स्वच्छतेला सुरुवात करण्यापूर्वी काही तयारी केली तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो असं मला वाटतं. त्यामुळे घरातली स्वच्छता सुरु करण्यापूर्वी काय काय तयारी करावी याबद्दल आपण आज बोलणार आहोत.
१. आपण ड्रॉवर, कपाट आवरायचं म्हणलं की त्यातला सगळा पसारा बाहेर काढतो. त्यामुळे टेबल, ओटा ह्यासारखे सर्फेस रिकामे करून ठेवावेत. टेबल खराब होऊ नये म्हणून त्यावर टाकायला रद्दी पेपर किंवा एखादं मोठ्ठ खराब कापड/जुनी बेडशीट/साडी काढून ठेवावी. मला स्वतःला आवरआवरी करताना पसारा/समान जमिनीवर ठेवण्याऐवजी कोणत्याही टेबल/ ओटा अश्या उंचीवर असणाऱ्या सर्फेसवर ठेवलेलं जास्त आवडतं (अगदीच सर्वात शेवटचा किंवा जमिनीलागतचा कप्पा सोडून) आपण एकदा खाली मांडी घालून बसलो की मग सतत उठायचा कंटाळा येतो आणि मग उठल्यावर ठेवू, उठल्यावर करू असं म्हणून निम्मी कामं तशीच राहतात.
२. स्वच्छतेच्या सामानाचा एक डबा/ बास्केट तयार करावं जेणे करून स्वच्छतेसाठी लागणारं सगळं सामान आपल्याला हातासरशी मिळेल. आत्ता आपल्याजवळ सामान नाही आणि उठायचा कंटाळा आलाय म्हणून, ‘आहे त्या गोष्टीत कसंतरी केलं’ असं होणार नाही. स्वच्छतेच्या सामानाचा असा डबा बनवला तर वेगवेगळ्या खोलीत स्वच्छता करताना समान इकडून तिकडे नेणं खूप सोपं जातं आणि समान हरवत नाही आणि स्वछातेसाठीचं समान शोधण्यात खर्च होणारा वेळ आणि कष्ट कमी होऊ शकतात.
स्वच्छता मोहिमेसाठी सर्वसाधारणपणे लागणाऱ्या सामानाची मी एक यादी केली आहे. ती यादी सोबत जोडत आहे. आपापल्या गरजेनुसार त्यात कदाचित बदल करावा लागू शकतो. पण जास्तीत जास्ती गोष्टींचा ह्यात समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. (आपण बऱ्याचदा गोष्टी त्यांच्या ब्रँडने ओळखतो पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ब्रँड प्रसिद्ध असल्याने मी कुठेच कोणत्याही ब्रँडचे नाव लिहिले नाही. )
३. साफसफाईसाठी लागणारे वेगवेगळे क्लीनर मी वेगवेगळ्या स्प्रे बॉटल्समध्ये भरून ठेऊन त्या बॉटल्सला स्टीकर लावून नावं दिलेली आहेत. बाजारातून आयते आणलेले हे क्लीनर खूप स्ट्रॉंग असतात. दरवेळी एवढ्या स्ट्रॉंग क्लिनरची गरज नसते. गरजेपेक्षा जास्त हार्श क्लीनर वापरल्याने सर्फेससुद्धा खराब होतात. स्प्रे बॉटल्समध्ये निम्म्याहून जास्त प्रमाणात पाणी व थोड्या प्रमाणात क्लीनर घालून एक मिश्रण तयार ठेवते. ह्यामुळे क्लिनरचीसुद्धा बचत होते. ह्या स्प्रे बॉटल्स आणि त्यावरच्या स्टीकरचे आणिक काही फायदे म्हणजे १. कोणतं क्लीनर कशासाठी वापरायचं हे पटकन लक्षात येतं (घरातल्या सगळ्यानांच 😉 ); २. क्लीनर एखाद्या वाटीत किंवा भांड्यात काढून ठेवलं की ते सांडण्याची शक्याता असते; ३. स्प्रेमुळे ते क्लीनर योग्य जागी आणि किंचितश्या प्रेशरने मारता येते.
४. दिवसभर घरात साफसफाई केल्याने आपल्याला थकायला होतं. दिवसभर एवढं काम केल्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्यामुळे :
- संध्याकाळचे जेवण सकाळीच करून ठेवावं ; किंवा
- संध्याकाळचा मेनू सुटसुटीत ठेवावा आणि त्याची शक्य तेवढी पूर्वतयारी करून ठेवावी ; किंवा
- हल्ली ‘रेडी टू इट’ भरपूर गोष्टी मिळतात (किंवा तसं आपण घरीसुद्धा ‘रेडी टू इट’ उपमा/ मसाले भात वगैरे करून ठेवू शकतो) त्यापैकी काही करू शकतो; किंवा,/li>
- आवडत्या हॉटेलमधून पार्सल मागवू शकतो.
रात्रीच्या जेवणाची आधीच सोय झाली असल्याने आपण निर्धास्तपणे साफसफाई करू शकतो.
५. मी आणिक एक गोष्ट करते. ज्या दिवशी साफसफाई करायची असेल त्याच्या आदल्या दिवशी लिंबाचं सरबत किंवा आईस-टी करून फ्रीजमध्ये ठेवते. साफसफाई करताना खूप कंटाळा आला किंवा दमल्यासारखं वाटलं की फ्रिजमधली सरबताची बाटली बाहेर काढते. त्या एक ग्लास सरबताने पण खूप छान वाटतं.
६. स्वच्छता , साफसफाई ह्यामध्ये काही जणांना अजिबात इंटरेस्ट नसतो पण आपल्याला त्याला इंटरेस्टिंग आणि आनंददायी बनवावं लागतं. अन्यथा त्या कामाचा आपल्यावर ताण निर्माण होतो आणि पुढच्या वेळी ते करावंसं वाटत नाही. जर तुम्हाला गाणी ऐकायला आवडत असतील तर आवडत्या गाण्यांची प्ले लिस्ट तयार करून ठेवा. रेडीओ ऐकायला आवडत असेल तर रेडीओ ऐकत ऐकत काम करा. अश्याने वेळ पटकन जातो आणि कामाचा ताण जाणवत नाही.
७. उठबस करायला सोपी जाईल म्हणून साफसफाईच्या वेळी मी अत्यंत ढगळे कपडे वापरते. शक्यतो जुनेच कपडे वापरते म्हणजे डाग पडले आणि नाही निघाले तरी चालू शकतं. तुम्हाला गरज वाटत असल्यास तुम्ही एप्रन वापरू शकता.
८. कचऱ्यात टाकून द्यायचे सामान, डोनेट करायचे सामान जास्त असेल तर आधीच बॉक्स बाहेर काढून ठेवावेत म्हणजे आयत्यावेळी शोधाशोध करावी लागणार नाही.
तुम्हाला हा स्वच्छतेच्या तयारीवरचा लेख कसा वाटला हे जरूर कळवा. तुम्ही काय काय तयारी करता हेसुद्धा कळवा. पुन्हा भेटू लवकरच… एका नव्या सदरामध्ये..!!