Close
 • Gha Gharacha

फ्रीज खरेदी : भाग दुसरा – फ्रीजचे प्रकार

मागच्या भागात आपण चर्चा केली फक्त फ्रीजच्या आकारमानाबद्दल. फ्रीजचा वापर होत असताना जश्या गरजा वाढत गेल्या, तसे फ्रीजचे प्रकरही वाढत गेले. फ्रीजचे मुख्य प्रकार पडतात ते त्यच्या दरवाजाच्या आणि फ्रीजरच्या पद्धतीवरून. थंड हवामानाच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदार्थांची साठवणूक करायची पद्धत आहे. त्यामुळे इथे असणारे फ्रीज आणि फ्रीजरदेखील मोठ्या आकाराचे असतात. हल्ली भारतातसुद्धा मोठ्या आकाराचे आणि जास्त क्षमतेचे फ्रीज सहज उपलब्ध असतात. मी काही महिन्यांपूर्वी फ्रीजबद्दल माहिती घेण्यासाठी बाजारात गेले होते, तेव्हा माझ्यासमोर फ्रीजचे सहा मुख्य प्रकार उपलब्ध होते. आता आपण बोलणार आहोत फ्रिजच्या ह्या सहा प्रकारांबद्द्ल:

१. सिंगल डोअर

२. डबल डोअर

३. बॉटम फ्रीजर

४. फ्रेंच डोअर

५. साईड बाय साईड डोअर

६. बिल्टइन फ्रीज

१. सिंगल डोअर

फायदे :

 • ह्यातील कप्प्यांचे आकार मोठे असल्याने (आणि ते हलवता येत असल्याने) मोठी भांडी मावू शकतात.
 • अगदी सहजपणे बाजारात उपलब्ध असतात.
 • फ्रिजच्या प्रकारांमधील हा सगळ्यात स्वस्त प्रकार मानला जातो.
 • आकाराने लहान असल्याने कमी जागेत मावतो.

तोटे :

 • भाजीचे भांडे सगळ्यात खालच्या बाजूला असल्याने सतत खाली वाकावे लागते. ज्यांना पाठीचा आजार असेल किंवा वाकून काम करणे शक्य नसेल अश्या लोकांना हे त्रासदायक ठरू शकते.
 • फ्रीजरचा आकार कदाचित छोटा पडू शकतो.

२. डबल डोअर

फायदे :

 • डबल डोअर ह्या प्रकारामध्ये खूप प्रकार किंवा मॉडेल्स पाहायला मिळतात आणि बाजारात सहजपणे उपलब्ध असतात.
 • इतर प्रकारांच्या तुलनेत ह्या प्रकारच्या फ्रीजची किंमत कमी असते.
 • इतर फ्रिजच्या तुलनेत ह्या प्रकारच्या फ्रीजला कमी प्रमाणात विद्युत उर्जा लागते.

तोटे :

 • रोजच्या वापरातील वस्तू, भाज्या काढण्यासाठी सतत खाली वाकावे लागते.
 • फ्रीजरचा आकार छोटा असतो.

३. बॉटम फ्रीजर

फायदे :

 • आपल्या गरजेच्या वस्तू कायम आपल्या नजरेच्या टप्प्यात (आय लेव्हलला) असतात.
 • पाठीचा आजार असल्याने किंवा अन्य काही अडचणी असल्याने जर खाली वाकू शकत नसू तर ह्या प्रकारचा नक्कीच फायदा होतो.
 • टॉप फ्रीजरच्या तुलनेत बॉटम फ्रीजरमध्ये जास्त जागा वापरायला मिळते.

तोटे :

 • फ्रीजरची खोली जास्त असल्यमुळे पदार्थ एकावर एक रचले जातात आणि पटकन हाताशी सापडत नाहीत. त्यमुळे अश्या प्रकारच्या फ्रीजचे व्यवस्थित नियोजन करावे लागते किंवा फ्रीजरमधील पदार्थांची यादी करून ठेवली तरी चालते.

