फ्रीजचे नियोजन
फ्रीजच्या नियोजानापुर्वी काय विचार करायचा ह्यावर आपण मागच्या सदरात बोललो. आता आपण वळूयात फ्रीजमधील्या विभागांकडे. मी मुद्दामच फ्रीजचे कप्पे असं म्हणलं नाही कारण प्रत्येकाच्या फ्रिजच्या आकारमानाप्रमाणे त्या त्या फ्रीजमध्ये असलेल्या कप्प्यांची संख्या बदलत असते. म्हणूनच मी फ्रीजमध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंचं वर्गीकरण केलेलं आहे.
मी पहिल्या कप्प्यात १. दूध, दही आणि ताक, २. उरलेलं अन्न आणि ३.उद्याची तयारी असे तीन विभाग केलेले आहेत. पहिल्या विभागात दुधाची दोन पातेली ठेवली आहेत आणि त्यासमोर साईचं दही आणि साधं दही. डावीकडच्या भागात (म्हणजे दुसऱ्या भागात) उरलेलं अन्न ठेवते म्हणजे कधी रात्रीची भाजी, आमटी किंवा आणिक काही उरलेलं असेल तर ते. आत्ता ह्यात कैरीची चटणी आहे, कालची थोडी आमटी उरलेली होती ती आहे.
त्याच्या बाजूला तिसरा विभाग म्हणजे स्वयंपाकाची तयारी. मधल्या भागात मागच्या बाजूला कोबी चिरून ठेवलेला आहे. त्यासोबतच एक फोडणीचा ट्रे करून ठेवला आहे. आपल्या रोजच्या स्वयंपाकात लागणाऱ्या कॉमन गोष्टींचा मी एक ट्रे बनवला आहे. मी आणि अनुज आम्ही दोघेच राहतो त्यामुळे मिरच्या, आलं, लसूण, कडिपत्ता, कोथिंबीर अश्या गोष्टी खूप कमी प्रमाणात लागतात आणि मग भाजीच्या मोठ्या भांडयात ते पटकन सापडायला त्रास होतो, म्हणून कोथिंबीर वगळता ह्या सर्व गोष्टींचा मी एक ट्रे केला आहे.
मी सध्या ह्या गोष्टी फ्रिजसाठी मिळणाऱ्या झिपर बॅगमध्ये ठेवल्या आहेत. तुम्हाला जास्त प्रमाणात लागत असेल तर डब्यात ठेवू शकता. ह्या झिपर बॅग्सना समोरच्या बाजूला पांढरी पट्टी असते त्यावर आपण त्यातल्या पदार्थाचे नाव, एक्सपायरी डेट असं परमनंट मार्करने लिहू शकतो. ह्या बॅग्स बाजारात सहजपणे उपलब्ध असायच्या पण आता प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आल्यामुळे कदाचित त्या उपलब्ध होणार नाहीत. त्याऐवजी आपण छोट्या काचेच्या बरण्यांमध्ये ह्या वस्तू ठेवू शकतो जेणेकरून आत काय आहे ते पटकन, बरणी न उघडता लक्षात येईल. तसच आलं-लसणाची पेस्ट, चिरून ठेवलेला कांदा, उद्यासाठी निवडून ठेवलेल्या भाज्या किंवा आणि काही तयारी असेल तर ती अश्या सर्व गोष्टी ह्या तिसऱ्या भागात ठेवते, जेणेकरून सर्व गोष्टी एका ठिकाणी असतील आणि सकाळी घाईच्या वेळेत शोधत बसावं लागणार नाही.
चौथ्या विभागत (म्हणजे माझ्या फ्रिजच्या दुसऱ्या कप्प्यात) साठवणूकीचे पदार्थ ठेवते. गुलकंद, भाज्यांचं लोणचं केलं असेल तर ते. तुमच्या हवामानानुसार तुम्ही रवा, दाण्याचं कूट असे पदार्थसुद्धा ठेवू शकता. मी ह्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवत नाही. पण दमट हवामानाच्या भागात अश्या वस्तू बाहेर खराब होतात त्यामुळे त्या फ्रीजमध्ये ठेवणं आवश्यक असतं.
