Close

आपत्कालीन परिस्थिती हाताळताना….

माझ्या सासूबाई आम्हा मुलांपैकी कुणाशीही बोलत असल्या की त्यांना दुसऱ्या कुणाचातरी फोन यायचा आणि मग सगळ्यांशीच अर्धवट बोलणं व्हायचं. त्यामुळे त्यांनी माझ्याशी, माझ्या दोन नणंदांशी, अनुजशी फोनवर बोलायचे वार आणि साधारण वेळ ठरवून घेतली आहे. ह्या ठरलेल्या वेळा सोडून त्यांचा फोन आला की काहीतरी अर्जंट / महत्वाचं असतं असं आम्ही समजतो. परवा… आमचा फोन वर बोलायचा वार नसताना त्यांचा मला फोन आला. सांगलीत पाण्याची पातळी वाढली आहे पण तू काळजी करू नकोस. आपल्या घरापासून पाणी लांब आहे, असं त्या सांगत होत्या. २००५ साली अशीच पाण्याची पातळी वाढली होती. तेव्हाच्या आठवणी सांगत होत्या. त्यावेळी, गावभागात पाणी आल्याने आमच्याकडे जवळजवळ ३५-४० माणसं राहायला आले होते. सुदैवाने घरात जास्तीचं वाण समान भरलेलं होतं. त्यामुळे आठवडाभर ते सर्वाना पुरलं. त्यावेळी आम्ही सगळे मिळून स्वयंपाक करायचो. पुरुष मंडळी भाज्या चिरायचं / निवडायचं काम करायचे, वरकामात मदत करायचे. त्यांना हे सगळं आठवत होतं कारण आज त्यांनी जादाचे १०-१५ किलो गहू दळून आणले. बोलता बोलता नकळतपणे त्यांनी केलेली सगळी तयारी त्या मला सांगत होत्या. सांगलीत पाण्याची पातळी ४५ फूट ओलांडून पुढे गेली होती. ५० फूट झालं की गावात पाणी यायला लागतं. गाव भागातली लोकं आपल्याकडे राहायला येतील म्हणून त्यांनी रविवारीच तयारी करून ठेवली होती. मला त्याचं खूप कौतुक वाटत होतं. इतरवेळी आपण सगळ्या गोष्टींचं नियोजन करतोच पण अश्या वेळी लक्षात ठेवून बारीक सारीक गोष्टींचा विचार करून नियोजन करणं, त्यानुसार समान आणून ठेवणं आणि मुख्य म्हणजे आपण आणि आपलं कुटुंब ह्यापुढे जाऊन एक नागरिक म्हणून विचार करणं ही खूप महत्वाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. अश्या प्रसंगात काय तयारी करून ठेवू शकतो याची यादी खाली देत आहे. अर्थातच ही यादी स्थळ,काळ, व्यक्तीपरत्वे बदलू शकते परंतु, रेफरन्स म्हणून याचा उपयोग होऊ शकतो म्हणून हा सगळा खटाटोप.

. घरामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या निश्चित नसते. त्यामुळे थोडा जास्तीचा धान्यसाठा करून ठेवावा. त्यामध्ये तांदूळ, डाळी, कडधान्य ह्याचं प्रमाण जास्त असावं. अश्यावेळी शक्यतो वरण – भात किंवा खिचडी केली जाते म्हणजे ती लवकर आणि कमी कष्टात होऊ शकते. थोडी जादाची कणिक, ज्वारीचं पीठ आणून ठेवावं. अश्या वेळी भाज्या मिळणंही शक्य नसतं आणि आणायला जाणंही शक्य नसतं. भाज्या आणल्या तरी सततच्या दमट हवामानाने भाज्या लवकर खराब होऊ शकतात. आणि एवढ्या सगळ्या गोष्टींचा साठा करता येईल एवढा आपला फ्रीज मोठा नसतो. त्यामुळे फ्रीजमध्ये इतर गोष्टींसाठी जागा करून ठेवावी. भाजी करायचीच झाली तर कडधान्यांचा वापर करावा.

. घरामध्ये इतरवेळी खाण्यासाठी जास्तीत जास्त कोरडे खाद्य पदार्थ (जे फ्रीजमध्ये ठेवावे लागणार नाहीत आणि खूप काळ टिकू शकतील असे) आणून ठेवावेत. घरात थोडी मिल्क पावडर आणून ठेवावी.

