Close
  • Gha Gharacha

आठवड्याचे मेन्यू प्लानिंग

मागच्या आठवड्यात आपण मेन्यू प्लानिंग करताना काय काय विचार करायचा ह्याबद्दल चर्चा केली. आपण आठवड्याचा जो मेन्यू तयार करतो तो लिहिण्यासाठी मी एक प्रिंटेबल तयार केले आहे. ह्या प्रिंटेबलमध्ये प्रत्येक वारासाठी एक जार आहे. त्यात १. सकाळचा नाश्ता, २. कोशिंबीर, ३. चटणी/लोणचं, ४. भाजी, ५.पोळी, ६. भात, ७. आमटी, ८. फळं असे पर्याय उपलब्ध आहेत. एखाद्या वेळी आपल्याला स्वयंपाकाची तयारी आदल्या दिवशी करावी लागते म्हणजे कडधान्याला मोड आणणे, डोस्याचे पीठ भिजवणे किंवा अश्या प्रकारच्या काही गोष्टी. ह्या गोष्टी लिहून ठेवण्यासाठी प्रत्येक वारच्या जारला एक टॅग आहे. ह्या टॅगमध्ये आपण ‘उद्याची तयारी / बाजारातून आणायचे समान’ ह्यापैकी कोणत्याही गोष्टीची यादी करू शकतो. हे प्रिंटेबल आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. तुम्ही त्याची प्रिंट काढून स्वतः आठवड्याचे मेन्यू प्लानिंग करू शकता.

ह्यासोबत मी अजून एक प्रिंटेबल तयार केले आहे, ते म्हणजे ‘आठवड्याच्या खरेदीचे’. ह्यामध्ये, आपल्याला आठवड्याला लागणारी भाजी खरेदी आणि इतर खरेदी चार याद्यांमध्ये विभागली आहे १. भाज्या, २. कॉमन भाज्या, ३. फळं, ४. इतर. रोजच्या जेवणात आपण जी भाजी खातो म्हणजे भेंडी, भोपळा, दोडका अश्या भाज्या क्रमांक एकच्या भाजीच्या यादीत लिहायच्या, तर कांदा, बटाटा, कोथिंबीर वगैरे अश्या रोजच्या स्वयंपाकात लागणाऱ्या भाज्या, क्रमांक दोनच्या भाजीच्या यादीत म्हणजेच कॉमन भाज्यांच्या यादीत लिहायच्या. मी चार आठवड्याचे मेन्यू प्लानिंग सोबत जोडत आहे. हा आठवड्याचा मेन्यू हा सर्व साधारण लोकांना चालेल अश्या पद्धतीने केलेला आहे. आपापल्या आवडीनिवडीनुसार, खाण्यापिण्याच्या सवयीनुसार, ऋतुमानानुसार, पथ्यपाण्यानुसार आणि भाज्यांच्या उपलब्धतेनुसार तुम्ही ह्यात बदल करू शकता. त्यासोबतच आठवड्याच्या खरेदीच्या यादीमध्ये मी मुद्दामच त्याचे प्रमाण लिहिलेलं नाही कारण प्रत्येकाच्या घरात असणाऱ्या माणसांची संख्या त्यांच्या आवडीनिवडी ह्याची प्रत्येकाची गणितं वेगवेगळी असतात. त्यामुळे आपल्या गरजेनुसार प्रमाण ठरवणे सोपे जाते. तेव्हा हा तयार मेन्यू नक्की वाचा आणि त्या संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया मला कळवा. मी पुन्हा एकदा सांगते की, आपण नियोजन केलं तरी कोणत्याही गोष्टीचा अट्टहास किंवा हट्ट धरू नये. दरवेळी नियोजनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतातच असं नाही. नियोजन हे आपलं काम सोपं व्हावं म्हणून असतं. नियोजनामुळे जर आपल्यावर भार येत असेल तर ते मात्र चुकीचं आहे. जेवढं शक्य असेल तेवढं आमलात अणावं आणि जर एखादी गोष्ट नाही करू शकलो तरी हरकत नसावी.

आठवड्याचं हे मेन्यू प्लांनिंग तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कळवा.

One thought on “आठवड्याचे मेन्यू प्लानिंग

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!