दूध, दही, साईचं दही, ताक हे सगळे पदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळं, ते फ्रिजच्या सगळ्यात थंड भागात ठेवावे लागतात.
हा फ्रीजचा सगळ्यात थंड भाग असतो. इथून थंड हवा सर्क्युलेट होत राहते. म्हणून ह्याला फ्रीजचा ‘कोल्डेस्ट पार्ट’ असं म्हटलं जातं. फ्रिजच्या दाराकडचा भाग हा तितकासा थंड नसतो. तिथलं तापमानसुध्दा सतत बदलत असत. म्हणूनच त्याला ‘वॉर्मेस्ट पार्ट’ असं म्हटलं जातं. त्यामुळे फ्रिजच्या दारामध्ये किंवा बाहेरच्या बाजूला पटकन खराब होणारे पदार्थ ठेवू नयेत. तर थोडक्यात म्हणजे दूध, दही, ताक असे पदार्थ शक्यतो ह्या पहिल्या कप्प्यात किंवा जो आपल्या फ्रीजचा सगळ्यात थंड भाग आहे तिथेच ठेवावेत.
जी गत दूध आणि दह्याची तिच गत उरलेल्या स्वयंपाकाची. उरलेलं अन्न खूप जुनं/शीळं खाऊ नये. अन्न जितक ताजं तितकंच ते शरीराला उत्तम असतं, पण जर थोडसं उरलच तर तेही फ्रीजमध्ये कोल्डेस्ट पार्टमध्ये ठेवावं. अन्न फ्रीजमध्ये ठेवताना, पहिली गोष्ट म्हणजे, ते फार गरम नसावं, दुसरी गोष्ट म्हणजे ते योग्य आकाराच्या भांड्यात काढलेलं असावं (ते भांड झाकून ठेवण्यासाठी वापरत असणारी झाकणीदेखील योग्य आकाराची असावी भांड्यापेक्षा खूप जास्त व्यासाची झाकणी घेतली तर फ्रीजमधील जागा विनाकारण अडून राहते), म्हणजे गरजेपेक्षा मोठं भांड घेतलं तर फ्रिजमधली जागा उगाच अडून राहते आणि अगदी छोटंसं भांड घेतलं आणि ते काठोकाठ भरलेलं असेलं तर अन्न फ्रीज मधून काढताना किंवा ठेवताना सांडण्याची भीती असते. फ्रीजमध्ये ठेवण्यात येणाऱ्या भांड्यांचा आकार शक्यतो चौकोनी किंवा आयताकृती असावा. गोलाकाराच्या भांड्यांपेक्षा चौकोनी किंवा आयताकृती भांडी जास्त मावू शकतात किंवा त्यामुळे कमी जागा वाया जाते. तिसरं म्हणजे जर घरी मायक्रोवेव/ओव्हन असेल तर त्यात चालतील अश्याच भांड्यात अन्न काढून ठेवलं तर ते जास्त सोईचं होतं. उरलेलं अन्न किंवा जे लवकर संपवण्याची गरज आहे किंवा लवकर संपवणं अपेक्षित आहे असं अन्न पारदर्शक डब्यात दर्शनी भागात ठेवावं. ‘out of site – out of mind’ हा नियम आपल्यापैकी बऱ्याच जणांना लागू होतो. त्यामुळे नजरेआड गेलं, लक्षात राहिलं नाही म्हणून खाल्ल गेलं नाही असं होतं. म्हणून अशा गोष्टी फ्रीजमध्ये ठेवताना शक्यतो पारदर्शक भांड्यात ठेवाव्यात. जेणे करून काय काय आहे हे पटकन लक्षात येईल. परदेशांमध्ये डब्यावर, पदार्थ कधी बनवला आहे याची तारीख लिहून ठेवतात, पण आपण एवढे शिळे पदार्थ खात नाही त्यामुळे असं काही करण्याची गरज पडत नाही.