४.  फ्रेंच डोअर

फायदे :

 • फ्रीजचा संपुर्ण दरवाजा उघडण्यासाठी जागा नसेल तर याचा चांगला उपयोग होतो.
 • ह्या मॉडेल्समध्ये, जरी खालच्या बाजूला वेगळा फ्रीजर असला तरीसुद्धा फ्रीजमधील छोट्या भागात फ्रीजरची सोय असते. त्यामुळे ह्या प्रकारचा फ्रीज वापरण्यासाठी खूप सोयीचा आणि उपयुक्त ठरतो.
 • साईड बाय साईड फ्रीजपेक्षा जास्त पदार्थ आणि मोठ्या आकाराची भांडी ह्यात मावतात. (साईड बाय साईड फ्रीज पेक्षा फ्रेंच डोअर फ्रीज हे किमान ३-५ क्युबिक फीट जास्त आणि ४-६ इंच अधिक रुंद असते.)

तोटे :

 • फ्रीजरची खोली जास्त असल्यमुळे पदार्थ एकावर एक रचले जातात आणि पटकन हाताशी सापडत नाहीत. त्यमुळे अश्या प्रकारच्या फ्रीजचे व्यवस्थित नियोजन करावे लागते किंवा फ्रीजरमधील पदार्थांची यादी करून ठेवली तरी चालते.
 • घरातील फ्रीजरमध्ये खूप पदार्थाची साठवणूक करून ठेवायची सवय असेल, तरच हे फ्रीजर उपयोगाचे आहे. जर साठवणूक त्या प्रमाणात नसेल तर फ्रीजर फ्रीजरमधील जागा वाया जाते.

५.  साईड बाय साईड डोअर

फायदे :

 • फ्रीजचा संपुर्ण दरवाजा उघडण्यासाठी जागा नसेल तर याचा चांगला उपयोग होतो. (दाराची रुंदी साधारणपणे १८-२१ इंच असते.)
 • ह्या फ्रीजमध्ये दरवाज्यामुळे दोन मोठे उभे कप्पे तयार होतात. एका बाजूला संपुर्ण फ्रीजर असतो तर दुसऱ्या बाजूला पूर्ण फ्रीज असतो. ह्या फ्रीजचा आकार मोठा असल्याने त्यामध्ये प्रत्येक बारीक सारीक गोष्टीला ठराविक जागा असते आणि त्यामुळे फ्रीजमध्ये पसारा होत नाही.
 • फ्रीज आणि फ्रीजर मोठ्या आकाराचे असल्याने खूप पदार्थ मावतात आणि सगळेच नजरेच्या टप्प्यात राहतात. त्यामुळे वापरायला सोपे आणि सोपे जाते. (पण ह्या फ्रिजच्या कप्प्यांची रुंदी कमी अस्य्ने खूप मोठी भांडी मावत नाहीत.)
 • हल्ली अश्या फ्रीजच्या दारांना, बाहेरच्या बाजूने थंड पाणी किंवा बर्फ घेण्यासाठी सोय असते म्हणजे फ्रीजचा दरवाजा न उघडता आपण थंड पाणी किंवा बर्फ घेऊ शकतो.

तोटे :

 • फ्रीजचा दरवाजा न उघडता आपण थंड पाणी किंवा बर्फ घेऊ शकतो त्यामुळे दरवाज्यातील बरीचशी जागा अडते.
 • फ्रिजच्या दोन भाग पडत असल्याने कोणत्याही भागाची रुंदी जास्त नसते आणि त्यामुळे खूप मोठी भांडी किंवा पातेली कदाचित मावणार नाहीत.
 • शक्यतो फ्रिजच्या उजव्या भागात फ्रीजर असतो त्यामुळे लँडिंग स्पेस ही डाव्या बाजूला ठेवावी लागते आणि ते कदाचित अडचणीचे होऊ शकते.

