Close
 • Gha Gharacha

स्वयंपाकघर : कसं स्वच्छ करायचं ? (भाग – १ )

मागच्या भागात आपण स्वयंपाकघरातल्या कोणकोणत्या वस्तू टाकून देऊ शकतो याची यादी तयार केली. त्या वस्तू काढून टाकल्यानंतर उरलेल्या वस्तूंची स्वच्छता कशी करायची याबाबत आपण ह्या भागात बोलणार आहोत. मी मागे म्हणल्याप्रमाणे घरातली कोणत्याही खोलीची स्वच्छता ही छतापासून खालच्या दिशेने व्हायला हवी. त्यामुळे आता आपण त्याच क्रमाने जाणार आहोत.

१. छत / सिलिंग :
स्वयंपाकघरात फोडणीमुळे आणि इतर स्वयंपाकच्या पद्धतीमुळे बऱ्याचश्या गोष्टी फारच पटकन खराब होतात. स्वयंपाकाचा वास / धूर घरात कोंडला जाऊ नये म्हणून आपण स्वयंपाक करताना खिडक्या उघड्या ठेवतो आणि त्यामुळे हवेसोबत खूप धूळ येते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर ह्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे सगळ्यात आधी जाळेजळमटे झाडूने काढून टाकावी. जर स्वयंपाकघराला वॉशेबल पेंट दिलेला असेल तर छत पुसून घ्यायला हरकत नाही. एका भांड्यात एक वाटी पाण्यात ४-५ चमचे डिश लिक्विड सोप असं प्रमाण घेऊन जाड स्पंजने पुसून घेऊ शकतो. फक्त स्पंज व्यवस्थित पिळून घ्यावा नाहीतर आपल्याच अंगावर पाणी पडेल.
हल्ली स्वयंपाकघरात पीओपी करण्याची पद्धत सुरु झाली आहे. ह्या पीओपीमध्ये जर डिझाईन केलेले असेल तर त्यात धूळ आणि घाण अडकून राहते अश्या वेळी छत अवश्य स्वच्छ करावे. छत स्वच्छ करताना आधी कोपऱ्यातल्या छोट्याश्या भागात स्वच्छ करून बघावे. रंग खराब होत नाही ह्याची खात्री पटल्यावरच पूर्ण छताच्या स्वच्छतेला सुरुवात करावी. छत पुसून घेताना डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करून उजव्या कोपऱ्यापर्यंत अश्या पद्धतीने इंग्रजी “U” आकारासारखे पुसून घ्यावे. गोलगोल हात फिरवण्याने धूळ आणि घाण आणल्याआत फिरत राहते आणि स्वच्छता व्यवथित होत नाही. घरात जर व्हॅक्यूम क्लीनर असेल तर त्याने सुद्धा छत स्वच्छ करता येते.

स्वयंपाकघरात जास्तीत जास्त स्टोअरेज हवं असल्याने जवळजवळ सगळ्या भिंती फर्निचरमध्ये झाकून गेलेल्या असतात. पण भिंतींचा काही भाग जर दिसत असेल तर तोदेखील स्वच्छ करावा.

२. सिलिंग फॅन :
आळस ही शोधाची जननी आहे असं माझा भाऊ म्हणतो. माझ्या काकूने त्याला ‘फॅन पुसून घे’ आणि फॅन पुसल्यावर खाली पडणारा कचराही उचल असं सांगितलं होतं. तर माझ्या भावाने उशीचा आभ्रा घेतला आणि फॅनचं पातं आभ्र्यामध्ये घातलं आणि पुसून घेतलं. सगळी धूळ त्या आभ्र्यामध्ये पडली. तेव्हापासून मीसुद्धा अश्याच पद्धतीने फॅन पुसायला लागले.
फॅन पुसताना आधी कोरड्या फडक्याने पुसून घ्यावा. जर उशीचा आभ्रा वापरणार नसू तर मोठं फडकं घेऊन पात्याच्या दोन्ही बाजू कव्हर होतील अश्या पद्धतीने फॅनचं पातं पुसून घ्यावं. हल्ली, हातात ग्लोव्हज सारखं घालता येतील अश्या पद्धतीचे नॅप्कीन्स निघाले आहेत. आपण त्याचासुद्धा वापर करू शकतो. तो नॅप्कीन हातात घालायचा आणि फॅनचं पातं मध्ये धरायचं. एकदा पात्यांवरची धूळ निघाली की डायल्युट केलेल्या ग्लास क्लीनरने फॅन पुसून घ्यावा आणि मग पुन्हा एकदा स्वच्छ कोरड्या फडक्याने पुसून घ्यावा.

