फर्निचरमध्ये वापरण्यात येणाऱ्या माध्यमांची माहिती
आम्ही चित्रकलेच्या परीक्षेला बसलो होतो आणि त्याची तयारी म्हणून आमच्या बाई आमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढून घेत होत्या. त्या आम्हाला म्हणायच्या, “वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून चित्र रंगवा, ते अतिशय उठावदार दिसतं. वॉटरकलरचा वॉश द्या, त्यावर ऑइलपेस्टलने शेडींग करा…. ”. वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून काढलेलं हे चित्र खरंच छान दिसायचं. हीच वेगवेगळ्या माध्यमांची जादू आपल्याला घराच्या फर्निचरमध्येसुद्धा बघायला मिळते. नुसतं एकाच रंगाच्या सनमायकामध्ये केलेलं फर्निचर आणि काच, लाकूड, इतर धातू ह्यांचा एकमेकाला पूरक असा वापर करून केलेलं फर्निचर ह्यात नक्कीच फरक जाणवतो. घराचं फर्निचर उत्तम व्हावं म्हणून अश्या विविध माध्यमांचा आपण खूप हौशीने वापर करतो. मात्र फर्निचर जेवढं करणं अवघड आहे त्याहूनही अवघड ते स्वच्छ ठेवणं आहे हे नक्की. घरातलं फर्निचर स्वच्छ ठेवण्यासाठी, त्यात कोण कोणते माध्यम वापरले जातात ह्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतं . त्यामुळे आता आपण बघणार आहोत फर्निचर करताना वापरले जाणारे विविध माध्यम आणि मग त्यानुसार त्या प्रत्येकाची स्वच्छता कशी करायची.
सगळ्यात आधी आपण बघुया कोण कोणते माध्यम फर्निचर करताना वापरले जातात.
- लाकूड
- धातू
- काच
- कापड
- सिरॅमिक
- स्टोन
- वॉलपेपर
- प्लास्टिक
घरातील फर्निचर करताना ह्या प्रत्येक माध्यमाचा विविध पद्धतीने आणि विविध कारणांसाठी वापर करण्यात येतो.
- लाकूड
आपल्याकडच्या फर्निचर पद्धतीमध्ये लाकडाचा सगळ्यात जास्त उपयोग होतो. मग ते प्लायवूड असू देत किंवा विंटेज लूकसाठी वापरलेलं रॉ पाइनवूड असू देत. लाकूड हा आपल्या घरातल्या फर्निचरचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्याकडच्या फर्निचरमध्ये वारण्यात येणारे लाकडाचे काही मुख्य प्रकार :
– हार्डवूड;
– सॉफ्ट वूड;
– प्लाय वूड;
– मरीन वूड;
– कॉर्क, इत्यादी
- धातू
फर्निचर करताना दारं, खिडक्या, त्यांची तावदानं, लॅम्प आणि त्यांचे फिटिंग्स, स्वयंपाकघरातील भांडी, डेकोरेटीव वस्तू, फ्लॉवरपॉट, कपाटं, पलंग/बेड, खुर्च्या, टेबल इत्यादी गोष्टींसाठी धातूचा वापर केला जातो. आपल्याकडच्या फर्निचरमध्ये वारण्यात येणारे धातूचे काही मुख्य प्रकार :
– स्टील;
– कॉपर;
– ब्रास;
– ब्राँझ;
– अलुमिनिअम;
– लोखंड;
– चांदी, इत्यादी
- काच
हल्ली फर्निचर करताना काचेचा वापर वाढला आहे. दारं, खिडक्या, लॅम्प, शोभेच्या वस्तू, झुंबर, फ्लॉवरपॉट, आरसे, घरातील एखादं पार्टीशन, स्वयंपाकघरातील क्रोकरी किंवा कपाटाच्या दारांनासुद्धा काच वापरली जाते. आपल्याकडच्या फर्निचरमध्ये वारण्यात येणारे काचेचे काही मुख्य प्रकार :
– फ्लॅट ग्लास;
– सेफ्टी ग्लास;
– हॉलो ग्लास;
– फायबर ग्लास;
– लामिनेटेड ग्लास, इत्यादी
- कापड
घरातील फर्निचरच्या रंगसंगतीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका पार पडणारा हा घटक आहे. उत्तम फर्निचर असूनही घरातील सोफ्याचे कव्हर भलत्याच रंगाचे असतील तर पूर्ण घराची शोभा जाते. त्यामुळे आपल्या घराची संकल्पना पूर्णत्वाला नेण्यासाठी ह्या माध्यमाचा किंवा घटकाचा फार उपयोग होतो. घरातले पडदे, कुशन कव्हर अगदी बेडकव्हरसुद्धा घराच्या रंगसंगतीमध्ये मोलाची कामगिरी निभावतात. आपल्याकडच्या फर्निचरमध्ये वारण्यात येणारे कपड्याचे काही मुख्य प्रकार :
– कॉटन;
– सिल्क;
– वेलवेट;
– लेदर;
– पॉलिएस्टर;
– रेक्झीन, इत्यादी
- सिरॅमिक
ह्या माध्यमामध्ये मातीचा वापर करून तयार होणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश होतो म्हणजे चायना डिश/भांडी, टेराकोटाची भांडी/वस्तू, बोन चायना, शोभेच्या वस्तू, सॅनिटरी फिटिंग, टाइल्स इत्यादी.