. जरी बाहेर खूप पाऊस पडत असला तरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी मोठं पिंप किंवा मोठया आकाराचं साठवणुकीचं भांडं काढून स्वच्छ करून ठेवावं. (शक्यतो ज्या भांड्याला तळाशी नळ असेल असं भांडं / पिंप पाण्याच्या साठवणुकीसाठी वापरावं. दरवेळी झाकण उघडून वरच्या बाजूने पाणी घेतल्याने, पाणी काढण्यासाठी ‘कोणतंही’ भांडं वापरलं गेल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. जर ह्या भांड्याला खालच्या बाजूने नळ नसेल तर एक वगराळे/मोठा डाव पाणी घेण्यासाठी काढून ठेवावा)

. अश्या वेळी पाणी अधिकच गढूळ यायला लागलेलं असतं त्यामुळे पाणी उकळून प्यावं. पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचादेखील वापर करू शकता. हल्ली बाजारात पाणी शुद्ध करण्यासाठी टॅबलेट मिळतात त्यांचाही वापर करू शकता.

. घरामध्ये आलेल्या माणसांच्या सोयीसाठी जादाचे तांबे, पाण्याचे ग्लास, ताट, वाट्या, चमचे यांची सोय करावी. इतरवेळी जास्त माणसं येणार असतील तर आपण डीसपोजेबल ग्लास, प्लेट्स वापरतो. परंतु, अश्या परिस्थितीमध्ये जर कचरा बाहेर टाकण्याची सोय नसेल तर डीसपोजेबल ग्लास/ प्लेट्स/ इतर कोणत्याही वस्तूंचा वापर कमी करावा.

. वातावरण थंड असल्याने येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही जादाचे हॅंडटॉवेल, टॉवेल, अंथरूण, पांघरूण काढून ठेवावेत. शक्यतो एकमेकांचे हॅंडटॉवेल, पांघरूण वापरू नयेत. हल्ली सगळीकडे डिसइन्फेक्टंट स्प्रे मिळतात. ते घरात आणून ठेवावेत.

. पावसाच्या पाण्यामुळे वीज पुरवठा खंडित केला जाऊ शकतो. अश्यावेळी घरात बॅटरीवर चालणारे टोर्च / इमार्जन्सी लाईट असू द्यावेत. प्रत्येका खोलीत एक विशिष्ठ जागा ठरवून त्याच जागी टोर्च / इमार्जन्सी लाईट ठेवावेत. चार्गिंग संपलं / सेल संपले तर… म्हणून एक मेणबत्ती आणि काडेपेटी असा सेट प्रत्येका खोलीत असावा. काडेपेटी पिशवीत गुंडाळून ठेवावी (हवेमुळे खराब होऊ नये म्हणून)

. पाण्याची पातळी, त्याबद्दलचे अपडेट्स हे टीव्ही, रेडीओ किंवा आता सोशल मिडियावर मिळत असतात. पण विद्युत पुरवठा खंडित झाल्याने टीव्ही किंवा मोबाईल (चार्गिग संपल्याने) यांचा उपयोग होऊ शकत नाही. अश्या वेळी बॅटरीवर चालणारे रेडीओ उपयोगी ठरतात. त्यावरून महत्वाची माहिती, अपडेट मिळत राहतात. सरकारी यंत्रणेकडून मिळणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवा. त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. जनसंपर्क तुटल्याने बऱ्याचदा ह्या सूचना वॅार्निंग सायरनच्या माध्यमातून देण्यात येतात. त्याकडे लक्ष ठेवा.

. अश्यावेळी लॅंडलाईन बंद केले जातात. जनसंपर्क तुटू शकतो. स्मार्ट फोनमधील विविध अॅप्लीकेशन्समुळे त्याची बॅटरी लवकर संपून जाते. अश्या वेळी पावर बँकचा वापर करू शकतो. घरामध्ये एक मोबाइल (बेसिक मोबईल) संपूर्ण चार्ज करून मग स्वीच ऑफ करून ठेवून द्यावा. घरात असणाऱ्या सगळ्या लोकांचे मोबाईल बंद पडल्यावर हा मोबाईल सुरु करावा.