३. दिवे/ ट्यूबलाईट :
जी गत फॅनची तीच दिव्यांचीसुद्धा. दिव्यांवरसुद्धा खूप जाळे जळमटे तयार होतात. त्यामुळे वर्षातून एकदा तरी ह्याकडे लक्ष द्यायला हवं. आधी झाडूने सगळी जळमटं काढून टाकावीत आणि मग बल्ब किंवा ट्यूब अत्यंत हलक्या हाताने, हलक्याश्याओल्या फडक्याने पुसून घ्याव्यात. बल्ब ओल्या फडक्याने पुसण्याआधी, तो गरम नाही याची खात्री करा. बल्बचे होल्डर किंवा ट्युबची खालची पट्टीसुद्धा पुसून घ्यावी. इथे पाण्याचा कमीतकमी वापर करावा.

४. माळा :
हल्लीच्या घरांना माळे नसतात. परतू जुन्या घरांमध्ये माळे असतात आणि त्यात अक्षरशः ब्रम्हांड मावलेलं असतं. बऱ्याचश्या न लागणाऱ्या वस्तू ‘कधीतरी लागतील’ म्हणून आपण माळ्यावर ठेवलेल्या असतात. त्यातल्या सगळ्या जुन्या, अनावश्यक गोष्टी, अप्लायन्सेसची खोकी, जुने/ तुटलेलं ड्रम, प्लास्टिकच्या वस्तू काढून टाकाव्या.
माळ्यावरही जळमटं झाली असतीलच तीदेखील काढावीत. माळ्यावर खाली पेपर टाकला असेल तर तो बदलावा. आमच्या जुन्या घरात आईने माळा स्वच्छ करता यावा म्हणून आतल्या बाजूने टाइल्स लावल्या होत्या. तसं असेल तर त्या पुसून घ्याव्यात. माळा बराच मोठा आहे त्यामुळे बसेल तेवढं समान माळ्यावर ठेवू उरलेलं काढून टाकू असं म्हणण्यापेक्षा ‘जेवढा जास्त माळा रिकामा ठेवता येईल तेवढा जास्त रिकामा ठेवू’ असा प्रयत्न करावा. बाकी प्रत्येकाच्या माळ्यावर असणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असतात त्यामुळे त्यांची यादी कारणं जरा अवघडच आहे.

५. स्वीच बोर्ड :
घरातल्या इतर स्वीचबोर्डच्या मानाने स्वयंपाकघरातले स्वीचबोर्ड जास्त खराब होतात. बटण चालू बंद करताना कधी कधी आपले खरकटे हात लागतात त्यामुळे स्वीचबोर्ड खराब होतात. ते खरंतर ते वेळच्या वेळी पुसले तर उत्तम. परंतु जर तसं नाही करता आलं तर हलक्याश्या ओल्या फडक्याने स्वीचबोर्ड पुसून घ्यावा. इथे मात्र पाणी किंवा क्लीनर जास्त प्रमाणात वापरू नये. पाणी बटणामधून आत जाणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी.

६. ओव्हरहेड कॅबिनेट्स :

