बेसिन, बाथरूम आणि टॉयलेटमध्ये पाण्याचा आणि साबणाचा खूप वापर होत असतो. तरीदेखील ते सतत खराब होत असतात आणि आपल्याला त्याची नित्यनियमाने स्वच्छता करावी लागते. आपल्या घरात किती माणसे राहतात, त्यांचा वापर कसा आहे आणि आपल्याला स्वच्छतेसाठी किती वेळ आहे ह्यावर, टॉयलेटची, बाथरूमची स्वच्छता रोज करायची की एकाड एक दिवसानी करायची की आठवड्याला करायची हे ठरवावं लागतं. जर पाण्यात क्षार जास्त असतील किंवा रिसायकल केलेलं पाणी फ्लशला वापरलं जात असेल तर टॉयलेट लवकर खराब होतं आणि रोज स्वच्छ करावं लागतं. हल्ली बऱ्याचदा बाथरूम आणि टॉयलेट एकत्र असल्याने जागा वाचवण्याच्या हेतूने किंवा सोईस्कर म्हणून वेस्टर्न कामोड बसवलं जातं. अर्थातच स्वच्छतेसाठीही ते बरंच सोपं जातं.
रोजच्या स्वच्छतेला सुरुवात करताना सगळ्यात आधी बाथरूममध्ये ठेवलेले धुवायचे कपडे, टॉवेल धुवायला टाकायचे आणि टॉयलेटबोलमध्ये आणि टॉयलेट सीटवर क्लीनर टाकायचं आणि टॉयलेट लीड लावून बंद करायचं (मी मागे म्हणल्याप्रमाणे कोणतेही क्लीनर स्प्रे केल्यानंतर लगेच स्वच्छतेला सुरुवात करू नये. काही वेळ तसंच ठेवून मग स्वच्छतेला सुरुवात केल्याने कमी कष्टात उत्तम स्वच्छता होते.) पाण्याचे शिंतोडे उडून बेसिन आणि बाथरूममधील आरसे खूप खराब होतात त्यामुळे आता बाथरूममधील आणि बेसिन समोरचे आरसे स्वच्छ करायचे. आधी ग्लास क्लीनर स्प्रे करून नंतर स्क्वीजीने (किंवा काच पुसायच्या नॅप्कीनने) पुसून घ्यायचे. आरसा जास्त चांगला स्वच्छ व्हावा म्हणून आपण जास्त प्रमाणात क्लीनर स्प्रे करतो पण त्यामुळे ते सगळं क्लीनर निघेपर्यंत आपल्यालाच जास्त स्वच्छ करत बसायला लागतं आणि क्लीनर पूर्ण न निघाल्याने राहिलेलं क्लीनर आरश्यावर दिसतं आणि त्यामुळे आरसा लगेच खराब होतो (किंबहुना तो व्यवस्थित स्वच्छ होतच नाही). त्यामुळे कमीत कमी क्लीनर स्प्रे करावं. जर बाथरूममध्ये ग्लास डीवायडर असेल तर तेदेखील ग्लास क्लीनरने रोज पुसून घ्यावे.
त्यानंतर बेसिन आणि बाथरूममधील नळ. पाण्यातील क्षार जमा होऊन नळ खूप लवकर खराब व्हायला लागतात. त्यामुळे ते दरवेळी स्वच्छ करावेत. नळ स्वच्छ करताना त्यावर क्लीनर मारून ओल्या फडक्याने पुसून घेऊन लगेच कोरड्या फडक्याने किंवा टिशू पेपरने कोरडे करावेत. आपण सगळं व्यवस्थित स्वच्छ करतो परंतु, ही शेवटची “कोरड्या फडक्याने / टिशू पेपरने पुसून” घेण्याची स्टेप करत नाही. “आपोआप वाळेल की” असं म्हणतो. पण त्यामुळे स्वच्छ केलेल्या गोष्टींवर पाण्याचे डाग पडतात आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण घेतलेले सगळे कष्ट ‘पाण्यात’ जातात. जर रोज स्वच्छतेला वेळ नसेल तर काही जणं डीसइन्फेक्टन्ट वाईप्सने पुसून घेतात (बाजारात असे डीसइन्फेक्टन्ट वाईप्स मिळतात).