१०. बाहेरून आणून ठेवायच्या वस्तू :

– जादाचे तांदूळ , डाळ , कडधान्य
– गहू / ज्वारी पीठ
– तेल
– कोरडे खाद्य पदार्थ
– मिल्क पावडर
– तुरटी / पाणी शुद्ध करण्यासाठी टॅबलेट
– वेगवेगळ्या प्रकारचे सेल / बॅटरीज
– टॉर्च
– मेणबत्ती – काडेपेटी
– मेडिकल कीटमध्ये नसलेल्या गोष्टी
– डिसइन्फेक्टंट स्प्रे
– शिट्टी
– निओंन रंगाची काठी
– डासांपासून सुरक्षा करण्यासाठी क्रीम / कोइल / मशीन
– जादाचे सॅनिटरी नॅप्कीन्स

११. मेडिकल किट :

आजूबाजूला कोणी डॉक्टर राहत असतील तर त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांचे फोन नंबर्स टिपून घ्या. अर्थात काही वेळा मोबाईल कंपन्यांना त्यांची सर्व्हिस बंद करावी लागते त्यामुळे मोबाईलसुद्धा बंद होऊ शकतातच. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या / औषधांच्या यादीसमोर कोणती गोळी कशासाठी घ्यायची हे लिहून ठेवा. अन्यथा गोळ्यांच्या कव्हरवर त्या गोळ्या कश्यासाठी आहेत हे परमनंट मार्करने लिहून ठेवा. आम्हाला डॉक्टरांनी दिलेली यादी खाली देत आहे.

– टॅबलेट – (सर्दी , ताप , डोकेदुखी, पोटदुखी, जुलाब, अंगदुखी, अॅर्लजी ह्या सगळ्यावरच्या गोळ्या/ पेनकिलर्स)
– स्कीन इन्फेक्शनवरच्या गोळ्या / क्रीम
– रक्त पातळ होण्यासाठी गोळ्या , शुगरवरच्या गोळ्या
– डोकेदुखी, अंगदुखी, कापल्यावर, भाजल्यावर लावण्यासाठी बाम
– बँडेज
– बँडेड
– कापूस
– डिसइन्फेक्टंट
– सोफ्रामाईसीन किंवा तत्सम मलम
– छोटी कात्री

१२. पाणी हे उत्तम विद्युतउर्जा वाहक असल्याने पुराच्या पाण्यात विद्युतउर्जा असण्याची भीती असते. घरातल्या अर्दिंगला अडचण येऊ शकते. शॉक बसण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या आसपास कोरडे लाकूड, प्लास्टिक, रबराची (किंवा कोणतेही ‘नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी’) वस्तू ठेवावी.

१३. आपल्यासोबत घरात असणाऱ्या सगळ्या जणांचे फोन नंबर्स आपल्या कुटुंबियांना देऊन ठेवावेत.

१४. पुराचं पाणी वाढलं, घरात आलं तर आपण काय काय करायचं हे बसून कुटुंबियांसोबत ठरवा. घरतल्या लहान मुलांना समजावून सांगा. माणूस कितीही मोठा आणि कितीही शूर असला तरी जीवाची भीती प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे एकमेकांचं मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करा. शक्यतो आपलं घर आणि आपले कुटुंबीय यांना सोडून एकटे जाऊ नका.

मुळात अशी वेळ कोणावरही येऊ नये. रोज वाढत चालेली पाण्याची पातळी, सांगली कोल्हापूरच्या पुराच्या बातम्या बघून आणि ऐकून अस्वस्थ होतं. आपण इथे बसून फारशी काही मदत करू शकत नाही ही हतबलता त्रास देते. सतत काळजी वाटत राहते. लवकरात लवकर ही परिस्थिती पूर्वव्रत व्हावी आणि लोकांना सुखरूप आपापल्या घरी जाता यावं हीच प्रार्थना. गेले काही दिवस आपण प्रवास, प्रवासाचे नियोजन ह्याबद्दल बोलत होतो. आज जरा विषयांतर झालं खरं… पण जर कुणाला मदत होत असेल, उपयोगी पडत असेल तर काय हरकत आहे , नाही का?

#घघराचा #नियोजनामागचेप्रयोजन

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!