Close
  • Gha Gharacha

फ्रीज खरेदीचे टप्पे

गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण फ्रीज खरेदी करताना फ्रीजचा आकार, प्रकार आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा केली. फ्रीज खरेदी करण्यासाठीची ही पूर्वतयारी आहे असं मला वाटतं. आज आपण फ्रीज खरेदीचे क्रमवार टप्पे पाहू.

१. फ्रीज खरेदीला जायचं म्हणजे घरचा अभ्यास करून जावं लागतं. फ्रीज खरेदी करण्यापूर्वी जर आपण आपल्या गरजा टिपून ठेवल्या तर ते जास्त फायदेशीर ठरतं. आपण साधारणपणे १० वर्ष तरी आपलं फ्रीज वापरतो. त्यामुळे थोडा पुढचा विचार करून आपण आपल्या सर्व गरजा टिपून ठेवाव्यात.

२. सर्वप्रथम आपण फ्रीजचा आकार ठरवून घ्यावा. फ्रीजचा आकार ठरवताना काय काय विचार करावा हे मागच्या लेखात बघितलं (फ्रिजच्या आकारमानवरचा लेख वाचण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा https://bit.ly/2F1aMyF). त्यामुळे ते परत लिहीत नाही. एकदा फ्रीजचा आकार ठरला की बाकी निर्यण घेणे त्या मानाने सोपे असते.

३. फ्रीजसाठी आपलं बजेट किती आहे याचा ढोबळ अंदाज घ्यावा. जर आपण कुठल्या स्कीम/ लोन- इ एम आय/ ऑफरचा विचार करत असू तर त्याच्या सर्व अटी/पात्रता यामध्ये आपण बसतोय ना, ह्याची पूर्व पडताळणी करून पहावी.

४. आपल्या सर्व गरजा टिपल्यानंतर त्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा आणि हे ध्यानात ठेवावे की, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे फिचर आपल्या फ्रीजमध्ये असावे असे आपल्याला वाटत असते, त्या प्रत्येक फिचरमुळे आपल्या फ्रीजची किंमत वाढत जाते.

५. आता आपल्याकडे फ्रीजचा अपेक्षित आकार, किंमत आणि फीचर्स यांची माहिती मिळाली आहे. ह्या त्रिकोणात आता आपल्याला आपलं गणित बसवायचं आहे.

६. हल्ली घरबसल्या सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या मॉडेल्सची शक्य असेल तेवढी माहिती इंटरनेटवरून काढावी. ह्या माहिती मध्ये फक्त रंग, किंमत आणि फीचर्स न बघता एकत्रित रित्या त्या मॉडेलचा आढावा घ्यावा. इंटरनेटवर अश्या खूप वेबसाईटस आहेत ज्यावर लोकं स्वतः वापरलेल्या विद्युत उपकरणांचे अनुभव सांगतात/लिहितात. बऱ्याचदा ह्या विषयावरील व्हिडीओ देखील उपलब्ध असतात. ह्या सर्व माहितीचा जरूर उपयोग करावा.

७. घरचा अभ्यास पूर्ण झाल्यावर दुकानात जाऊन आपण ज्या पर्यायांचा विचार करीत आहोत असे पर्याय स्वतः बघायचे आणि माहिती पडताळून बघायची. दुकानदाराकडून मिळणाऱ्या माहितीचा आणि आपल्याला मिळालेल्या माहितीचा एकत्रितपणे विचार करावा.

८. फ्रीज खरेदीमध्ये आफ्टर सेल्स सर्व्हिसचादेखील प्रामुख्याने विचार करावा. बऱ्याचदा असं असतं की फ्रीज कंपनीचा कारखाना वेगळ्या राज्यात/ देशात असतो. आपल्या फ्रीजचा एखादा भाग खराब झाला तर तो त्या राज्यातून/ देशातून मागवावा लागतो. आपल्या अंदाजासाठी म्हणून फ्रीज कॉम्प्रेसरची किंवा महत्वाच्या भागांची किंमत विचारावी. समजा एखादा भाग खराब झाला तर तो कुठल्या शहरातून मागवावा लागेल, तो किती दिवसात पोचू शकेल आणि त्याचा अंदाजे खर्च किती होईल ह्याची विचारणा करावी.

९. आपल्याला आवडलेल्या फ्रिजच्या मॉडेल्सची किंमत (सर्व खर्च आणि डिस्काउंट पकडून) टिपून ठेवावी.

१०. बाजारात खूप पर्याय उपलब्ध असणं हे जसं चांगलं आहे तसं त्रासदायकसुद्धा आहे. खूप पर्याय असल्यामुळे आपण गोंधळून जातो. म्हणूनच मी एक तुलनात्मक तक्ता तयार केला आहे ज्यामध्ये फ्रिजच्या २-३ पर्यायांचा विचार करताना तुलना करणे सोपे जाईल. हा तक्ता तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करू शकता.

अश्याप्रकारे जर आपण तुलना करून पर्याय निवडला तर आपण जास्तीत जास्त योग्य आणि उपयुक्त फ्रीज कमीत कमी किमतीमध्ये घेऊ शकू. फ्रीज खरेदीवरील ही लेखमाला तुम्हाला कशी वाटली हे जरूर लिहून कळवा.

 

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!