हे सगळं करून होईपर्यंत थोडा वेळ उलटून गेला असेल्याने आता टॉयलेट सीट आणि टॉयलेट बोल स्वच्छ करायला हरकत नाही. टॉयलेट सीट आणि टॉयलेट बोल स्वच्छ करण्यासाठी दोन वेगवेगळे ब्रश वापरायला हवे. (टॉयलेट स्वच्छ करताना, जर ते वॉल माउंट असेल तर भिंतीवरचा भाग नाहीतर टॉयलेटबेससुद्धा स्वच्छ करावा. जर कोपऱ्यात मोठा ब्रश जात नसेल तर जुन्या टूथब्रशचा वापर करून स्वच्छता करावी.) हे दोन्ही स्वच्छ करून झालं की, दोन्ही ब्रश लगेचच स्वच्छ करायचे. ब्रशचे दातरे टॉयलेट बोलच्या मध्यभागी येतील अश्या पद्धतीने ब्रश धरून त्यावर पाणी मारून तो स्वच्छ करायचा. त्यानंतर एका उभट डब्यात/ छोट्या बादलीमध्ये डिशक्लीनर, पाणी आणि डेटॉल किंवा डीसइन्फेक्टन्ट टाकून त्यात टॉयलेटबोलचा ब्रश बुडवून ठेवायचा. थोड्या वेळाने ब्रश बाहेर काढायचा आणि टॉयलेट सीट ‘वर’ करून (आतल्या बाजूला म्हणजेच टॉयलेट बोलच्या बाजूला ब्रशचे दातरे येतील अश्या पद्धतीने) टॉयलेट रिमवर आडवा ठेवायचा आणि टॉयलेट सीट परत खाली ठेवायचे. म्हणजे टॉयलेट सिट आणि टॉयलेट रीममध्ये हा ब्रश अडकून बसतो आणि त्याचे निथळणारे पाणी टॉयलेटमधेच पडते. थोड्या वेळानंतर हा ब्रश काढून जागच्या जागी ठेवू शकता. ओला ब्रश तसाच ठेवला तर खराब होण्याची जंतू पसरण्याची शक्यात असते. हे सगळं झाल्यावर टॉयलेट सिट टिशू पेपरने कोरडं करून घ्या. हल्ली फ्लशटॅंकमध्ये टाकण्यासाठी छोट्या वड्या/ बार मिळतात किंवा कमोड रीमला लावण्यासाठी हूक स्टाईल हँगिंग साबणाची वाडी असते. ह्यामुळे दरवेळी फ्लश करताना पाण्यासोबत क्लीनर/ साबणपण फ्लश होत असल्याने रोजच्या स्वच्छतेचा त्रास जरा कमी होतो. इंडियन सिस्टीम टॉयलेटसुद्धा अश्याच पद्धतीने स्वच्छ करावं.
आउटलेटला असणाऱ्या जाळीमध्ये केस किंवा इतर काही गोष्टी अडकून राहतात त्यामुळे ती जाळी लवकर खराब होते. ह्या जाळीतल्या अडकलेल्या गोष्टी रोजची साफसफाई करताना काढून टाकायच्या. त्यानंतर जमिनीवर पाणी मारून खराट्याने पाणी आउटलेटपर्यंत नेऊन शक्य तितकं कोरडं करायचं (खराट्याऐवजी मोठ्या आकाराचा स्क्वीजीसुद्धा बाजारात उपलब्ध असतो त्याने जास्तीत जास्त पाणी पुढे ढकलले जातं आणि बाथरूम लवकर कोरडं होतं ). थोडावेळ बाथरूमचं दार उघडं ठेवायचं आणि एक्झॉस्ट फॅन लावावा. अश्या पद्धतीने बाथरूमची स्वच्छता करायला साधारण २० मिनिटं तरी रोज द्यावी लागतात. जर आपल्याला रोज एवढं वेळ देणं शक्य नसेल तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आपण करू शकतो किंवा करायला हव्यात ह्याचा विचार करा आणि त्यानुसार स्वतःची दैनंदिनी ठरवा. बेसिन, बाथरूम आणि टॉयलेटची स्वच्छता करताना कोणकोणत्या गोष्टी स्वच्छ कराव्यात ह्याची मी एक यादी तयार केली आहे. ब्लॉगच्या शेवटी ह्या यादीची लिंक दिलेली आहे.