मी शक्यतो काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर करते. पण लग्नात किंवा त्यानंतरच्या कार्यक्रमांत मला टपरवेअरचे खूप डबे भेट म्हणून आले. त्यामुळे कधी कधी टपरवेअरचे डबे वापरते. तुम्ही जर प्लास्टिकची भांडी वापरत असाल तर ते प्लास्टिक फूडग्रेडचे आहे ना? ह्याची खात्री करून घ्या आणि वर्षानुवर्षे तेच प्लास्टिकचे डबे वापरू नका (शक्यतो प्लास्टिकचे डबे वापरू नका).
हे सगळं करताना फ्रीज मध्ये भांड्यांची खूप मोठी उतरंड लावलेली मला अजिबात आवडत नाही कारण फ्रीज मधून पदार्थ काढताना अवघड जातं आणि मग सांड-लवंड होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर जर फ्रीज गच्च भरलेला असेल तर त्यात हवा सर्क्युलेट व्हायला जागा राहत नाही आणि त्यामुळे काही पदार्थांपर्यंत थंड हवा पोचलीच नाही असं होऊ शकतं आणि पर्यायाने पदार्थ खराब होऊ शकतो.
आता आपण वळूया फळे आणि भाज्यांकडे. हल्ली ह्या कापडी पिशव्यांमध्ये मी भाजी ठेवते.
आपल्याला बऱ्याचदा क्रिस्पर किंवा हुमिडिटी ड्रॉवर बद्दल फारशी माहिती नसते. ह्या ड्रॉवरला ‘लो’ आणि ‘हाय’ असे सेटिंग असते. ड्रॉवरमधून हवा बाहेर जायला खाच/खिडकी असते. ह्या सेटिंगमुळे ती खाच चालू बंद होते. लो सेटिंग केलं तर ही खाच पूर्णपणे उघडते आणि हाय सेटिंग केलं तर ही खाच बंद होते. ज्या भाज्या लवकर खराब होतात, कुजतात त्या क्रिस्पर ड्रॉवर मध्ये ‘लो ह्युमिडिटी मोड’ वर ठेवाव्यात कारण ह्या भाज्या/फळे इथिलीन नावाचा वायू बाहेर टाकत असतात आणि जर लो ह्युमिडिटी मोडवर सेटिंग ठेवलं तर हवा खाचेद्वारे बाहेर जायला जागा मिळते आणि अश्या प्रकारचे वायू जेव्हा बाहेर पडतात तेव्हा फळे आणि भाज्या जास्त दिवस आणि चांगले राहतात किंवा टिकू शकतात.
फळे आणि भाज्यांबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे. भाज्या कश्या पद्धतीने धुवाव्यात, त्यांची साठवणूक कशी करावी, कुठल्या भाज्या कुठल्या भाज्यांसोबत ठेवाव्यात अथवा ठेवू नयेत, कश्या पद्धतीने भाज्या ठेवल्या तर जास्त काळ ताज्या राहू शकतील किंवा टिकू शकतील वगैरे. त्यामुळे भाज्यांची साठवणूक असं वेगळच सदर करावं असा विचार करत आहे तेव्हा नंतर त्याबद्दल खोलवर बोलूच.
आता पुढचा भाग म्हणजे चीज, बटर वगैरे. खरंतर हे दुग्धजन्य पदार्थ आहेत, पण फ्रिजच्या आतल्या बाजूला किंवा दारात असे कुठेही ठेवले तरी चालतात. कारण ते मुळातच बनवताना खूप काळ टिकावेत अश्या दृष्टीने बनवलेले असतात. हल्लीच्या फ्रीजना चिलर ट्रे असतो त्यामध्ये हे सगळे पदार्थ ठेवण्यासाठी सोय केलेली असते.
जर कॉन्टिनेन्टल पदार्थ करण्याची किंवा खाण्याची सवय असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड ड्रेससिंग, सॉस, स्प्रेडस हे हमखास फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. हे सगळे पदार्थ फ्रिजच्या दारात ठेवले तरी चालतात कारण वर म्हणल्याप्रमाणे हा फ्रीजचा वॉर्मेस्ट पार्ट असतो आणि ह्यातले कुठलेच पदार्थ पटकन खराब होणाऱ्यातले नसतात. मला वेगवेगळी सरबतं, मॉकटॆल्स खूप आवडतात, विशेषतः बनवायला. त्यामुळे माझ्याकडे वेगवेगळी सरबतं, सिरप्स आहेत आणि हे सगळं मी फ्रिजच्या दारात ठेवते आणि ते व्यवस्थित टिकतं.
