Close
  • Gha Gharacha

पहिले (दोन ) परदेश प्रवास

माझे पहिले दोन परदेश प्रवास हे जरा नाट्यमय होते. मी दहावीत असताना आम्ही ६ जणी शाळेतल्या मैत्रिणी लंडनला गेलो होतो. साधारण १७-१८ दिवसांचा दौरा होता. त्यात आम्ही ३ वेगवेगळ्या गावांमध्ये जाणार होतो आणि आमचा शेवटचा मुक्काम लंडनला होता. आमच्यातल्या सगळ्या जणींचा तो पहिलाच परदेश प्रवास होता. त्यावेळी इंटरनेटसुद्धा नुकतच वापरायला लागलो होतो परंतु, ‘कोणत्याही प्रश्नावर गुगल केलं की काही नं काही माहिती मिळते’ एवढी माहिती आम्हाला तेव्हा नव्हती. लंडनमधल्या मैत्रिणींशी संपर्क साधता यावा म्हणून मी इमेल आयडी तयार केला होता आणि इमेल पाठवला की तिचं उत्तर येईपर्यंत दर दोन तासांनी लॉग इन करून बघायचे. लंडनला गेल्यावर कुठे कुठे आणि कसं कसं जायचं कुठे राहायचं ह्या सगळ्याची इथूनच आखणी झालेली होती. बाबांनी मला एक मोबईल आणि इंटरनशनल रोमिंग असणारं सिमकार्ड असं सोबत नेण्यासाठी म्हणून घेऊन दिलं होतं. पण दुर्दैवाने मुंबई सोडल्यावर त्या फोनने आमची साथ देणं बंद केलं. त्यावेळी फॉरेक्स कार्ड वगैरेची एवढी माहिती नव्हती. त्यामुळे सगळी करन्सी कॅशमध्ये कन्व्हर्ट करून घेऊन गेलो होतो. लंडनपर्यंतचा प्रवास अगदी ठरल्याप्रमाणे झाला. त्यावेळी डिजिटल कॅमेरे एवढे सर्रास वापरले जात नव्हते. आम्हा सगळ्यांकडे कोडॅकचे, जुन्या पद्धतीचे, रोल घालून फोटो काढायचे कॅमेरे होते. फक्त एका मैत्रिणीकडे डिजिटल कॅमेरा होता. आम्ही लंडनमध्ये फिरायला बाहेर पडल्यानंतर लंडन ब्रिजजवळ, हा आमचा एकमेव डिजिटल कॅमेरा हरवला. आम्ही खूप वेळ शोधत होतो पण तरीही तो सापडला नाही. त्याचं दु:ख विसरून आम्ही कसंबसं लंडनआय आणि आजूबाजूच्या ठिकाणी फिरायला लागलो. पण मनात मात्र सतत त्या कॅमेराची आठवण येत होती. शेवटच्या दिवशी शुक्रवार होता. आम्ही जमेल तेवढं सगळं बघायचं म्हणून खूप हेक्टिक प्लॅन केला होता. शुक्रवारी… अगदी ऐनवेळी आम्हाला असं कळालं की आमच्यातल्या एका मैत्रिणीचा.. प्रियांकाचा पासपोर्ट सापडत नाहीये. आम्ही खूप शोधाशोध केली पण पासपोर्ट काही सापडेना. विमानाची वेळ जवळ येत होती. काय करावं हे सुचत नव्हतं. आपलं काहीही हरवलं की पोलीस कंप्लेंट करावी लागते एवढंच आम्हाला माहित होतं. आम्ही रस्त्याने जाताना पोलीस स्टेशन दिसतंय का कुठे असं बघत होतो. विमान तळावर पोचलो आणि तिथे जाऊन चेक इन करून घेणाऱ्या स्टाफपैकी एका ताईचं, आमच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये डोकं खाल्लं. तेव्हा आम्हाला असं कळलं की आता प्रियांका आमच्यासोबत येऊ शकणार नाही आणि उद्या आणि परवा विकेंड असल्याने, पुढचे दोन दिवस कामकाज बंद असल्याने तिला इंडियन एम्बसीमध्ये जाता येणार नाही. सोमवारी ऑफिस उघडल्यावर तिची फाईल पुढे प्रोसेस होईल आणि ती मंगळवार किंवा बुधवारच्या विमानाने परत भारतात येऊ शकेल. प्रियांका आत्ता आमच्यासोबत परत येऊ शकणार नाही हे कळाल्यावर आम्ही एकदम हतबुद्ध झालो. धावत जाऊन फोनबूथ शोधलं आणि पटकन घरी फोन केला. बाबा मला म्हणाले की मला ५-७ मिनिटांत परत फोन कर तोपर्यंत मी काही सोय होतिए का ते बघतो. मध्यरात्री १.