मागच्या भागात आपण एक्झॉस्ट फॅन, चिमणी, फिल्टर, ब्लेंडर ह्या सगळ्यांच्या स्वच्छतेबाबत बोललो. आज आपण बोलणार आहोत स्वयंपाकघरातल्या उर्वरित उपकरणांच्या स्वच्छतेविषयी.
१. फ्रीज :
घरातील इतर सदस्य स्वयंपाकघरातील बाकी गोष्टी किती हाताळतात माहित नाही पण फ्रीजचा वापर मात्र सगळेजण करत असतात. त्यामुळे फ्रीज जितका आतून खराब होतो तेवढाच बाहेरूनसुद्धा खराब होतो. विशेषतः फ्रीजचे हॅन्डल. त्यामुळे निदान फ्रीजचे हॅन्डल तरी रोज पुसून घ्यावे. फ्रीज जेव्हा आतून बाहेरून स्वच्छ करायचा असतो तेव्हा सगळ्यात आधी बटण बंद करून प्लग काढून ठेवा आणि आतलं सगळं सामान, भाजीचा ड्रॉवर आणि इतर जेवढे ड्रॉवर/कप्पे बाहेर काढू शकतो तेवढे सगळे ड्रॉवर/कप्पे बाहेर काढा. त्यानंतर फ्रिज आहे त्या जागेवरून बाजूला हलवा आणि जमिनीवर फ्रीजखालच्या भागात आणि मागच्या बाजूला साठलेली धूळ स्वच्छ करा. पूर्वी मागच्या बाजूला फ्रीजच्या कंडेन्सर वायर दिसायच्या, मागच्या बाजूने जाळी असायची त्यामुळे त्यात खूप घाण अडकून बसायची. हल्ली त्याला वरून पॅनल लावलेलं असल्याने ते स्वच्छ करायला सोपं जातं. आपल्या ‘युजर गाईड’ मध्ये ह्या कंडेन्सर कॉईलच्या स्वच्छतेविषयी सूचना दिलेल्या असतात त्या नक्की वाचा आणि त्यानुसार त्याची स्वच्छता करा.
फ्रीजमधले बाहेर काढलेले सगळे ड्रॉवर डिश लिक्विड सोपने धुवून स्वच्छ करा आणि जमल्यास उन्हात वाळवा किंवा एखाद्या सुती कपड्यावर सगळे उपडे करून ठेवा. जास्त डाग पडले असतील तर त्यावर पाणी/ साबण लावून थोडावेळ तसंच भिजवत ठेवायचं. हे सगळे ड्रॉवर वाळेपर्यंत ग्लास क्लीनर वापरून फ्रीज आतल्या बाजूने पुसून घ्या. काही कोपऱ्यांमध्ये जिथे नीट हात पोहोचत नाही अश्या ठिकाणी टूथब्रश वापरून स्वच्छ करू शकता. डिश सोप फ्रिजच्या आतल्या बाजूला वापरला तर तो पटकन निघत नाही म्हणून ग्लास क्लिनर वापरावं किंवा सरळ व्हिनेगर आणि बेकिंग सोडा एकत्र करून वापरावं त्याने फ्रिजला लागलेला वेगवेगळ्या पदार्थांचा वास निघून जातो. जर डाग निघत नसतील तर बेकिंग सोडा/बेकिंग सोड्याची पेस्ट वापरा त्याने डाग नक्की जातील. पेस्ट लावून थोडा वेळ तशीच ठेवा नंतर टूथब्रशने घासा आणि स्पंजने पुसून घ्या. हीच प्रोसिजर फ्रिजच्या बाहेरच्या बाजूने करायची. फ्रिजचा मागचा भाग फारसा पुसला जात नाही. तो आठवणीने स्वच्छ करायचा. दाराच्या बाजूला रबर लावलेलं असतं आणि तेही काळं झालेलं असतं ते देखील टूथब्रश वापरून स्वच्छ करावं .
त्यानंतर पुन्हा एकदा कोरड्या फडक्याने फ्रीज आतून आणि बाहेरून पुसून घेऊन जरा वेळ वाळू द्यायचा. त्यानंतर स्वच्छ केलेले सगळे कप्पे पूर्ण वाळल्याची खात्री झाल्यावर फ्रीजमध्ये जागच्या जागी लावायचे. शक्य असेल तर त्या सगळ्या कप्प्यांमध्ये खाली वॉशेबल मॅट टाकायची त्यामुळे फ्रीजचे कप्पे / ड्रॉवर जास्त खराब होत नाहीत.
