घरात पसारा होत आहे, राडा होत आहे, हे आपल्याला कळत असतं. अनावश्यक गोष्टी वाढत आहेत हे लक्षात येत असतं. परंतु, आपण, त्या वस्तू टाकून देऊ शकत नाही किंवा आवरायचं म्हणलं तर नेमकी कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही. बेडरूममध्ये सामान खूप असतं आणि ते ठेवण्यासाठी जागा कायम कमी पडत असते (कितीही जास्त असली तरीही) परंतु, फर्निचर करताना, सामान मावण्यासाठी खूप स्टोरेज केलं तर तेसुद्धा आपल्या अंगावर येतं. ह्या दोन्हीमधला समतोल राखण्यासाठी आपण अगदी इंच इंच लढवत असतो. शक्य असेल तेवढी सगळी जागा वापरत असतो. आपलं कपाट, बेडसाईडटेबल हे कायम नीटनेटकं असावं असं प्र्त्यकालाच वाटत असतं. बाहेरून थकून भागून आल्यानंतर आरामासाठी, विश्रांतीसाठी आपण इथे येत असल्याने जर बेडरूममध्ये राडा, पसारा असेल तर आपल्याला आणिकच ताण येऊ शकतो,आपल्या नकळतपणे. प्रत्येकाकडे असणारी जागा, राहणीमान, वस्तू वापरण्याच्या सवई, पद्धती निरनिराळ्या असल्याने कोणकोणत्या वस्तू कश्या ठेवायच्या ह्यासाठी समान मापदंड लावता येऊ शकत नाही. परंतु, काही गोष्टी आपण आपल्या सोईनुसार आमलात आणू शकतो.
पसारा आवरताना एकावेळी एकच गोष्ट आवरायला काढावी. एकाच दिवशी कपड्याचं कपाट, ज्वेलरी, मेकअप, बेडमधलं सामान आवरायला काढलं, तर सगळंच अर्धवट राहण्याची जास्त शक्यता असते. बेडरूममधील सगळ्यात जास्त जागा व्यापणाऱ्या दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे बेड आणि दुसरं म्हणजे कपाट. आज आपण बेड आणि त्याच्या आजूबाजूच्या गोष्टीच्या स्वच्छतेबाबत बोलणार आहोत.
१. बेडफ्रेम :
आपण उश्यांचे आभ्रे, चादरी वेळच्यावेळी बदलतो, सगळं स्वच्छ करतो पण बेडसुद्धा स्वच्छ करायला हवा. प्रत्येकाच्या बेडचं डिझाईन वेगवेगळं असतं. परंतु, कोणत्याही डिझाईनमध्ये बेड आणि गादीमध्ये असणाऱ्या फटीत खूप धूळ जमा होते. बेडच्या कडा, जमिनीकडची बाजू ह्यांवर खूप धूळ बसलेली असते. ही सगळी धूळ आधी कोरड्या आणि मग ओल्या फडक्याने पुसून घ्यावी. कधी कधी खूप कोपऱ्यात आपला हात पोचू शकत नाही. अश्यावेळी टूथब्रशच्या सहाय्याने कोपऱ्यात असलेली धूळ स्वच्छ करावी. घरात व्हॅक्यूम क्लीनर असेल तर त्यानेसुद्धा ही सगळी धूळ स्वच्छ करता येते.
बऱ्याच बेड डिझाईन्समध्ये बेडबॅक किंवा हेडबोर्डचा वापर केलेला असतो. काही जणांच्या हेडबोर्डला कुशन्स असतात काहींचा लाकडी असतो काही वेळा टाइल्स बसवलेल्या असतात. त्यामुळे त्या त्या मटेरीअलनुसार तो स्वच्छ करावा. टाइल्स ग्लास क्लीनरने स्वच्छ करता येतात. लाकडी हेडबोर्ड नुसत्या पाण्याने पुसून घेतला तरी चालतो. जर हेडबोर्डला कापड लावलेलं असेल तर एका वाटीत डिशलिक्विड सोप आणि पाणी सम प्रमाणात घेऊन जाड स्पंज त्यात बुडवा. अत्यंत हलक्या हाताने जिथे डाग पडलेला आहे तिथे लावा. कमी प्रेशर देऊन बोटाने घासा. ५ मिनिटं तसंच राहू देत आणि मग स्पंज स्वच्छ पाण्यात पुडवून हलक्या हाताने पुसून घ्या जेणेकरून साबण निघून जाईल. त्यानंतर टिशू पेपर किंवा नॅपकिनने शक्य असेल तेवढं पाणी शोषून घ्या. ही सगळी स्वच्छता करण्याआधी कोपऱ्यात छोट्याश्या भागात किंवा मागच्या बाजूला किंवा जो भाग उश्यामुळे झाकला जातो अश्या भागात प्रयत्न करून बघा जर व्यवस्थित झालं तरच संपूर्ण हेडबोर्ड किंवा जिथे डाग पडला आहे तिथे स्वच्छ करा.
२. उशी :
उश्या आकाराने मोठ्या असल्याने स्टोअर करून ठेवताना खूप जागा अडवतात. त्यामुळे जुन्या झालेल्या, खरब झालेल्या उश्या, ज्या आपणही वापरणार नाही आणि आलेल्या पाहुण्यांना देऊ शकणार नाही अश्या उश्या काढून टाका. आपल्याकडे एकावेळी साधारण किती पाहुणे येतात याचा अंदाज घेऊन तेवढ्याच उश्या ठेवा. अगदीच जादाच्या हव्या असतील तर २-३ एअर पिलो ठेवा म्हणजे जागा अडणार नाही, घडी घालून ठेवता येईल आणि गरजेला उपयोगी पडतील.