  • कपाटातला सगळा पसारा बाहेर काढून, ओट्यावर किंवा टेबलावर ठेवून त्याचे दोन भाग करावेत. १. टाकून द्यायच्या वस्तू आणि २. ठेवायच्या वस्तू. ज्या गोष्टी खराब झाल्या आहेत, एक्स्पायरी डेट उलटून गेली आहे, यापुढे लागणार नाहीत अश्या वस्तू/ पदार्थ टाकून द्यावेत. तुटलेली झाकणं, चिरलेले डबे, डबल असणाऱ्या आणि न लागणाऱ्या अश्या सर्व गोष्टी टाकून द्याव्यात. (स्वयंपाकघरातल्या कोणत्या वस्तू टाकून द्यायच्या ह्यची एक यादी केली आहे, त्याची लिंक सोबत जोडत आहे.) स्वयंपाकघरातल्या कोणत्या वस्तू टाकून द्यायच्या
  • ज्या वस्तू / गोष्टी लागणार आहेत त्या तात्पुरत्या दुसऱ्या भांड्यात काढून ठेवाव्यात आणि सगळे डबे घासून घ्यावेत.
  • कपाटात खाली ठेवलेला पेपर किंवा लायनर बाहेर काढून संपूर्ण कप्पा आधी कोरड्या फडक्याने आणि मग क्लीनरने स्वच्छ पुसून घ्यावा. कप्पा पूर्ण कोरडा झाला की, पेपर असल्यास जुना काढून टाकून नविन पेपर घालावा आणि लायनर असल्यास ते साबणाच्या पाण्याने स्वच्छ करून पूर्ण कोरडं झाल्यानंतरच आतमध्ये ठेवावं.
  • वापरायच्या दृष्टीने सोपं जाईल असा विचार करून लागणाऱ्या वस्तू लावून ठेवाव्यात. स्वयंपाकघराच्या विभागांप्रमाणे एका कामासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, भांडी एका ठिकाणी ठेवल्या तर आपल्याला सोईचं जातं. मी स्वयंपाकघराचे ५ विभाग केले आहेत :
   – स्वयंपाक
   – स्वयंपाकाची तयारी
   – धान्यसाठा
   – भांडीकुंडी
   – विद्युत उपकरणं
   स्वयंपाकघराचे भाग आणि त्यात येत असणाऱ्या गोष्टी ह्याबद्दल मी मागे एक ब्लॉग लिहिला होता. त्याची लिंक सोबत जोडत आहे. हा लेख जरूर वाचा.
   स्वयंपाकघराचे विभाग

 

 • स्वयंपाकघरातील भांडी लावताना मी त्यांचे कश्या प्रकारे विभाग केले आहेत हे थोडक्यात सांगते.
  क्र. धान्यसाठा भांडीकुंडी
  १. धान्य ताट, ताटली, वाट्या
  २. डाळी पाण्याची भांडी
  ३. पीठं चमचे

  • अन्न शिजवताना लागणारे
  • जेवायला वाढताना लागणारे
  • जेवताना/खाताना लागणारे
  ४. छोटे पदार्थ ( साखर, रवा, तीळ इत्यादी) तव्यांचे प्रकार
  ५. मोठे पदार्थ ( चुरमुरे, भडंग, पोहे, चिंच, लाह्या, शेवया इत्यादी) पातिले, भांडी आणि छोटे कुंडे
  ६. उपवासाचे पदार्थ कुकर
  ७. सुका मेवा तेल, तुपाची भांडी
  ८. तळणीचे पदार्थ जादाची भांडी
  ९. मसाले इतर
  १०. इतर क्युझीन तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ( पास्ता, न्युडल्स इत्यादी) क्रोकरी
  ११. बेकिंगचे सामान
 • एक किलो साखर ज्या डब्यात मावते त्याच डब्यात एक किलो चुरमुरे मावणार नाहीत म्हणून पदार्थांचा आणि पर्यायाने डब्यांचा आकार लक्षात घेऊन मी छोटे पदार्थ आणि मोठे पदार्थ असे वर्गीकरण केले आहे. तुम्ही तुमच्या सोईनुसार, वापरानुसार पदार्थांचे, वस्तूंचे वर्गीकरण करू शकता.
 • तुम्हाला सोईचे असल्यास रोजच्या स्वयंपाकचे दोन कप्पेसुद्धा करू शकता. त्यात पिठाचा डबा, डाळ, तांदूळ, पोळपाट- लाटणं, कुकरची भांडी अश्या वस्तू ठेवू शकता.
 • घरामध्ये शक्य तितक्या गोष्टींना मी लेबलिंग केलं आहे. लेबलिंग केल्यामुळे घरातल्या इतर व्यक्तींना वस्तू / पदार्थ शोधणं सोपं जातं.

आज इथेच थांबूया. स्वयंपाकघराच्या उरलेल्या स्वच्छतेसाठी पुन्हा भेटूया नविन सदरामध्ये…!!

3 thoughts on “स्वयंपाकघर : कसं स्वच्छ करायचं ? (भाग – १ )

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!