बाथरूमच्या स्वछातेमध्ये काही कामं आपण आठवड्यालासुद्धा करू शकतो. उदा: १. बादली आणि मग साबणाने घासून स्वच्छ करायचे, २. अंघोळीच्या वेळी बसायचा स्टूल साबणाने घासून स्वच्छ करायचा, ३. फ्लोअर टाइल्स आणि भिंतींला असणाऱ्या टाइल्स साबणाने किंवा क्लीनर टाकून ब्रश / खराट्याने घासायच्या, ४. दोन टाइल्समध्ये दिसणारं ग्राउट स्वच्छ करायचं, ५. आउटलेटची जाळी घासून स्वच्छ करायची, ६. शॉवर, सोप केस, बाथरूम स्लीपर इत्यादी गोष्टी स्वच्छ करायच्या. बाथरूमच्या स्वछातेमध्ये काही कामं आपण महिन्यालासुद्धा करू शकतो. उदा: भिंतींवर तयार झालेले जाळे/ जळमटं काढायचे, खिडकी, ट्यूब/बल्ब/ लॅम्प, एक्झॉस्ट फॅन,स्वीचबोर्ड, दाराचे हॅन्डल्स स्वच्छ करायचे, गिझर बाहेरच्या बाजूने स्वच्छ करायचं. बाथरूममधले एक्झॉस्ट फॅन फार खराब होत नाहीत त्यामुळे ते साध्या डिश लिक्विड सोपने स्वच्छ करू शकता. टॉयलेट आणि बाथरूममध्ये लावलेलं एअरफ्रेशनर, फ्रॅग्रन्स डीफ्युजर वेळच्या वेळी बदला. त्यासाठी इलेक्ट्रिक मशीन असेल तर तेसुद्धा महिन्याला स्वच्छ करा.
बेसिन, बाथरूम जेवढं आतून स्वच्छ करणं गरजेचं आहे तेवढंच ड्रेनेज लाईन स्वच्छ ठेवणं किंवा ती तुंबणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे. ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यासाठी बाजारात तयार पावडर मिळतात आणि त्याने स्वच्छसुद्धा होते. परंतु, बाजारात मिळणारे ड्रेनेज क्लीनर्स हे खूप हार्श आणि टॉक्सिक असतात. स्वच्छता करताना ते इतर कुठे पडले (मार्बलचा कट्टा, स्टील इ.) तर स्टील, मार्बल खराब होऊ शकतं (बऱ्याचदा त्याच्या वापराने हातसुद्धा खराब होतात). त्यामुळे आम्ही घरच्या घरी एक उपाय करून बघितला. तुम्हीसुद्धा तो करून बघू शकता. एका पातेल्यामध्ये ५-६ कप पाणी उकळवत ठेवायचं. पाणी उकळल्यानंतर त्यात १ कप टेबल सॉल्ट आणि १ कप बेकिंग सोडा घालून ढवळून घ्यायचं आणि ते ड्रेनेज आऊटलेट मध्ये हळूहळू ओतायचं. त्यानंतर, हळूहळू, एक कप व्हेनिगर ड्रेनेज आऊटलेटमध्ये ओतायचं. हळूहळू बुडबुडे यायला लागतील. बुडबुडे आल्यानंतर २-३ मिनिटं तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा गरम पाणी ओतायचं. हे सगळं करून झाल्यावर आऊटलेटवरची जाळी आठवणीने स्वच्छ करायची आणि व्हेनिगर किंवा मीठाचे कण राहणार नाहीत याची काळजी घ्यायची.
१. बेसिनची स्वच्छता :
बेसिनची स्वच्छता करताना बेसिनमध्ये बेकिंग सोडा टाकायचा आणि ओल्या स्क्रबने बेसिन घासायचे. त्यानंतर पाणी आणि व्हेनिगर सम प्रमाणात एकत्र करून स्प्रे करायचं व पाणी टाकून पुसून घ्यायचं. रोज रात्री झोपण्यापूर्वी बेसिन बोल, बेसिनचा नळ आणि बेसिनच्या बाजूचा कट्टा/ सर्फेस (असल्यास) स्वच्छ करावा. बाजारातल्या हार्श केमिकल्सचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करावा आणि त्याऐवजी घरी तयार केलेले क्क्लीनर्स वापरावेत. हार्श केमिकल्समुळे पाणी खूप जास्त प्रमणात दुषित होते. आणि त्याचा आपल्यालाही त्रास होऊ शकतो. कोणत्या प्रकारचे बेसिन कश्या प्रकारे स्वच्छ करायचे ह्याचा मी एक तक्ता तयार केला आहे त्याची लिंक ब्लॉगच्या शेवटी दिलेली आहे. जर आपल्याला बेसिनसोबत युजर मॅन्युअल दिलेलं असेल तर त्यात ह्याबद्दल माहिती दिलेली असते तीसुद्धा वाचा. युजर मॅन्युअल नसेल तर ह्या तक्त्याचा वापर करु शकता. टूथपेस्ट, क्रीम, लोशन्स, मेकअपचे समान जर बेसिनमध्ये पडलं, सांडलं असेल तर ताबडतोब पुसून घ्या कारण ते वाळल्यानंतर त्याचे डाग पडतात आणि ते काढायला त्रास होतो.
