स्वयंपाकघराचे विभाग
स्वयंपाकघराचे विभाग किंवा वर्गीकरण याबद्दल मी याआधी फार गांभीर्यानं विचार केला नव्हता. आम्ही जेव्हा आमच्या नवीन घरात स्वयंपाकघराची अंतर्गत रचना करायला सुरुवात केली तेव्हा ह्यावर बारकाईने विचार केला गेला. स्वयंपाकघराची रचना करताना त्या त्या विभागानुसार करणं हे सोयीचं ठरत कारण त्यामुळे आपला वेळ आणि श्रम वाचतात.
स्वयंपाकघराचे ढोबळ वर्गीकरण म्हणजे ‘उष्ण विभाग’ आणि ‘शीत विभाग’. नावाप्रमाणेच उष्ण विभागात गॅस/कूकटॉप, ओव्हन, इलेक्ट्रिक शेगडी वगैरे गोष्टी येतात आणि शीत विभागात फ्रीज, फ्रीजर, पाण्याचा साठा, सिंक अश्या गोष्टी येतात. उष्ण आणि शीत विभागातील वस्तूंची एकमेकांपासून अंतरे आणि त्यांची स्वयंपाकघरातील जागा ह्या विषयी आपण नंतर बोलणार आहोतच.
थोडं खोलात जाऊन आणि ‘गोष्टींचा केला जाणारा वापर’ लक्षात घेतला तर स्वयंपाकघर ५ भागात विभागलं जाऊ शकतं.
१. स्वयंपाक – यामध्ये फक्त गॅस/कूकटॉप येत नाही तर स्वयंपाक करताना लागणाऱ्या गोष्टीसुद्धा येतात. प्रत्येकजण आपापल्या सवयीनुसार व सोयीनुसार, ओट्यावर हाताशी असाव्यात म्हणून विविध वस्तू ठेवतो. मग ती तेलाची/तुपाची छोटी बरणी, मिठाचा छोटा डबा, मसाल्याचा/मिसळणीचा डबा, स्वयंपाक करताना लागणारे चमचे असोत किंवा चहा, साखर, कॉफीचे डबे. याचबरोबर रोजच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गोष्टी (दाण्याचे कूट, गुळ इत्यादी) ह्या सर्व गोष्टी स्वयंपाक विभागात मोडतात.
२. स्वयंपाकाची तयारी – स्वयंपाक बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू ह्यात येतात म्हणजे भाज्या चिरण्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुऱ्या, चाकू, विळी, चॉपिंग बोर्ड, मिक्सर, बीटर, ब्लेंडर यासारखी उपकरणे, सर्व प्रकारचे मिक्सिंग बोल्स इत्यादी.
३. धान्यसाठा – आपल्याकडे गहू, तांदूळ, डाळ ह्यासारख्या गोष्टी वर्षाच्या एकदम घेऊन ठेवायची पद्धत आहे. त्यामुळे धान्यसाठ्याकरीता जास्त जागा लागते. हल्ली त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे खूप मोठी धान्याची कोठी किंवा डबे घरात फार नसतात. साधारणपणे महिन्याला किराणा भरला जात असल्यामुळे त्यानुसार डबे किंवा बरण्या असतात आणि त्यात हल्ली स्वयंपाकघराचा आकारही छोटा होत चालला आहे. त्यामुळे कमी जागेत ह्या सर्व गोष्टी ठेवाव्या लागतात.
४. भांडी कुंडी – भांड्यांची साठवणूक करताना आपण २ पद्धतीने करू शकतो. एक म्हणजे त्यांच्या आकारमानानुसार म्हणजे साधारण एका आकाराची भांडी एका कप्प्यात अश्या पद्धतीने किंवा भांड्यांच्या वापरानुसार.
वापरानुसार भांड्यांचे वर्गीकरण :
अ. स्वयंपाकासाठी/स्वयंपाक करण्यासाठी लागणारी भांडी – यामध्ये दुधाच्या पातेल्यापासून, कुकर, कुकरची भांडी, आमटीचे पातेले, कढई, स्वयंपाक करताना लागणारे डाव, चमचे, झारे ह्या सगळ्या गोष्टी येतात. यात सुद्धा सगळी भांडी रोजच्या स्वयंपाकाला लागत नाहीत त्यामुळे रोजच्या स्वयंपाकाला लागणारी भांडी हाताशी असतात आणि पुरणयंत्र, इडली कुकर यासारखी भांडी वेगळ्या ठिकाणी ठेवली जातात.
आ. स्वयंपाक वाढण्यासाठी लागणारी भांडी – आपण ज्या कढईत भाजी फोडणीला टाकतो तीच कढई घेऊन वाढायला जात नाही. तर ती भाजी आधी वेगळ्या कुठल्यातरी भांड्यात काढतो आणि मग ते भांडं घेऊन वाढायला जातो. त्यामुळे ह्या विभागात फक्त ताटं, वाट्या, पेला भांडे हेच नाही तर केलेला स्वयंपाक वाढण्यासाठीचे चमचे/डाव, स्वयंपाक काढून ठेवण्यासाठी असलेली पातेली, वेगवेगळ्या मेनूनुसार वेगवेगळ्या आकाराच्या डिश, क्रोकरी ह्या सगळ्यांचा समावेश होतो.
इ. फ्रीज/ओव्हनची भांडी – घरात रोज स्वयंपाकाला वापरली जाणारी स्टील, नॉनस्टिकची भांडी ओव्हन मध्ये चालत नाहीत. त्यामुळे ओव्हनच्या भांड्यांसाठीचा वेगळा संचच आपल्याकडे असतो. शक्यतो ओव्हनमध्ये चालतील अशीच भांडी फ्रीजमध्ये उरलेलं अन्न ठेवण्यासाठी वापरली तर जास्त फायदशीर ठरू शकतं.
५. स्वछता – स्वयंपाक घर निटनेटके ठेवण्यासाठी लागणारा हा महत्वाचा विभाग. स्वयंपाकघराचे सिंक केंद्रबिंदू धरून स्वछतेसाठी लागणारे सर्व सामान, वेगवेगळ्या प्रकारची भांडी घासायला वेगवेगळे साबण, पावडर, काच पुसण्याचे, फारशी पुसण्याचे liquid, भांडे घासण्याची घासणी/स्पंज आणि इतर अनेक गोष्टी स्वछता विभागात येतात.
स्वयंकघराच्या वापरानुसार केले जाणारे हे स्वयंपाकघराचे विभाग खूप उपयुक्त ठरतात आणि कुठलेही काम करत असताना सगळ्या गोष्टी पटकन हातासरशी सापडतात आणि आपला वेळ आणि कष्ट दोन्हीही वाचतात.
स्वयंपाकघराची अंतर्गत रचना करताना ह्या प्रत्येक विभागावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोतच. तेव्हा पुन्हा भेटू लवकरच एका नव्या कोऱ्या सदरामध्ये……. !!
Snehal Mudkavi
पदार्थांची नावे printable मिळतील का.. उदाहरणार्थ गूळ, मीठ etc.