‘घ’ घराचा : नियोजनामागचे प्रयोजन
नियोजन ह्या शब्दाकडे प्रत्येकाची बघण्याची पद्धत अगदी निराळी आहे. काही लोकांना नियोजनामुळे शिस्तबद्ध आयुष्याची सवय लागते आणि ते आवडूही लागते. तर, काही जण, ‘नियोजन’ हे काळाची गरज म्हणून करतात, अगदी आवडत किंवा पटत नसले तरीसुद्धा. सकाळी ६.५० ची लोकल पकडून ९ वाजता ऑफिसची पायरी गाठायची असेल, तर हे करणं क्रमप्राप्त आहे, असेही काही लोकांना वाटते. पण काही लोक “आमच्याकडे असलं काही नसतं.., तरी होतं बुवा आमचं सगळं सुरळीत”, असही म्हणतात. ह्यात चूक किंवा बरोबर हा मुद्दाच नाही, तर हा सर्वस्वी सवयीचा आणि थोड्याफार प्रमाणात आवडी – निवडीचा विषय आहे.
माझं १८ डिसेंबर २०१४ ला लग्न झालं आणि साधारण १५ जानेवारी २०१५ ला अनुजच्या बाबांचा (त्यांना मी काका म्हणते) फोन आला. त्यांनी फोन ह्यासाठी केला होता की, ते आणि काकू (अनुजची आई) २४ जानेवारी ते २७ जानेवारी पुण्याला येणार होते. फोनवर त्यांनी चार दिवसांचा पूर्ण कार्यक्रम आम्हाला सांगितला, जायची आणि यायची सोय कशी आहे, कधी कधी आणि कुठे कुठे जाणार आहेत, घरी कधी असणार आहेत आणि मी आणि अनुजने कधी घरी थांबणं अपेक्षित आहे. अर्थातच ह्यात आदेश किंवा निर्णय असा सूर नसून नियोजन सोपे व्हावे म्हणून माहितीवजा सांगणे होते. ह्या फोन नंतर मला, दोन घरांच्या विचारसरणीतील फरक जाणवला. माझ्या माहेरी, कुलकर्ण्यांकडे एवढे नियोजन पचनी पडणे जरा अवघडच ! आयत्या वेळी ‘योग्य’ गोष्टी ठरवणे आणि त्या अतिशय सहजरीत्या आणि व्यवस्थित पार पाडणे ह्यात माझ्या वडिलांचा हात कोणीच धरू शकत नाही, असं मला वाटतं. पण अश्या घरात राहून सुद्धा माझे विचार मात्र फारसे तसे झाले नाहीत. आयत्या वेळी ठरवणं, उशीरा जाणं, मला फारसं पटत नाही. वेळेचा अपव्यय झाला, तर मला खूप त्रास होतो. कदाचित म्हणूनच माझा नियोजनावर भर असावा.
लहानपणापासून माझ्यावर कधी फार जबाबदारी पडली आहे असं नाही. पण लहानपणापासून, आईने माझ्यावर घेतलेल्या कष्टांमुळे आणि बाबांनी लावलेल्या निरीक्षणाच्या सवयीमुळे बऱ्याच गोष्टी माहित झाल्या आणि आणि टिपल्या गेल्या. म्हणजे प्रत्यक्ष, रोज स्वयंपाक करत नसले तरी, कुठल्याही दिवशी स्वयंपाक करायची किंवा घर सांभाळायची वेळ आली तर मी तयार होते, असं मला वाटायचं.
लग्नानंतर साधारण दीड वर्ष मी मुंबईमध्ये होते आणि अनुज पुण्यात. गमतीत आमची मित्रमंडळी “weekend marriage आहे तुमचं”, असं म्हणायचे. पण त्यामुळे घर, संसार, स्वयंपाक यांची म्हणावी तेवढी जबाबदारी पडली नाही.
मार्च २०१६ ला, मी पुण्यात परत आले. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आमचा संसार सुरु झाला. ऑफिस, घर, स्वयंपाक हे सगळं एकत्रितरीत्या सांभाळायची वेळ आली, आणि मी हळूहळू स्वयंपाक आणि स्वयंपाकघर ह्याच्या नियोजनाचा गांभिर्याने विचार करू लागले, नियोजनाला सुरुवात करू लागले. ह्या सगळ्याची पहिली पायरी म्हणजे बाजारात भाजी आणायला जाताना, एकतर आठवड्याचा मेनू ठरवून जाऊ लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक भाजीसाठी छोटी वेगळी पिशवी नेऊ लागले म्हणजे मिरच्या, भेंडी, गवार अश्या भाज्या आणतानाच वेगळ्या पिशवीत घेऊन येऊ लागले. भाजी आणायला जायच्या पिशव्यांचा एक छोटा संच केला. त्यामुळे घरी येऊन भाजी वेगळी करण्यासाठी जाणारी काही मिनिटे वाचली. आता खरं बघायला गेलं तर ही खूप शुल्लक गोष्ट आहे. भाजी वेगळी करून ठेवणं हे खूप वेळखाऊ काम आहे का? तर याचं उत्तर खरचच “नाही”, असं आहे. पण त्यातून दोन पाच मिनिटं नक्की वाचू शकतील. अश्या पद्धतीने जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर काही वेळ आपण बाजूला काढू शकतो, अगदी सर्व जबाबदाऱ्या यथासांग पार पाडूनसुद्धा….!
त्यामुळे नियोजन अत्यंत महत्वाचं आहे, असं मला वाटतं आणि म्हणूनच आजपासून तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे. ह्यातील काही गोष्टी तुम्ही करतही असाल. थोड्याफार फरकाने प्रत्येकजण घर, ऑफिस, स्वयंपाक, ह्या सगळया जबाबदाऱ्या पार पाडताना ‘नियोजन’ करत असणारच. फक्त विचारांची देवाण घेवाण झाली की एखादी सोपी गोष्ट पण मदत करून जाते, म्हणून हा सगळा प्रयत्न.
नियोजन आणि त्या अनुषंगाने येणारी, त्या त्या गोष्टींची माहिती असा ह्या उपक्रमाचा मूळ विषय आहे. नियोजन म्हणजे फक्त स्वयंपाकघर इतकच मर्यादित न ठेवता दैनंदिन आयुष्यात करत असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा ह्यात समावेश आहे. विचारांच्या देवाण घेवाणीतून जास्तीत जास्त माहिती उपलब्ध व्हावी आणि त्याचा सगळ्यांना उपयोग व्हावा, एवढा एकच हेतू मनात ठेवून हा उपक्रम सुरु करत आहे, तेव्हा तुम्हाला हा उपक्रम कसा वाटतोय ते नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया कायमच प्रेरणादायी ठरतील. तेव्हा लवकारच भेटू नव्या सदरामध्ये…!!!!
Shital
Khup ch chan sankalpana ahe. Marathimadhun ase blog farach kami ahet.
घ घराचा
धन्यवाद..!!
घ घराचा
minal
kindly provide vidhi of ganesh pujan in line with the requirements you have given in your”Ganesh Pujan” pdf
Vaidehi Deo
Love you website so much !! I can’t wait to explore more and apply as much as I can in to my life !
Really appreciate the efforts <3
PS. What a lovely house you have!
घ घराचा
@vaidehi Deo Thank you so much for your feedback…! 🙂