आम्हाला दोघांनाही खूप थंड पाणी पिण्याची सवय नाही, त्यामुळे आम्ही पाण्याची एखादीच बाटली फ्रिज मध्ये ठेवतो. जर कोणी पाहुणे येणार असतील, विशेषतः उन्हाळ्यात, तर मात्र आठवणीने जास्तीचं पाणी फ्रिज मध्ये ठेवतो. परत मी तेच म्हणेन की, पाण्याची बाटली शक्यतो स्टील अथवा धातूची असेल तर प्लास्टिकपेक्षा अश्या बाटल्याना प्राधान्य द्यावे.
आता आपण वळूया फ्रिजरकडे. खरं सांगायचं तर फ्रिजरमध्ये काय काय ठेवायचं हे मागे म्हणल्याप्रमाणे, तिथल्या भौगोलिक परीस्थितीवर/हवामानावर अवलंबून असतं. मी साधारणपणे चोकोलेट्स, Ice-cream, तांदूळपिठी आणि इतर काही पीठे, कॉर्नफ्लोर, मिल्क पावडर, काही कडधान्य असे पदार्थ फ्रिजरमध्ये ठेवते.
खरंतर पुण्यासारख्या ठिकाणी जिथे हवामान कोरडे आहे तिथे ही पीठं फ्रिजर मध्ये नाही ठेवली तरी चालतात पण बरेचसे पदार्थ किंवा पीठं रोज वापरली जात नाहीत आणि न वापरल्यामुळे त्यामध्ये जाळ्या होण्याची किंवा खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून पीठं वगैरे फ्रिजरमध्ये ठेवावे लागतात. वर म्हणाल्याप्रमाणे पिठाच्या पिशवीवर जर नाव, कधी आणलाय याची तारीख किंवा एक्सपायरी डेट लिहिली तर ट्रॅकिंग ठेवणं जास्त सोपं जातं.
आपण वेगवेगळ्या छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये ही पीठं ठेवतो त्यामुळे अश्या छोट्या पिशव्या फ्रीजरमध्ये ठेवताना अडचण येते. त्या पिशव्या एकमेकांवर बसत नाहीत. म्हणूनच मी इथे एक छोटासा ट्रे घेतला आहे. ह्या ट्रेमध्ये अश्या सगळ्या छोट्या छोट्या पिशव्या एकत्र ठेवल्या आहेत. त्यामुळे फ्रीजर एकदम सुटसुटीत दिसतो आणि आपल्याला सगळ्या गोष्टी सापडायला मदत होते.
त्यानंतर लोणी, मटार दाणे, कॉर्न दाणे, सुका मेवा असे पदार्थ जे आपल्याला साठवून ठेवायचे आहेत तेदेखील इथे ठेवू शकतो. बाजारात मिळणारे सर्व फ्रोझन पदार्थ, हर्ब्स, खडा मसालासुद्धा ठेवू शकतो. भाज्यांचे कोरडे मसाले फ्रीजरच्या दारात ठेवू शकतो. पण मी खडा मसाला बाहेर ठेवते.
जर अश्या पद्धतीने वर्गीकरण केलं तर गोष्टी सापडायला खूप मदत होते. शोधत बसायला लागत नाही आणि फ्रिज मध्ये काय काय आहे आणि काय काय संपत आलय हे पटकन कळतं.
आत्ता आपण जे बघितलं, ते अत्यंत साध्या पध्दतीचं आणि कुठल्याही ‘ऑर्गनायझिंग अँक्सेसरीजचा’ वापर न करता केलेलं नियोजन. फ्रिजचे नियोजन करण्यासाठी काही अँक्सेसरीज बाजारात उपलब्ध आहेत त्याची माहीती आपण पुढील लेखात घेऊच. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. पुन्हा भेटू लवकरच….!!!