फ्रीजमधून बाहेर काढलेल्या सामानापैकी जे समान संपलं आहे, ह्यापुढे लागणार नाही, एक्सपायरी डेट उलटून गेली आहे असे सर्व पदार्थ/ गोष्टी टाकून द्यायच्या आणि उरलेलं सामान परत व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून ठेवायचं. समान फ्रीजमध्ये परत ठेवण्यापूर्वी बाटल्या/बरण्या ओल्या फडक्याने, बाहेरच्या बाजूने, पुसून घ्या (कोणतेही क्लिनर न वापरता) म्हणजे बाहेरून चिकट झालेल्या बाटल्या स्वच्छ होतील आणि खाली काही सांडणार नाही/ डाग पडणार नाहीत. फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात किंवा कश्या ठेवाव्यात ह्यावर मी दोन ब्लॉग लिहिले आहेत त्याची लिंक खाली देत आहे.
फ्रिजच्या नियोजनापूर्वीचा विचार
ह्या दोन ब्लॉगचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. फ्रीजमधल्या वस्तू योग्य पद्धतीने ठेवल्याने आपल्या रोजच्या गडबडीच्या वेळेला त्याचा फायदा होतो आणि समोर दिसलं नाही म्हणून खाल्लं गेलं नाही किंवा अश्या प्रकारचे वेस्टेज कमी होतं. दर महिन्याला असं फ्रीज स्वच्छ करा. महिन्याचा किराणा भारण्याआधी स्वच्छ करा म्हणजे फ्रीज मधलं सामान कमी असेल तर कमी पसारा होईल आणि कमी वेळात होईल.
२. मिक्सर आणि फूड प्रोसेसर :
रोजच्या स्वयंपाकात वाटण वापरत असल्यास मिक्सरचा वापर जास्त होतो. मिक्सरचं भांडं जरी मोठं असलं तरी खालच्या बाजूला पाते/ब्लेड्स फिक्स असल्याने स्वच्छता करणं अवघड जातं (जर ब्लेड्स निघत असतील तर ब्लेड काढून मगच भांडं आणि ब्लेड वेगवेगळं स्वच्छ करावं). त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात थोडसं (साधारण भांड्याच्या १/४) पाणी घेऊन त्यात दोन थेंब डिश लिक्विड सोप टाकून भांड मिक्सरला लावायचं आणि १०-१५ सेकंद फिरवायचं. ह्यामुळे मिक्सरच्या भांड्याच्या तळाशी असणारे सगळे बारीक सारीक अन्नाचे कण निघून जातात. आपण घासणीने घासत बसलो तर हाताला ब्लेड लागण्याची, ब्लेडला धार असल्याने घासणी खराब होण्याची किंवा ब्लेडची धार कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा त्यावरचा उत्तम उपाय आहे. मिक्सर/ फूड प्रोसेसर बाहेरच्या बाजूनेसुद्धा खूप खराब होतो.त्यामुळे बाहेरच्या बाजुनेसुद्धा स्वच्छ करावा. मिक्सरचं भांडं घासताना झाकणाला असणारे रबर बाहेर काढून झाकण आणि रबर वेगवेगळे स्वच्छ करावे म्हणजे व्यवस्थित स्वच्छ होते कारण त्या रबरालासुद्धा आतल्या बाजूने अन्नाचे कान चिकटून राहिलेले असतात.
३. ओव्हनची स्वच्छता :
ओव्हनची स्वच्छता करण्यापूर्वी थंड आहे ह्याची खात्री करा आणि बटण बंद करून प्लग बाजूला काढून ठेवा. ओव्हनमधले अन्नाचे कण काढून घ्या. त्यानंतर ओव्हनची जाळी बाहेर काढून, किमान २-३ तास साबणाच्या पाण्यात ती जाळी ठेवा. त्यानंतर बाहेर काढून पाण्याखाली धरा आणि कोरड्या फडक्याने पुसून घ्या.
संपूर्ण ओव्हनला आतल्या बाजूने बेकिंग सोडा लावा आणि नंतर त्यावर पाणी मारा किंवा पाण्यात थोडा सोडा घालून पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट आतल्या बाजूने लावा). एक/दोन तासांच्या अंतराने हे पुन्हा करा. बेकिंग सोडा ग्रीस खेचून घेईल. नंतर स्पंजने संपूर्ण ओव्हन पुसून घ्या. एकदा पुसून झालं की स्पंज पाण्यात चांगला खळबळून आणि पिळून घ्या आणि पुन्हा एकदा ओव्हन पुसून घ्या. बाहेरच्या बाजूचा ओव्हन ग्लास क्लिनर ने पुसून घ्या. ओव्हनच्या आतल्या भागाची स्वच्छता करताना शक्यतो नॉन टॉक्सिक, सॉफ्ट क्लीनर्स वापरावे.
