Close
6
  • Gha Gharacha

प्रवासाची तयारी

कोणत्याही सुट्ट्यात कुठे जायचं आणि काय पहायचं हा एक मोठा प्रश्न असतो. पण खरं सांगायचं तर त्याचं उत्तर तितकंसं अवघड नसतं. ठिकाण किंवा वेळ ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट पहिल्यांदा ठरवून संपूर्ण ट्रीप त्यानुसार ठरवता येते. म्हणजे जर प्रवासाच्या तारखा ठरलेल्या असतील आणि त्याच दिवसांत ट्रीपला जायचं असेल तर त्या दिवसांत आणि त्या हवामानात कोणती ठिकाणं बघता येतील हे ठरवता येतं किंवा जर ठिकाण ठरलेलं असेल तर त्या ठिकाणी जायचा उत्तम ऋतू कोणता ह्याचा शोध घेऊन त्या दरम्यान जाता येतं. जर आपलं ठिकाण ठरलेलं असेल तर तिथे जायचा योग्य किंवा पिक सिझन कोणता हे शोधून काढायचं आणि त्या सिझनच्या थोडसं आधी किंवा थोडसं नंतर जायचं. ह्यामागचा मूळ उद्देश म्हणजे त्यावेळी तापमान साधारणपणे अनुकूल व्हायला लागलेलं असतं , गर्दी वाढलेली नसते त्यामुळे कमी वेळात जास्त गोष्टी बघून होतात आणि रांगेत उभं राहून वेळ वाया जात नाही (खूप गर्दीमुळे पर्यटनस्थळांचा आणि पर्यायाने पर्यटनाचा विचका होतो असं मला वाटतं), आणि मुख्य म्हणजे हॉटेल्स, व इतर अनेक गोष्टी कमी दारात उपलब्ध होतात. सिझन चालू झाल्यावर गेल्यास विमानाच्या तिकीटांपासून ते हॉटेल्सच्या रूम्स, ट्रान्सपोर्ट सगळंच जवळजवळ दीडपट झालेलं असत.
ट्रीप ठरवण्यापूर्वी आपल्या ट्रिपचा उद्देशही विचारात घ्यायला हवा. म्हणजे रोजच्या धकाधकीच्या दैनंदिनीला कंटाळून जरा आराम मिळावा किंवा निवांतपणा मिळावा म्हणून जाणार असू तर मग अश्या वेळी आपण खूप बाहेर पडत नाही. आपला बराचसा वेळ हा हॉटेल्सच्या रूमवर किंवा हॉटेलच्या परिसरातच जातो. जर आपण बाहेर पडणार नसू तर अश्या वेळी ऑफ सिझनला गेलं तरी चालतं, म्हणजे आपण असंही बाहेर पडणार नाही त्यामुळे बाहेरच्या वातावरणाशी तितकासा संबंध येत नाही. आणि बाहेर फिरण्याचे पैसे वाचल्याने ते पैसे उत्तम दर्जाच्या हॉटेल्सवर खर्च करता येतात आणि आपण तिथे जास्त वेळ राहणार असल्याने त्याचा उपभोगही घेता येतो. त्यामुळे आपण फिरायला जाण्यापूर्वी आपला उद्देशही डोक्यात पक्का करावा असं मला वाटतं.
ठिकाण आणि जायच्या तारखा ठरवल्या की मोठं काम झाल्यात जमा असतं. मला फिरयला जाताना तीच तीच ठरलेली टिपिकल ठिकाणं बघितलेली अजिबात आवडत नाहीत. म्हणजे ती ठिकाणं तर बघायचीच पण आपली ट्रीप म्हणजे फक्त चार ठरलेल्या गोष्टी नसाव्यात. प्रवास आपल्याला खूप काही शिकवत असतो. आपण ज्या भागात जातो, तिथलं राहणीमान, पेहराव, खाद्यसंकृती, इतिहास, भौगोलिक आश्चर्य अश्या गोष्टी नक्की बघाव्यात.