६. बिल्टइन फ्रीज

फायदे :

 • फर्निचरच्या आतल्या बाजूने हे फ्रीज बसवलेले असते त्यामुळे ते बाहेरून पटकन ओळखू येत नाही.
 • सुयोग्य पद्धतीने डिझाईन केले तर खूप जागा वाचू शकते.
 • स्वयंपाकघरात वावरताना फ्रीजचा अडथळा होत नाही.
 • इतर फ्रिजच्या तुलनेत ह्या प्रकारचे फ्रीज दीर्घकाळ चालतात
 • स्वयंपाकघराच्या इतर फर्निचरमध्ये ते झाकून जातात त्यामुळे स्वयंपाकघराला खूप वेगळा आणि स्टायलिश लूक देतात.

तोटे :

 • अश्या प्रकारचे फ्रीज अत्यंत महाग असतात.
 • जिथे मॉड्युलर किचन आहे अश्याच ठिकाणी ह्याचा वापर करता येतो.
 • इतर फ्रीजच्या तुलनेत ह्या प्रकारच्या फ्रीजची रुंदी जास्त असते पण खोली कमी असते. (साधारणपणे ह्या प्रकारच्या फ्रीजची खोली २४ इंच तर रुंदी ४८ इंच आणि उंची ८४ इंचापर्यंत असू शकते)
 • ह्या प्ररच्या फ्रीजचा कोम्प्रेसोर हा वरच्या बाजूला असतो आणि त्यामुळे फ्रीज इंस्टाल करताना अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो.
 • फ्रीजची जागा (सहजासहजी) हलवता येत नाही.
 • खूप कमी ब्रान्ड अश्या प्रकारचे फ्रीज तयार करतात त्यामुळे निवड करण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध नसतात.

७. कॉम्पॅक्ट फ्रीज

फायदे :

 • छोट्या आकारामुळे हे फ्रीज ठेवायला कमी जागा लागते
 • ऑफिस, दुकान, हॉटेल्सच्या रूम्स किंवा जिथे फ्रीजचा मर्यादित वापर होणार आहे अश्या ठिकाणी हा फ्रीज खूप उपयुक्त ठरू शकतो.

तोटे :

 • छोट्या आकारामुळे ह्या प्रकरच्या फ्रीजमध्ये मर्यादित पदार्थ मावतात.
 • ह्या प्रकारामध्ये खूप मॉडेल्स बघायला मिळत नाहीत.

फ्रिजच्या प्रकारामध्ये अजून एका पद्धतीने वर्गीकरण होते ते म्हणजे:

१. काउंटर डेप्थ – अश्या प्रकारचे फ्रीज हे ओट्याच्या रुंदीइतके असतात. साधारणपणे ३२ – ३६ इंच रुंद, ६८ ते ७२ इंच उंच आणि २४ ते २६ इंच खोली असते. त्यामुळे ओट्याच्या लेव्हल मध्ये बसतात आणि स्वयंपाकघरात वावरताना त्याचा त्रास/अडथळा होत नाही. अश्या प्रकारचे फ्रीज हे आयलंड किचन किंवा छोट्या (कॉम्पॅक्ट) स्वयंपाकघरासाठी उपयुक्त ठरतात. हे फ्रीज बिल्ट इन पेक्षा स्वस्त असतात आणि साधारतः बिल्ट इनचा फील देतात.

२. उंडर काउंटर – अश्या प्रकारचे फ्रीज हे आकाराने छोटे (ओट्याच्या खालच्या भागात मावतील असे) असतात आणि शक्यतो शीतपेयांच्या साठवणुकीसाठी वापरले जातात.

तर हे झालं फ्रिजच्या प्रकारांबद्दल. कोणत्याही प्रकारचा फ्रीज बघितला तरी त्यात काही फायदे काही तोटे असतातच. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त गरजा पूर्ण करणारा आणि आपल्याला सोईचा वाटणारा फ्रीज निवडावा इतकच….!

पुन्हा भेटू पुढच्या भागात…!!!

One thought on “फ्रीज खरेदी : भाग दुसरा – फ्रीजचे प्रकार

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!