स्वच्छता मोहीम: काही टिप्स
आपण वर्षभर घराची स्वच्छता करतच असतो मात्र तरीही दिवाळी जवळ आली की आपली वार्षिक स्वच्छता सुरु होते. घरातली अडगळ काढून टाकावी लागते, जुन्या, तुटक्या वस्तू काढून टाकाव्या लागतात आणि घर पुन्हा एकदा नीटनेटकं आणि स्वच्छ करावं लागतं. आपण १ ऑक्टोबर पासून घराची स्वच्छता चालू करणार आहोत. पण स्वच्छता करण्यापूर्वी काही गोष्टी लिहाव्यात ज्याचा स्वच्छता करताना फायदा होईल असं मला वाटलं. त्यामुळे आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत.
१. स्वच्छतेला सुरुवात करताना कायम वरपासून खालपर्यंत म्हणजे छताकडून जमिनीच्या दिशेने करावी, कारण वरच्या कप्प्यांमधली स्वच्छता करताना सगळी धूळ, कचरा जमिनीवर पडल्याने खालचे कप्पे किंवा फर्शी खराब होते. तसंच घरातल्या सगळ्यात आतल्या बाजूने स्वच्छता करत घराच्या बाहेरच्या भागांत यावं.
२. स्वच्छतेचा वेळ वाचविण्याचा मुख्य मार्ग म्हणजे डागांवरचे प्रथमोपचार. एखादा डाग पडला आणि तो लगेच धुवायला आपल्याला वेळ नसला, हातात दुसरं काही काम असलं किंवा आपण गडबडीत असू तर आपण म्हणतो थोड्या वेळाने बघू. तोपर्यंत तो डाग तसाच वाळून जातो किंवा नंतर आपण विसरूनही जातो आणि नंतर तो काढण्याचा प्रयत्न केला तर त्यात खूप वेळ आणि शक्ती वाया जाते. कधी कधी तर ते डाग निघतही नाहीत. डाग पडल्या पडल्या पुसून घेतलं किंवा त्यावर पाणी टाकलं (किंवा डाग काढून टाकण्यासाठी जे काही करण अपेक्षित आहे ते केलं) तर डाग वाळत नाहीत आणि नंतर ते काढणं सोपं जातं.
३. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या प्रकरच्या क्लीनर्सचा आणि नॅप्कीनचा वापर केला जातो. वस्तूचा प्रकार आणि कापडाचा पोत ह्यावरून कोणत्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी कोणत्या प्रकारचे फडकं / नॅप्कीन वापरायचा हे ठरते. ह्या संदर्भात मी काही दिवसांपूर्वी दोन ब्लोग लिहिले होते त्याची लिंक खाली देत आहे.
त्यासोबतच काच, लाकूड, धातूच्या वस्तू अश्या विविध माध्यमांमधून तयार होणाऱ्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे क्लीनर वापरतात. त्यामुळे चुकीच्या क्लीनरने चुकीच्या वस्तू स्वच्छ केल्या तर त्या खराब होण्याची स्वच्छता असते.
४. हल्ली कपड्यांना, बेडशीटला, पडद्यांना, त्यांची स्वच्छता कशी करावी ह्याबद्दलची माहिती देणारे छोटे टॅग लावलेले असतात. त्यामुळे त्यांची स्वच्छता करताना ह्या गोष्टींचा आणि संकेतचीन्हानांचा जरूर विचार करावा. ह्यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ‘स्वच्छतेच्या संकेतचीन्हांचा अर्थ’ हा ब्लॉग जरूर वाचा.
५. दिवसभरातलं स्वच्छतेचं/ साफसफाईचं काम संपल्यावर स्वच्छतेसाठी वापण्यात येणारे ब्रश, टूल्स, फडकी ही स्वच्छ धुवून वाळत घालावीत किंवा पुसून ठेवावीत. ते जर तसंच ठेवलं तर त्यांचा कुबट वास येत राहतो. स्टील/ लोखंडाच्या वस्तू गंजू शकतात आणि पुढच्या वेळी जर तसंच वापरलं तर त्यातली घाण आणि जीव जंतू पसरू शकतात.
६. स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी सगळी तयारी करून ठेवली तर ते सोपं जातं. जर १ ऑक्टोबरपासून स्वच्छतामोहिमेला सुरुवात करायची असेल तर त्याआधीच स्वच्छतेसाठी लागणाऱ्या गोष्टी, बॉक्सेस, क्लीनर्स, जेवणाची तयारी ह्या सगळ्या गोष्टींची सोय करून ठेवायची म्हणजे आपण स्वच्छतेवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो.
