असं बोलल्याने त्याचा काम करण्याचा उत्साह मावळतो. मी काम करूनही बोलणेच जास्त खातो त्यापेक्षा न काम करता खाल्ले तर परवडतील असं वाटायला लागतं. त्यामुळे सगळ्यात मोठा बदल करायला हवा तो म्हणजे ‘समोरच्याने घेतलेल्या कष्टाचे कौतुक करायला हवं’. जर घरातील एखादी व्यक्ती आपली मदत करत असेल तर त्याचं तोंडभरून कौतुक करावं. समजा आज आपल्याला कोणी लसूण सोलून दिला, तर लसूण सोलणं हे काही फार कष्टाचं, खूप मोठ्ठ काम नाही. परंतु त्याने आपल्याला थोडी का होईना मदत झाली नं? “एवढं काय त्यात फक्त चार पाकळ्या तर लसूण सोलला” असं म्हणल्याने पुढच्या वेळी त्या चार पाकळ्याही सोलून मिळत नाहीत. एखाद्याचं तोंडभरून कौतुक केल्याने आपल्याला काहीच त्रास होणार नसतो उलट झाला तर फायदाच होऊ शकतो. त्यामुळे काम कितीही छोटंसं असलं तरीही केलेल्या कामाचं कौतुक केल्याने पुढच्यावेळी काम करायला हुरूप येतो. एखादा माणूस नीटनेटका नाही म्हणजे मूर्ख, अपात्र किंवा वाईट नाही. त्याला तश्या पद्धतीने वागवले तर वाईट वाटू शकते. घरात काम काम करणाऱ्या माणसाने थोडसं जरी काम केलं तर त्यांना प्रोसाहन द्यायला हवं कारण, त्यांना हे मुळातच आवडत नाही , त्यांना हे करायचं नाही, पण फक्त तुम्ही सांगितलं म्हणून ते करत आहेत त्यामुळे जेवढ शक्य असेल तेवढं त्यांच्याशी पॉझीटीव्ह वागायला हवं. त्यांच्या आवडीचं खायला केलं, त्यांना बाहेर घेऊन गेलं किंवा ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्या त्यांच्यासाठी केल्या तर पुढच्या वेळी काम करायला त्यांनाही मजा येईल.

 
आपल्यावर कामाचा कमीत कमी ताण कसा येईल ह्याचा विचार करायला हवा. कामाचा ताण आला की आपली चिडचिड होते. रागाच्या भरात काहीतरी बोललं जातं आणि मग वादविवादाला सुरुवात होते. हे दुष्टचक्र आहे आणि ते थांबवायला हवं. त्यासाठी वेळेचे आणि कामाचे चोख नियोजन हा एक उत्तम उपाय आहे. आपल्याला घरात इतरांनी मदत करणं अपेक्षित असेल तर त्यांना स्वच्छ आणि टापटीप जागेचे फायदे दाखवून दिले पाहिजेत. महत्वाच्या गोष्टी वेळच्या वेळी सापडल्या नाहीत की त्याचे महत्व त्यांना आपोआप कळू शकेल. कामाच्या चोख याद्या हातात दिल्या की कारणं सांगायला वावच उरत नाही. आपण डाएट सुरु केल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी बारीक होत नाही. त्यासाठी थोडासा काळ जावा लागतो. तसंच ह्या बाबतीत सुद्धा आहे. लगेच दुसऱ्या दिवशी अमुलाग्र बदल होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आपणच आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवायला हव्या जेणेकरून आपल्याला कमी त्रास होईल. घर स्वच्छ, नीटनेटकं, टापटीप असावं जे जरी खरं असलं तरी आपण कामाचा, स्वच्छतेचा तगादा लावल्याने घरात वाद होणार असतील तर आपणच विचार करायला हवा. स्वच्छ, नीटनेटक्या घरात वातावरण प्रसन्न नसेल तर त्या स्वच्छतेचा कितपत उपयोग होतो हे आपणच ठरवायला हवं नाही का ?
 
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा. पुन्हा लवकरच भेटू एका नव्या सदरामध्ये..!!

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!