आपल्याकडे वर्षानुवर्ष त्याच उश्या वापरतात अगदी उशी मधून वाकत असली तरीसुद्धा. उश्याचं आयुष्य १५-२० वर्ष नसतं. उशी हातात घेतल्यानंतर तिच्या मध्यभागी हात धरून फोल्ड करायची आणि ती परत पटकन पुर्वव्रत झाली तर उशी उत्तम आहे किंवा वापरण्याजोगी आहे आणि फोल्ड केलेली उशी तशीच राहिली तर ती खराब झालेली असते. त्यातला स्पंज खराब झालेला असल्याने ती आडवी (flat) होते. त्यातला फुगीरपणा जातो आणि त्याची घडी घातला येते. अश्या उश्या पातळ झाल्या आहेत हे हाताला जाणवतं. उश्यांचे लेबल्स बघितले तर लक्षात येईल की आपण वापरत असणाऱ्या उश्या १. पोलीएस्टर, २. मेमोरी फोम, किंवा ३. कापूस ह्यापासून तयार होतात. घरातल्या कापसाच्या, जुन्या उश्या देऊन आपल्याला नविन उश्या करून मिळतात. त्यामुळे त्याचा जरूर विचार करावा.
डोक्याला लावलेलं तेल, अंगाला, चेहऱ्याला लावलेलं लोशन, शरीरातून उत्सर्जित होणारं तेल, ह्यामुळे उश्या आणि आभ्रे पटकन खराब होतात. आभ्रे खराब होऊ नयेत म्हणून काही जण उश्यांवर नॅपकिन ठेवतात. हल्ली उश्यांना पिलो प्रोटेकटर मिळतात किंवा आपण घरच्या घरी उश्यांसाठी एक कव्हर शिवून घेऊ शकतो. त्वचारोगतज्ञसुद्धा उशांचे कव्हर आठवड्याला किमान दोन वेळा बदला असं सांगतात (विषेशकरून ज्यांना सतत मुरूम किंवा फोड येत असतात अश्यांसाठी. त्यांच्या उश्या किंवा उश्यांचे अभ्रे इतरांनी वापरू नयेत आणि उश्यांचे अभ्रे रोज बदलावेत.)
३. गादी:
आपलयाला गादी धुता येत नाही पण आपण ती स्वच्छ करू शकतो. गादीवरचं बेडशीट बाजूला काढून ठेऊन शक्य असल्यास थोडा वेळ मोकळी ठेवायची. सतत गादीवर बसल्याने किंवा खूप उन्हाळ्यात आपल्या घामाने किंवा पावसाळ्यातल्या कुबट हवेनेसुद्धा गादी खराब होऊ शकते. घरात व्हॅक्यूम क्लीनर असेल तर त्याने गादीवरची धूळ स्वच्छ करता येते. नसेल तर हाताने किंवा फडक्याने आपण गादी झटकून घेऊ शकतो. काही जणं उन्हाळ्यामध्ये मुद्दाम थोड्या वेळासाठी गादया उन्हात नेऊन ठेवतात.
४. बेड स्टोअरेज :
पसारा साठवून ठेवण्यासाठी असलेली हक्काची जागा म्हणून ह्या बेड स्टोअरेजकडे बघितलं जातं. परंतु, खरं सांगायचं झालं तर बेडमध्ये वस्तू साठवून ठेवायला जागा आहे म्हणून भरमसाठ वस्तू साठवून ठेवू नयेत. बेडमध्ये वस्तू साठवून ठेवताना खाली वर्तमानपत्र किंवा वॉशेबल लायनर घाला (जर वॉशेबल लायनर असेल तर चार कोपऱ्यात चक्क डबल साइड सेलोटेपने चिकटवून घ्या म्हणजे ते हलणार नाही) वस्तूंच्या वापरानुसार त्यांचे वर्गीकरण करून त्यानुसार गोष्टी ठेवा. ज्या वस्तू सतत लागत असतात त्या वस्तू वरच्या बाजूला ठेवा म्हणजे पटकन काढ घाल करता येईल. जर वेगवेगळ्या आकाराच्या ट्रॅव्हल बॅग्स असतील तर त्या एकात एक घालून ठेवा म्हणजे सगळ्या बॅग्स एकाच ठिकाणी राहतील आणि जागा वाचेल. त्या बॅग्सला असणाऱ्या कुलुपांच्या सर्व किल्ल्या आणि कुलूप त्याच बॅगमध्ये टाकून ठेवा म्हणजे हरवणार नाही/ आयत्यावेळी शोधाशोध करावी लागणार नाही. आपापल्या सोईनुसार बेडमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ठेवता येतात उदा: १. जादाचे अंथरुण, पांघरूण, २. गादया, ३. लोकरीचे कपडे, ४. आपल्याला आलेल्या भेटवस्तू, ५. ट्रॅव्हल बॅग्स, ६. जादाची भांडी, डिनरसेट, ७. न लागणाऱ्या पण आठवणीतल्या वस्तू, ८. फोटो अल्बम, ९. पडदे , १० फ्रेम्स इत्यादी. आत ठेवलेल्या सामानची एक यादी करून कपाटात ठेवावी किंवा सरळ त्याचा फोटो काढून सेव्ह करून ठेवावा. एखादी वस्तू कुठे आहे हे शोधत बसण्यात खूप वेळ वाया जातो. तो आपल्याला वाचवता येईल.
आज इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या सदरामध्ये…!!