४. मायक्रोव्हेव :
मायक्रोव्हेवची स्वच्छता सुरु करण्यापूर्वी बटण बंद करून प्लग बाजूला काढून ठेवा आणि मायक्रोव्हेव आतल्या बाजूने गरम नाही याची खात्री करून घ्या. आत जर काही अन्नाचे कण असतील तर ते गोळा करून टाकून द्या. ओल्या (हलक्या ओल्या) फडक्याने आतून पूर्ण पुसून घ्या. एका मायक्रोव्हेवसेफ बोलमध्ये पाणी घ्या आणि त्यात लिंबू पिळा आणि मायक्रोव्हेव मध्ये १-२ मिनिटं गरम करा (आधी काही सेकंद करून बघा आणि मग जास्त वेळचा टाइमर लावा) जर जास्त खराब झालेला असेल तर ३-४ मिनिटं ठेवलं तरी चालतं. ते झाल्यानंतर लगेच उघडू नका. ५ मिनिटं तसंच ठेवा आणि नंतर ओल्या (जाड) फडक्याने पुसून घ्या. त्यानंतर मायक्रोव्हेवची आतली काचेची चकती आणि रिंग बाहेर काढून साबणाच्या पाण्यात ठेवा आणि नंतर चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. खरंतर मायक्रोव्हेवला आतल्या किंवा बाहेरच्या बाजूने डाग पडला, अन्नाचे कान सांडले की लगेच पुसून घ्यावं म्हणजे ते वळून कडक होत नाहीत आणि मायक्रोव्हेव स्वच्छ करणं सोपं जातं.
५. टोस्टर :
-
- सँडविच टोस्टर
सँडविच टोस्टरला आतल्या बाजूने कोटिंग केलेले असल्याने चाकू, सुरी किंवा कोणतीही टोकदार वस्तू वापरू शकत नाही अन्यथा कोटींग खराब होऊ शकतं. टोस्टरमध्ये असणारे ब्रेड क्रम्स/ अन्नाचे कण काढून टाका. २० सेकंद टोस्टर चालू करा (त्यापेक्षा जास्त करू नका.) नंतर बटन बंद करा आणि प्लग काढून बाजूला ठेवा. एक ग्लास पाण्यात २ चमचे व्हिनेगर टाका. गरम झालेल्या टोस्टरवर हे टाका. टोस्टर गरम असल्यामुळे सावकाश करा. त्यानंतर टोस्टर बंद करून थोडा वेळ तसंच ठेवा. नंतर वरच्या मिश्राणामाध्येच थोडं डिश लिक्विड सोप घाला आणि त्याने टोस्टर आतून पुन्हा पुसून घ्या. आता तेलकट डाग निघायला सुरवात होईल. साबणाच्या पाण्याने एकदा पुसून घेतलं की मग पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने पुसून घ्या जेणेकरून साबणाचे अंश टोस्टरवर राहणार नाहीत. टोस्टरचा बाहेरचा भागसुद्धा साबणाच्या पाण्याने पुसून स्वच्छ करून घ्यावा. दरवेळी टोस्टर वापरल्यानंतर जर टीशू पेपरने आतला भाग पुसून घेतला तर टोस्टर फार खराब होत नाही. टोस्टर जर सतत वापरत नसू तर व्यवस्थित झाकून ठेवावं नाहीतर धूळ, झुरळ किंवा इतर गोष्टींमुळे ते खराब होण्याची शक्यता असते.
- सँडविच टोस्टर
- पॉप अप टोस्टर :
पॉप अप टोस्टर स्वच्छ करतानाबटन बंद करून प्लग बाजूला काढून ठेवा. खालच्या बाजूला असलेला क्रम ट्रे बाहेर काढून त्यातले ब्रेडचे क्रम्स टाकून द्या. त्यानंतर तो ट्रे स्वच्छ घासून पाणी निथळण्यासाठी उपडा करून ठेवा आणि व्यवस्थित वाळू द्या. (पूर्ण कोरडा झाल्याखेरीज तो परत लावू नका). तो ट्रे वाळेपर्यंत टोस्टर सिंकमध्ये न्या आणि पूर्णपणे उलट करून सर्व बाजूने त्याला थाप मारा. अश्याने आत असलेले ब्रेडचे बारीक कण बाहेर पडतील. जिथून ब्रेड आत टाकतो तिथून कोणत्याही टोकदार वस्तू स्वच्छता करण्यासाठी आत घालू नका त्याने आतल्या वायर, हिटिंग कॉइल खराब होण्याची शक्यता असते.