आपण वापरात असणारा टूथब्रश फारसा स्वच्छ करत नाही. पण जर तुम्हाला तो स्वच्छ करायचा असेल तर गरम पाण्यात किंवा माउथवॉशमध्ये थोडावेळ ठेवून मग कोरड्या हवेत (दातरे वरच्या बाजूला येतील अश्या पद्धतीने ) उभा ठेवून वाळवायचा. टूथब्रश होल्डर तीन महिन्यातून एकदा तरी स्वच्छ करायचं.
बेसिनखालची जागा मोकळी असते तिथे आपण जादाचं सामन/ टॉयलेटरी ठेवू शकतो. हे सामान जर वेगवेगळ्या डब्यात / बॉक्समध्ये/ बास्केटमध्ये ठेवलं तर ते साठवून ठेवणं आणि वापरणं सोपं जातं उदा: १. साबण : – अंगाचा साबण/ बॉडी वॉश, कपड्याचा साबण आणि वडी, पांढऱ्या कपड्यांच्या स्वच्छतेसाठी असणारं लिक्विड, लोकरीच्या कपड्यांच्या स्वच्छतेसाठीचं लिक्विड, नीळ, स्टार्च पावडर २. शॅम्पू , बॉडीस्क्रब, सिरम्स, फेस वॉश, ३. स्क्रब, स्पंज, ब्रशेस, ४. वेगवेगळे क्लीनर्स, ५. ट्रॅव्हलिंग टॉयलेटरी, ६. शेविंगचे सामान. हे जादाचं सामान जर बाथरूममध्ये ठेवलं तर तिथे सगळा पसारा होतो आणि गोष्टींची सांडलवंड होण्याची शक्यता असते. रोजच्या स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सामनाचा एक डबा करून तोसुद्धा इथे ठेवू शकतो. त्यामुळे रोज सामान हुडकत बसावं लागणारं नाही. ह्या डब्यात १. नॅप्किन्स, २. पेपर टॉवेल, ३. स्क्वीजी, ४. बाथरूम क्लीनर, टॉयलेट क्लीनर, ग्लास क्लीनर, ५. डीसइन्फेक्टन्ट ६. स्पंज ६. जुना टूथब्रश (टॉयलेट ब्रश टॉयलेटमधेच ठेवलेला असल्याने तो ह्यात लिहिलेला नाही) ह्या गोष्टी ठेवू शकता.
२. बाथरूमची स्वच्छता :
शॅम्पूच्या बॉटल्, साबणाच्या वाड्या, बॉडीवॉश ह्या आणि ह्यासारख्या इतर वस्तू इथे साठवून ठेऊ नका. जर इथे जास्त गर्दी केली तर घाई घाईत काढताना आणि ठेवताना खाली पडून सांडलवंड होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढे आवश्यक आहे तेवढेच इथे ठेवावे बाकीचे सगळे बेसिनखाली स्टोअर करून ठेवा. सर्व नळ किंवा कोणत्याही बाथरूम फिटिंगची स्वच्छता करताना मुख्य काळजी घ्यावी लागते ती म्हणजे त्यावरचं कोटिंग जाणार नाही याची. त्यामुळे, असिड, ब्लीच, अमोनिया यासारखे गोष्टी त्यापासून दूर ठेवा. हार्श क्लीनर्सने स्वच्छ करण्यापेक्षा माइल्ड क्लीनर आणि पाणी वापरून टूथब्रशच्या सहाय्याने डाग काढू शकता.
पाण्यातील क्षारांमुळे शॉवर पटकन खराब होतो, त्याला असणारी भोकं बुजायला लागतात. शॉवर स्वच्छ करण्यासाठी अर्धं कापलेलं लिंबू घेऊन ते शॉवरवर सर्व बाजूनी फिरवायचं आणि २-३ मिनिटं तसंच ठेवायचं. त्यानंतर जुन्या टूथ ब्रशने घासायचं. हे करून झालं की गरम पाण्याचा नळ चालू करायचा. त्या प्रेशरने आणि गरम पाण्याने घाण बाहेर पडेल आणि शॉवरची छिद्र मोकळी होतील.
बाथरूम स्वच्छतेवरचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्ही कायकाय करता तेसुद्धा कळवा. पुन्हा भेटू पुढच्या भागात….!!!