३० – २ वाजता आमचे पालक जमेल त्या लोकांना फोन करत सुटले होते. मी दर ५-७ मिनिटांनी फोन बूथवर पळत येऊन ५ पौंडाचं नाणं घालून एकच प्रश्न विचारात होते, “काही कळलं का?” प्रियांकाला एकटीला सोडून आम्ही सगळ्या जणींनी निघून येणं मला प्रशस्त वाटत नव्हतं. “प्रियांकाची अडचण लक्षात घेऊन आम्ही तिची सोय करू शकतो पण तुझी सोय आम्हाला विनामूल्य करता येणार नाही” असं मला तिथल्या ऑफिसरने सांगितलं. आयत्यावेळी काढलेलं लंडन-मुंबई तिकीट लाखांमध्ये जात होतं. मी पुन्हा बाबांशी बोलायला म्हणून फोनबुथकडे धाव घेतली. “बाबा, मला इथे थांबायचं झालं तर विमानाचा आणि राहण्याचा खर्च खूप आहे मी काय करू? पटकन सांगा, प्लीज” क्षणाचाही विलंब न करता बाबा मला “थांब” म्हणाले होते. उद्या सकाळपर्यंत मी पैसे पोचवायची व्यवस्था करतो. काळजी करू नकोस. मी परत पुढची खटपट करायला चेक इन काउंटरपाशी गेले. त्या ऑफिसर लोकांमध्ये , मी प्रियांकासोबत राहू शकते किंवा नाही ह्यावर घनघोर चर्चा चालू झाली होती. मी अतिशय केविलवाणं तोंड करून, “मला प्लीज राहू द्या” अशी विनंती करत होते आणि मधल्या वेळात फोनाफोनी करायला फोन बूथवर धाव घेत होते. बाबांना शेवटचा फोन केला तेव्हा त्यांना सांगितलं, “मला माहित नाही उद्या परत येईन का नाही. आता इतक्यात फोन करायलाही जमणार नाही ” आणि हे वाक्य संपत असतानाच फोन कट झाला आणि माझ्याकडचे सगळे सुट्टे पाउंड संपले. पुन्हा चेक इन काउंटरपाशी आले, “काहीही झालं तरी तुला थांबता येणार नाही” असं मला त्या ऑफिसरने निक्षून सांगितलं आणि आता तुझ्याकडे विमान पकडायला फक्त २० मिनिटं बाकी आहेत. पटकन चेक इन कर आणि धावत जा. आमच्याकडे होते नव्हते तेवढे सगळे पैसे प्रियांकाच्या हातात दिले आणि आम्ही कसेबसे विमानात बसलो. ह्या सगळ्या गडबडीत कोणाच्याच घरच्यांना कळवलं नव्हतं आणि भारतात आम्ही कोण कोण येणार आहोत हे त्यांना सरप्राईज होतं. बिचारे आमचे आई-वडील रात्रभर आमची काळजी करत जागे राहिले होते. माझ्या पहिल्याच परदेशप्रवासाचा शेवट एकदमच नाट्यमय झाला होता.
माझं C.S. पूर्ण झालं म्हणून बाबा मला काहीतरी ‘गिफ्ट’ देण्याच्या मूडमध्ये होते. तुला फोरव्हीलर घेऊया, तुला अमुक घेऊया, तमुक घेऊया अश्या अनेक गोष्टी सुचवत होते. मला अश्या कोणत्याही गोष्टीत रस नाही. तेव्हा मला ह्यापैकी काहीही नको असं मी स्पष्ट सांगितलं. मला अश्या गोष्टी जमावण्यापेक्षा छान आठवणी निर्माण करायला आवडतील. ‘मला फिरायचं आहे’ असं म्हणून मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही थायलंडला निघालो. थायलंडला पोचल्यावर दुसऱ्याच दिवशी आम्ही वॉटरस्पोर्ट्ससाठी निघालो. पॅरा सिलिंग, सी – डीप वगैरे सगळं अतिशय उत्साहात आणि न घाबरता करत होतो. आमच्यासोबत एक ८५ वर्षांच्या आज्जीसुद्धा हे सगळं करत होत्या. मी अवाक होऊन पहात होते त्यांच्याकडे. आमच्या सगळ्यांशी त्या खूप मिळून मिसळून बोलत होत्या “८५ इज जस्ट नंबर….” असं सारखं म्हणत होत्या आणि ते तसं त्यांच्या वागणुकीतून जाणवतही होतं. दिवसभर पाण्यात खेळून खेळून खूप दमलो होतो. त्यामुळे संध्याकाळी लवकर जेवण केलं आणि झोपलो. मध्यरात्री १ वाजता आमच्या रूममधला फोन वाजला. मी झोपेतून दचकून जागी झाले आणि धडपडत तो फोन उचलला. हॉटेलच्या रिसेप्शनवरून फोन होता. आमच्या सोबतच्या त्या ८५ वर्षाच्या आज्जी हार्ट अॅटॅक आल्याने गेल्या. मला क्षणभर वाटलं की मला त्या रिसेप्शनवरच्या माणसाचं बोलणं कळलं नाही, मी काहीतरी चुकीचं ऐकलं. मी फोन तसाच टाकून धावत खाली गेले. दुर्दैवाने मी ऐकलेलं खरं होतं. सगळ्यांची धावपळ सुरु झाली. मदतीसाठी खूप हात पुढे आले. सगळ्या परवानग्या आणि बाकी सगळ्या प्रोसिजरमध्ये तिथल्या स्थानिकांनी खूप मदत केली. कुठेही गेलं तरी चांगली माणसं आजूबाजूला असणं हे किती गरजेचं असतं हे पुन्हा एकदा स्पष्टपणे जाणवलं. चांगली माणसं, त्यांच्याकडून मिळणारी पॉझीटीव्हीटी आपल्याला कठीण प्रसंगातून बाहेर पडायला किती मदत करते नई?

#घघराचा #प्रवास #परदेशप्रवास #प्रवासातीलअनुभव #अनुभव
#ghagharacha #travel #firstforeigntrip #organisation #travelorganisation

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!