मी जर एखाद्या ठिकाणी जाणार असेन तर तिथल्या टिपिकल टूरिस्ट पॉइंटची एक यादी करते. त्यानंतर तिथल्या इतर ठिकाणांची यादी तयार करते. अशी ठिकाणं जिथे फार टूरिस्ट नाहीत पण तिथे बघण्यासारखं आहे, वेगळं काहीतरी आहे. ह्यासाठी बऱ्याचदा त्या ठिकाणाला भेट देऊन आलेल्या मित्रमंडळींची मदत होते. आपण ज्या भागात फिरायला जातो तिथलं लोकल फूड चाखून बघयला हवं. परदेशात प्रवास करत असू तर बऱ्याचदा हे महागसुद्धा वाटू शकतं. अश्या वेळी आपण एक गोष्ट करू शकतो. अनुभव म्हणून थोडसं / छोटंसं काहीतरी घ्यायचं, खायचं, पण त्याने पोट भरत नाही. मग अश्यावेळी पोट भरण्यासाठी आपण सोबत नेलेल्या खाऊवर ताव मारायचा. कधीतरी बाहेरची एखादी नविन ट्राय केलेली डिश आवडतही नाही. अश्यावेळीसुद्धा आपल्या सोबतचा खाऊ आपली मदत करू शकतो. ट्रीपला जाताना आपण रेडी टू इट / रेडी टू कूक अश्या प्रकारातलं पोहे, उपीट, भाताचे प्रकार अश्या गोष्टी सोबत नेऊ शकतो. म्हणजे फक्त गरम पाणी घातलं की पदार्थ लगेच दोन मिनिटात तयारही होतो.
कोणत्याही भागात ट्रीपला गेल्यावर जर आपण तिथल्या स्थानिक माणसांजवळ राहिलो तर एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो. त्यांच्या नजरेतून दिसणारं गाव हे आपल्या ठरलेल्या, आखीव रेखीव प्रवासापेक्षा फार निराळं असत. असे होम स्टे आपला प्रवास अनुभवसंपन्न करतात. त्यामुळे हॉटेल्सपेक्षा अश्या होम स्टेला प्राधान्य द्यावं असं मला वाटतं. आणि ह्याचा दुसरा फायदा म्हणजे ‘कॉस्ट कटिंग’ हॉटेल्सपेक्षा कमी दारात हे होम स्टे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आणि वाचलेल्या पैशातून आपण आजून जास्त दिवस तिथे राहू शकतो किंवा आजून जास्त ठिकाणं बघू शकतो. बाहेर फिरायला निघणाऱ्यांच्या काही मुख्य जाती आहेत. एक म्हणजे आखीव रेखीव प्रवास, लक्ज्यूरीअस प्रवास करणाऱ्यांची आणि दुसरी म्हणजे लक्ज्यूरी आणि कम्फर्टचा जास्त विचार न करता मोकळं ढाकळ, मनमुराद फिरणारी. जर आपण पहिल्या वर्गात येत असू तर मग हा सगळा खेळ न पचणारा असतो. कारण पंचतारांकित हॉटेल्समध्ये न राहता आपण जेव्हा कुणाच्यातरी घरी असतो, खूप आखीव रेखीव प्रवास करत नसतो तेव्हा मिळेल ते खाण्याची आणि असेल त्या परीस्थितीत राहण्याची मानसिक तयारी असावी लागते. अगदीच परिस्थिती वाईट असते असं नाही, पण एखाद्या वेळी, एखादा डीसकम्फर्ट सहन करावा लागू शकतो, इतकच.
कोणत्याही प्रवासाला निघायचं म्हणलं की आर्थिक तयारी करावी लागतेच. बरेच जण महिन्याच्या बजेटमधला काही भाग हा ट्रीपसाठी बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे आयत्यावेळी खूप धावपळ होत नाही. माझे खूप मित्र मैत्रिणी इन्कम टॅक्सचा रिफंड हे ट्रीपचं बजेट म्हणून वापरतात. तर मुख्य मुद्दा असा आहे की ट्रीपला जाण्याच्या तयारीमध्ये आर्थिक बाबींचा मुख्य विचार व्हावा.
