आमच्या जुन्या घरी स्वयंपाकघर खूप मोठं आणि प्रशस्त होतं. आईने ते खूप व्यवथित लावलेलं होतं. प्रत्येक गोष्टीला त्याची ठराविक जागा होती आणि आई प्रचंड शिस्तीची असल्यामुळे गोष्ट जिथल्या तिथे नाही गेली की ओरडा बसायचा. मधूनच हुक्की आली की मी स्वयंपाकघरात लुडबुड करायचे आणि आईला खूप त्रास द्यायचे. आईचा सगळा स्वयंपाक झालेला असला तरी “आई मला काहीतरी काम सांग ना..” अशी भुणभुण करायचे. मग ती, कधी धुतलेले भांडे पुसायला सांगायची, कधी कट्टा पुसून घे म्हणायची, तर कधी जेवायला वाढायच काम यायचं. मी काम करायला सुरुवात केली की पहिला ओरडा खायचे ते “अगं हा नॅप्कीन का घेतलास? हा ओटा पुसायचा आहे तू भांडी पुसायला का घेतलास…?”
माझ्या आईकडे ओटा पुसायला, घासलेली भांडी पुसायला, भाज्यांवरचं पाणी टिपायला किंवा भाज्या पुसायला, काचेचे डायनिंग टेबल पुसायला, हात पुसायला, फर्शी पुसायला अश्या असंख्य गोष्टींसाठी ‘सारखी दिसणारी’ इतकी फडकी होती की मी खूप बावचळून जायचे. बरं, सगळी फडकी तेवढीच स्वच्छ म्हणजे हात पुसायची आणि फर्शी पुसायची फडकी एकसारखी वाटतील एवढी स्वच्छ त्यामुळे त्यावरून काही अंदाज बांधता यायचा नाही. मला कळायचच नाही की
आपली आई कशी काय ओळखते, कुठलं फडकं कशाचं आहे ते! अगदी खरं सांगायचं तर मला तेव्हा वाटायचं आपली आई जरा जास्तच शिस्तीची आहे. म्हणजे तिचं म्हणणं पटायचं खरं, पण एवढं कोण करतं? असं वाटायचं. पण जेव्हा लग्नानंतर स्वयंपाकघराची जबाबदारी पडली तेव्हा मला ह्या आणि अश्या कित्येक गोष्टीची तीव्रता जाणवायला लागीली आणि खरं सांगायचं झालं तर माझी व्दिधा मनस्थिती झाली. माझ्यासमोर आईने शिकवलेली शिस्त (त्याची आवश्यकता) आणि ती अमलात आणताना मला येत असणाऱ्या अडचणी अश्या दोन गोष्टी उभ्या राहिल्या. पण आता ह्या दोन गोष्टींचा समन्वय साधावा असे मला वाटले.
मला ही जाणीव होती की, मी रोज स्वयंपाकघरात जाते म्हणून कुठला नॅप्कीन कशाचा आहे हे मला कळू शकतं. पण घरातील इतर मंडळी रोज तितकी स्वयंपाकघरात येत नसतात आणि मग त्यांना कसं कळणार कुठला नॅप्कीन कशाचा आहे ते? आणि आता चुकीच्या नॅप्कीनने चुकीच्या गोष्टी पुसल्या की मलाही आईसारखा त्रास व्हायला लागला. ह्यावर उपाय म्हणून, स्वयंपाकघराचं फर्निचर चालू असताना मी हे नॅप्कीन होल्डर बनवून घेतलं. मी रोज वरती लागणाऱ्या नॅप्कीनचे ४ विभाग केले (i) भांडी पुसायचा; (ii) हात पुसायचा; (iii) ओटा पुसायचा आणि (iv) काच किंवा डायनिंग टेबल पुसायचा आणि त्यानंतर ४ विभाग असलेलं हे नॅप्कीन होल्डर तयार करून घेतलं. प्रत्येक भागाचं नाव पटकन समोर यावं म्हणून मी ते मुद्दाम फिरतं करून घेतलं. आमच्याकडचा ओटा ऐसपेस असल्यामुळे हे थोडसं मोठं असलं तरी चालणार होतं. पण जर जागा कमी असेल तर आपण निराळ्या पद्धतीने हे करू शकतो. जर नॅप्कीनचा स्टॅन्ड हवा असेल तर ह्यापैकी काही पर्यायांचा विचार करू शकता.
ह्या गोष्टीवरचा सरळ साधा उपाय म्हणजे एक कप्पा किंवा आडवा बॉक्स घ्यायचा आणि त्यात वेगवेगळे कप्पे करायचे. प्रत्येका कप्प्याला नाव द्यायचं म्हणजे नॅप्कीन घेताना आपल्या लक्षात येईल की हा कुठल्या गोष्टीचा आहे. पण हा उपाय झाला नॅप्कीनच्या साठवणूकीवर. एकदा बॉक्स मधून बाहेर काढला की परत प्रश्न आहेच. ह्यावर अजून एक उपाय म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या रंगाचे नॅप्कीन वापरायचे जेणेकरून रंगावरून लक्षात ठेवता येईल की हा कुठल्या गोष्टींसाठी वापरायचा आहे. आणिक एक उपाय म्हणजे, हा नॅप्कीन कशासाठी वापरायचा ते नॅप्कीनवर एखाद्या भरतकामाच्या टाक्याने लिहायचं किंवा घरच्या घरी हाताने पेंट करायचं म्हणजे मग प्रश्नच सुटतो.
असे काही उपाय केले तर कदाचित घरातले बरेच वादातीत प्रश्न सुटू शकतील असं मला वाटतं 😉 घराच्या शिस्तीत तडजोड करू नये हे मला पूर्णपणे मान्य आहे पण, घराची शिस्त सांभाळताना त्याचा घरातील इतर माणसांना त्रास होणार नाही याचादेखील विचार तितकाच महत्वाचा आहे. जेवढी शिस्त महत्वाची तेवढच घरातल्या मंडळींसोबत असणारं आपलं नातंसुद्धा महत्वाचं आहे. शिस्तीचा तगादा लावल्यामुळे घरात किरकिरी होणार असतील तर आपणच सुवर्णमध्य साधायला हवा.
तुम्हाला हे सदर कसे वाटले ते जरूर कळवा. तुम्ही ह्या बाबतीत काय उपाय केले आहेत ते देखील कॉमेंटमध्ये लिहू शकता.
Rekha adhav
Nice idea
Mithila
Agdich manya shevtach gharat shisticha tagada lau naye😀
Amchyakade hech aad yet bagh..