टोस्टरच्या बाहेरचा भाग ग्लास क्लीनरने स्वच्छ पुसून घ्या. टोस्टर जेव्हा वापरत नसू तेव्हा त्याला लीड लावून ठेवा (जिथून ब्रेड आत घालतो त्या भागावर) नाहीतर झुरळ आत शिरून टोस्टर खराब होऊ शकते आणि टोस्टरमध्ये आत गेलेली ही झुरळ बाहेर काढता येणं जरा कठीण असतं.
६. डिशवॉशर :
जसं फ्रीजचं दार रोजच्या वापराने लवकर खराब होतं तसंच डिशवॉशरच्या दराचही आहे. डिशवॉशरचे दार किंवा बाहेरची बाजू आणि हॅन्डल जास्त खराब होत असल्याने आठवड्यातून एकदातरी पुसून घ्यावे. जर डिशवॉशरचे दार स्टीलचे असेल तर साबणाच्या पाण्याने (१ वाटी पाण्याला १/२ चमचा डिश लिक्विड सोप) पुसून घेऊन त्यानंतर पुन्हा एकदा ओल्या फडक्याने पुसून घ्यावे जेणे करून साबणाचे अंश राहणार नाही. मशीनचं दार स्वच्छ झालं की काही जणं त्याला हलकासा तेलाचा कोट लावतात (एका माऊ पण जाड कपड्यावर खोबऱ्याच्या तेलाचे ४-५ थेंब टाकायचे आणि त्या फडक्याने पुसून घ्यायचं. दार चमकायला लागेल आणि त्याला कोटिंगसुद्धा होईल. दाराच्या कडा आणि त्याला लावलेले रबरसुद्धा स्वच्छ पुसून घ्या. ते सहज निघत असेल तर ते बाहेर काढून मग स्वच्छ करा. ह्या भागात पाण्यातले क्षार जमा होऊन पांढरे डाग पडायला लागतात ते स्वच्छ करा. डिशवॉशरमधील रॅक, जाळ्या जे जे बाहेर निघू शकत असेल ते सर्व भाग बाहेर काढावेत आणि साबणाने स्वच्छ घासावेत.
आपल्याकडच्या स्वयंपाकात तेलाचा, फोडण्यांचा वापर जास्त असतो. त्यामुळे महिन्यातून एकदातरी डिशवॉशर आतल्या बाजूने स्वच्छ करावं. हल्ली सगळ्या डिशवॉशरला ‘सेल्फ क्लिनिंग’ मोड असतोच. पण जर नसेल तर डिशवॉशरच्या खालच्या बाजूला एखादी वाटी व्हेनिगर टाकून रिकामं डिशवॉशर क़्विकवॉश मोडवर चालू करायचं. ह्यामुळे डिशवॉशरच्या आतल्या बाजूला जमा झालेलं तेल, ग्रीस निघून जातं. जर खूप वास येत असेल तर थोडा बेकिंग सोडा पण वापरू शकता (आत अडकलेल्या अन्नाच्या कणांमुळे वास येऊ शकतो). सायकल पूर्ण झाल्यावर डिशवॉशरचे दार थोडा वेळ उघडं ठेवावं आणि नंतर कोरड्या फडक्याने पुसून घ्यावं.
आपण डिशवॉशरमध्ये भांडी टाकताना विसळून अन्नाचे कण काढून मगच टाकतो. परंतु तरीही फिल्टरमध्ये अन्नाचे कण जमा होत राहतात. त्यामुळे फिल्टर किमान ४ महिन्यांनी तरी पूर्ण स्वच्छ करायला हवा ( फिल्टर किती दिवसांत खराब होतो हे खरंतर आपल्या वापरावर अवलंबून असतं परंतु, किमान ४ महिन्यांनी तरी तो स्वच्छ करावाच). साधारण अर्धा तास साबणाच्या पाण्यात ठेवून नंतर गरज असल्यास टूथब्रशने फिल्टर स्वच्छ करावा. फिल्टर काढण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी आपल्या ‘युजर मॅन्युअल’ मध्ये काही विषेश सूचना आहेत का ? ह्याची खात्री करून घ्यावी.
पाण्यातील क्षारांमुळे डिशवॉशरमधील फॅन/आर्मची छिद्र बुजायला लागतात अशी बुजलेली छिद्र टूथपिकच्या सहाय्याने मोकळी करावीत. भांडे नेहमीसारखे निघत नसल्यास एकतर फिल्टर स्वच्छ करून बघावं किंवा फॅन/आर्मची बुजलेली छिद्र मोकळी करावीत.
स्वयंपाकघराच्या स्वच्छतेविषयीचे हे लेख तुम्हाला कसे वाटले ते जरुर कळवा. पुन्हा भेटू पुढच्या सदरामध्ये…!!!