क्रेडीट कार्ड्सचा जर योग्य वापर केला तर त्यासारखं फायदा देणारं डील नाही. खरंतर मी पूर्वी क्रेडीट कार्ड्स अजिबात वापरत नव्हते पण ते वापरण्यासाठी माझ्या नवऱ्याने मला खूप छान टिप्स दिल्या. क्रेडीट कार्ड्सचा योग्य वापर कसा करायचा हा खरंतर एक निराळ्या ब्लॉगचा विषयच होऊ शकेल 😉 क्रेडीट कार्ड्सचा आणिक एक महत्वाचा फायदा म्हणजे आपण जेव्हा विमान प्रवास करत असू तेव्हा बऱ्याच क्रेडीट कार्ड्सवर “एअरपोर्ट लाउंज अक्सेस” मिळतो. तुम्ही चेक इन केल्यावर निवांत बसायचं असेल, खादंती करायची असेल तर आपण इथे जाऊ शकतो. अश्या क्रेडीट कार्ड्समुळे आपल्याला इथे मोफत प्रवेश मिळतो. इथे बसण्यासाठी उत्तम व्यवस्था असते आणि त्या त्या त्यावेळेनुसार आपण जेवण किंवा नाश्ता करू शकतो (ह्यासाठी कोणताही चार्ज आकारला जात नाही) .
कोणत्याही ठीकाणाला भेट द्यायची असेल तर त्याच्या प्रवेशिका ऑनलाईन विकत घ्या. त्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे तिथे गेल्यावर तिकीट खिडकी शोधणं आणि रांगेत उभं राहून तिकीट घेणं ह्यामध्ये खूप वेळ वाया जातो आणि हल्ली क्रेडीट कार्डांवर खूप ऑफर चालू असतात कदाचित त्या एखाद्या ऑफरमुळे आपल्याला जरा स्वस्त पण पडू शकतं . आपल्याकडे आधीच तिकीट उपलब्ध असल्याने गर्दी व्हायच्या आत आपण ते ठिकाण शांतपणे बघू शकतो. विशेषतः संग्राहायलयाच्या बाबतीत ही गोष्ट जास्त जाणवते. खूप गर्दी असेल तर आपल्याला त्या गोष्टी नीट बघता येत नाहीत. आणि रांगेत उभं राहिल्यामुळे आपण कंटाळतो, पाय दुखायला लागतात, आपली निम्मी शक्ती आणि उत्साह इथेच संपून जातो. हे सगळं टाळण्यासाठी ह्या पर्यायाचा नक्की वापर करा.
gps नकाशे डाऊनलोड करून ठेवता येतात. इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होऊ शकत नसेल किंवा परदेशात गेल्यावर जर इंटरनेट कनेक्शन महाग असेल आणि त्यात पैसे घालवण्याची इच्छा नसेल तर काही मोबाईल्समध्ये अशी सुविधा असते जिथ तुम्ही ‘अ’ ठिकाणापासून ‘ब’ ठिकाणापर्यंतचे नकाशे सेव्ह करु शकता आणि गरज पडेल तेव्हा फोन उघडून आपण बघू शकतो आणि ‘आत्ता आपण कुठे आहोत’ हे त्यावरून कळू शकते. फिरताना जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. ती जागा कळण्यासाठी ह्या गोष्टीची खूप मदत होते. आणि अर्थातच पब्लिक ट्रान्सपोर्ट हा प्रायव्हेट ट्रान्सपोर्टपेक्षा स्वस्त असतो.
खरंतर हा विषय असा आहे की कितीही लिहित राहिले तरी कमीच पडेल. आज इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या भागात..!

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!