- स्टोन
हल्ली फर्निचरसाठी दगडाचा वापर कमी कमी होत चालला आहे. तरीही काही ठराविक गोष्टींसाठी अजूनही दगडाचा वार केला जातो उदाहरणार्थ देवघरासाठी, स्वयंपाकघरातील ओटा, टेबल टॉप, बेसिनच्या खाली, फ्लोरिंग म्हणून, शोभेच्या वस्तू, मूर्ती, इत्यादी. आपल्याकडच्या फर्निचरमध्ये वारण्यात येणारे दगडाचे काही मुख्य प्रकार :
– मार्बल;
– ग्रानाईट;
– क्वॉर्ड्स;
– कोरियन, इत्यादी
- वॉलपेपर
भिंतीना रंग देण्यापेक्षा किंवा त्यावर टेक्शर करण्यापेक्षा भिंतीना वॉलपेपर लावायची पद्धत रुळत चालली आहे. रंगकामाचा खूप मोठा त्रास ह्या वॉलपेपरने कमी केला आहे. अर्थातच तो रंगाइतका टिकाऊ पर्याय नाही पण तरीही घराच्या फर्निचरमध्ये महत्वाची कामगिरी बजावतो.
- प्लास्टिक
-
आपल्याकडे डबे, भांडी, रॅक, स्टॅन्ड, शोभेच्या वस्तू इत्यादी असंख्य कारणांसाठी प्लास्टिकचा वापर होतो. मात्र हल्ली आपल्याकडे प्लास्टिकच्या वस्तूंचे प्रमाण कमी करण्याकडे लोकांचा कल दिसू लागला आहे. प्लास्टिकमध्ये असंख्य प्रकार आहेत. प्लास्टिक जरी इतर गोष्टींच्या तुलनेत स्वस्त असले तरीही त्याकडे फार टिकाऊ पर्याय म्हणून पहिले जात नाही.
हे सर्व प्रकार झाले फर्निचरमध्ये वापरण्यात येणाऱ्या माध्यमांचे. आपला घरातील रोजचा वावर ह्यातील प्रत्येक गोष्टीवर थोड्याफार फरकाने परिणाम करत असतो. प्रत्येक माध्यम हे वेगवेगळ्या गोष्टींनी तयार होते. त्यामुळे त्याची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते आणि त्याची वेगवेगळ्या पद्धतीने स्वच्छता करावी लागते. काही गोष्टींना अँसिडने स्वच्छ करावे लागते तर काहींना ते अजिबात चालत नाही. म्हणूनच घराची स्वच्छता करण्यापूर्वी कोण कोणत्या गोष्टींची अथवा माध्यमांची स्वच्छता करावी लागते हे आपण बघितले. आता आपण बघणार आहोत ह्या माध्यमांतून तयार होणाऱ्या गोष्टींची स्वच्छता कशी करायची. तेव्हा लवकरच भेटू पुढच्या सदरामध्ये…!!!
Swapna
लेख छान आहे.Mअहिती पण चांगली आहे.परंतु यात स्वच्छते बद्दल काहीच माहीती नाहीय.