७. स्वच्छतेसाठी लागणारे सगळे प्रॉडक्ट्स एकत्र करून एका बॉक्समध्ये किंवा डब्यात/बास्केटमध्ये ठेवायचे (मग तो झाकण हरवलेला/न लागणारा डबा असला तरी चालेल) कारण दरवेळी लागलेली वस्तू आणायला जाणं, वस्तू शोधत राहणं ह्यात खूप वेळ आणि शक्ती वाया जाते. सतत उठबस करून आणि फेऱ्या मारून आपली शक्ती संपून जाते आणि मग आपल्याला कंटाळा यायला लागतो. कशाला जागेवरून उठा, आहे त्या सामानात स्वच्छ करू असं होतं, म्ह्णून स्वच्छतेच्या साहित्याचा एक बॉक्स तयार करावा असं मला वाटतं.
८. आपण जेव्हा एखाद्या क्लीनरने स्वच्छ करत असतो तेव्हा ते क्लीनर लावल्यावर किंवा मारल्यानंतर ते सेट व्हायला किंवा त्याला काम करायला थोडासा वेळ द्यावा लागतो. क्लीनरने काचेवर स्प्रे मारला आणि लगेच पुसून घेतलं तर त्या क्लीनरचा किंवा प्रॉडक्टचा उपयोगच होणार नाहीआणि त्यामुळे एकतर प्रॉडक्ट वाया जाईल आणि वस्तू म्हणावी तशी स्वच्छ होणार नाही.
९. क्लीनर किंवा स्वच्छतेच्या इतर कोणत्याही प्रॉडक्ट्सचा वापर करताना आधी माइल्ड/सॉफ्ट प्रॉडक्ट्स वापरावी. जर त्याने डाग निघाले नाहीत तरच अॅसीड किंवा हार्श प्रॉडक्ट्सचा मर्यादित वापर करावा. अश्या गोष्टींचा स्वच्छतेसाठी वापर करताना आपल्या हातांची आणि संपूर्ण शरीराची काळजी घ्यावी. कधी कधी अश्या हार्श प्रॉडक्ट्सने आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्याला वाटतं की ही वस्तू प्रचंड खराब झाली आहे म्हणून आपण लगेच अॅसीड वगैरे वापरायला जातो पण ते कदाचित साध्या क्लीनरनेदेखील निघू शकतं. हार्ड क्लीनर्समुळे त्या वस्तू किंवा वस्तूंचा पृष्ठभागही खराब होऊ शकतो.
१०. घरातली स्वच्छता मोहीम किती दिवसांत पूर्ण करायची आहे, रोज किती वेळ काम करायचं आहे किंवा रोज काय काय काम करायचं आहे हे आपलं आपण ठरवणं जास्त योग्य, असत असं मला वाटतं. आपल्याकडे उपलब्ध असणारा वेळ, स्वच्छतेची गरज आणि आपली आवड ह्यांचं आपणच गणित मांडून स्वच्छतेचे वेळापत्रक करून घ्यावं. कोणत्या दिवशी काय काय करता येईल याचा विचार करून हे वेळापत्रक तयार केलं तर ज्या दिवशी स्वच्छता करायची आहे त्याआधी तुमची तयारी होऊ शकेल (मानसिक तयारीसुद्धा) आणि इतर कामांचे नियोजन करणे सोपे जाईल. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, उपलब्ध असणारा वेळ, स्वच्छतेची गरज ही वेगवेगळी असल्याने आपली इतरांशी तुलना करू नये असं मला वाटतं. त्यामुळे स्वतःच टार्गेट ठरवावं. ‘जेवणापूर्वी हे सगळं आवरणार आहे’ किंवा ‘दोन तासात हे काम संपवू’ किंवा गाणी ऐकत करणार असू तर ‘ही पहिली प्ले लिस्ट होईपर्यंत अमुक एक काम संपवू’ असं आपलं आपणच ठरवू शकतो. परंतु, ध्यानात असू द्या की आपलं टार्गेट आपल्याला पूर्ण करता येईल अश्याच पद्धतीने ठरवावं. स्वतःकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नयेत.
११. आपल्या स्वच्छतेचं आपणच एक वेळापत्रक तयार केलं तर ते जास्त सोपं जातं. आपल्या स्वच्छता मोहिमेमध्ये जर इतर कुणाची मदत घेणार असू तर त्यांना तशी कल्पना देऊन ठेवावी आणि त्यांनी काय काय काम करणं अपेक्षित आहे याची एक यादी त्यांना द्यावी.
१२. एखादी गोष्ट कशी स्वच्छ करायची याची कल्पना नसेल तर मी त्या वस्तूबद्दल आणि त्याच्या स्वछातेबद्दल आधी माहिती काढते . ‘घ घराचा’ ह्या आमच्या फेसबूक पेजवर किंवा ब्लॉगवर काही गोष्टींची स्वच्छता कशी करायची ह्याची माहिती दिलेली आहे त्याचाही तुम्ही वापर करू शकता. घरातल्या किंवा परिचयातल्या अनुभवी व्यक्तींनादेखील विचारू शकता. माहिती काढून स्वच्छता केल्याने वस्तू खराब होण्याची शक्यता कमी असते.
१३. स्वच्छता मोहिमेतील सगळ्यात मोठी अडचण म्हणजे हातातला मोबाईल. आपण कुणाचातरी मेसेज आला म्हणून जे मोबाईल हातात घेतो ते मेसेज बघून मग जरा फेसबुक बघून मग जरा इतर नोटीफिकेशन्स बघून मग खाली ठेवतो. किंवा कुणाचातरी फोन आला की कधी अर्धा तास संपतो कळत नाही. ह्यामध्ये खूप वेळ जातो आणि आपली काम करण्याची इच्छा संपून जाते, कंटाळा येतो. त्यामुळे मोबाईल बाजूला ठेवला तर त्याचा नक्की उपयोग होतो.
१४. समजा एखाद्या कामाला जास्त वेळ लागत असेल किंवा एखादा डाग निघत नसेल तर मी ते काम जरावेळ बाजूला ठेवते आणि उरलेली सगळी कामं पूर्ण करून घेते. तो एक डाग काढण्याच्या नादात सगळी स्वच्छता मागे राहते आणि मग बाकीचं काहीच आवरून होत नाही.
१५. ज्या दिवशी घरी स्वच्छता असेल त्या दिवशी मी एकतरी पदार्थ माझ्या आवडीचा करते/मागवते. मला छान छान खायला खूप आवडतं. आवडीचे पदार्थ खाल्ले की माझा दमलेला आणि कंटाळवाणा मूड अश्या छान पदार्थाने एकदम मस्त होतो. तुम्हाला सिनेमा बघायला आवडत असेल तर ते करा. स्वतःला आवडणारी एखादी गोष्ट केली की आपली आपल्यालाच शाबासकी दिल्यासारखं वाटतं. घरात केलेल्या स्वच्छतेचं घरातल्या इतर मंडळीनी कौतुक केलं नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नये कारण आपल्याला स्वच्छ आणि नीटनेटक्या घरात राहायला आवडतं म्हणून आपण स्वच्छता करत असतो.
१६. मी कामाच्या याद्या तयार करते. याद्यांमुळे कामं विसरत नाहीत. पुढच्या वेळी तेच काम करायचं असेल तर तर मागची रेफरन्स लिस्ट वापरता येते आणि सगळ्यात मुख्य म्हणजे काम झालं की त्या कामावर ‘टीक’ केल्यावर मला खूप छान वाटतं, समाधान मिळतं.
१७. एकटीनेच काम करत राहण्याचा कंटाळा येतो, कधी कधी नेगेटिव्ह वाटायला लागतं. त्यामुळे सोबतच्या मैत्रिणींना विचारा, त्याही त्याचवेळी स्वच्छता करणार असतील तर तुम्हाला सोबत मिळेल. एकमेकींना विचारा “आज तुझं काय काय झालं?” तुमची इच्छा असेल तर ‘घ घराचा’ ह्या फेसबूक पेजवरवर तुम्ही तुमच्या स्वच्छता मोहिमेबद्दल लिहू शकता आणि आम्हाला टॅग करा. एकमेकांना प्रोत्साहन दिल्याने काम पटकन झाल्यासारखे वाटते आणि कामाचा शीणवटा येत नाही.
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा. पुन्हा भेटू लवकरच…!
चित्रा
आपण मागे गणपतीच्या पूजेला लागणाऱ्या सामानाची यादी दिली होती. त्यामुळे काम खूप हलके झाले. आताही दिवाळीची कामे बघता बघता पूर्ण होतील, असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
घ घराचा
आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद..!!!