मागच्या काही सदरांमध्ये आपण फ्रीज खरेदीबद्दल चर्चा केली. फ्रीज घरी आल्यावर त्यात सर्व पसारा भरणं हे एक मोठ्ठ काम असतं. आपण कितीही मोठा फ्रीज आणला तरीदेखील तो आपल्याला छोटा पडतोय असच वाटत असतं. परंतू, फ्रीजचं जर व्यवस्थीत नियोजन केलं, तर तो फ्रीज पुरू शकतो आणि आपल्या रोजच्या धावपळीच्या वेळेला ते अतिशय उपयोगी पडू शकते.
फ्रीजचे नियोजन करताना ज्या ज्या गोष्टींचा मी विचार केला, ते आपल्यासमोर मांडते.
१. पाहिलं म्हणजे आपण ज्या भागात राहतो तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथलं हवामान, तापमान. म्हणजे मुंबईसारख्या दमट हवामानाच्या भागात राहत असू तर खूप बारीक-सारीक गोष्टीसुध्दा फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात किंवा जास्त तापमान असेल किंवा उन्हाळा जास्त असेल तर अशा वेळी अन्न बाहेर ठेवलं की लगेच खराब होतं. ह्या उलट जर थंड हवामानाच्या प्रदेशात राहत असू तर मसाला वगैरे सुद्धा बाहेर ठेवला तरी चालतो. खूप जास्त प्रमाणात पावसाळा किंवा हिवाळा असेल आणि बराच काळ घराबाहेर पडणं शक्य नसेल तर, घरात अन्नपदार्थांची साठवणूक करावी लागते. मी पुण्यात राहते इथली हवा बऱ्यापैकी कोरडी असते, त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी बाहेर ठेऊ शकते. खूप पाऊसमुळे किंवा थंडीमुळे बाहेर पडताच आलं नाही असं होत नाही. त्यामुळे खूप दिवसांची साठवणूक करून ठेवावी लागत नाही.
२. त्या नंतरचा विचार म्हणजे, घरात किती माणसं राहतात, कोणत्या वयाची माणसे राहतात? पाहुण्यांची आवक जावक किती आहे? आणि साधारणपणे एका वेळी किती माणसांचा स्वयंपाक करावा लागतो? म्हणजे ४ माणसांना १ ते १ १/२ लिटर दुध नक्की लागेल. पण नोकरी करणाऱ्या, नवरा बायको अश्या दोघांच्या कुटुंबाला १/२ ते १ लिटर दुध नक्की पुरेल. घरात लहान मुल असेल किंवा घरी पाहुण्यांची आवक जावक जास्त असेल तर मात्र जास्त दुध लागेल. थोडक्यात घरात किती माणसं राहतात ह्यावरून फ्रीजमध्ये किती समान मावण अपेक्षित आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. घरात सतत पाहुण्यांचा राबता असेल तर फ्रीजमध्ये थोडं जादाचं दुध किंवा पटकन खायला करून देता येईल असे थोडे तयार करून ठेवलेले पदार्थ, पीठ, भिजवलेली थोडी कणीक अश्या सर्व तयारीसाठी जागा करावी लागते.घरात एकावेळी १५-२० माणसे जेवायला येत असतील आणि अश्या १५-२० जणांचा स्वयंपाक जर घरी करत असू तर स्वयंपाकाच्या तयारीसाठी आणि केलेला स्वयंपाक ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये जास्त जागा लागते. अगदी ८-१० माणसांसाठीच श्रीखंड फ्रीज मध्ये ठेवायचं म्हणलं तरी खूप मोठं भांड लागतं आणि पर्यायाने जागा जास्त जाते. मग अश्यावेळी कुठल्या पदार्थासाठी किती जागा लागते ह्याचं गणित जमवावं लागतं.
३. त्याच्या पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या खाण्या पिण्याच्या सवई काय आहेत? हा सुद्धा एक निर्णायक घटक आहे. काही लोकांना जेवताना नेहमी काहीतरी गोड खायची सवय असते, अश्या लोकांच्या फ्रीज मध्ये मी कायम एक तरी श्रीखंडाचा डबा बघितला आहे. आईस्क्रीम प्रेमींच्या फ्रीज मध्ये कायम एक तरी फमिली पॅक फ्रीजरमध्ये असतोच. अगदी तेवढच कशाला काही लोकांकडं रोज निम्म गाईचं आणि निम्म म्हशीचं दुध घेतलं जातं. अश्या वेळी दुधाची दोन पातेली मावतील एवढी जागा रोज फ्रीजमध्ये ठेवावी लागतेच. आमच्याकडे रोज रात्री जेवणानंतर एक तरी फळ खायची सवय (खरतर आवड) आहे. त्यामुळे आठवड्याभरासाठी एकदम आणलेल्या ८-१० फळांची साठवणूक करण्यासाठी फ्रीजमध्ये जागा ठेवावी लागते. घरात मांसाहार करत असाल तर फ्रोजन चिकन किंवा इतर गोष्टींसाठीसुद्धा जागा लागते.
४. आपण किती दिवसांनी सामान भरतो ह्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे जर आपल्याला महिन्याला १ किलो रवा (मी मुंबईला असताना खूप जणांच्या फ्रीजमध्ये रवा ठेवलेला बघितला आहे) लागत असेल आणि आपण महिन्याला एकदाच समान भरत असू तर १ किलोचा रवा मावेल असा डबा/बरणीसाठी जागा करावी लागते. हेच जर १५ दिवसांना समान भरत असू तर मात्र छोट्या बरणीपुरती जागा चालू शकते.
५. आपल्या स्वयंपाकाच्या सवईसुद्धा लक्षात घ्याव्या लागतात. काही जणींना आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशीची भाजी चिरून मसाला/वाटण तयार करून, कामाला जाताना न्यायचे फळांचे वेगवेगळे डबे भरून ठेवायची सवय असते. एवढं सगळं ठेवायचं असेल तर तशी जागा फ्रीज मध्ये ठेवावी लागते.
६. आपण किती दिवसांनी फळं आणि भाज्या आणतो, त्या कश्या साठवून ठेवतो, म्हणजे भाज्या आणल्यावर लगेच चिरून/निवडून मगच फ्रीज मध्ये ठेवतो की लागेल तशी चिरून/निवडून घेतो. तशीच भाजी ठेवत असू तर कदाचित जागा जास्त लागू शकते. खरं बघायला गेलं, तर भाज्यांची साठवणूक हा एक खूप मोठा मुद्दा आहे आणि त्यावर आपण नंतर सविस्तर बोलूच. सध्यापुरता फ्रिजच्या नियोजनात ह्या गोष्टीचा विचार करावा इतकच.
७. फ्रीजमध्ये साठवणुकीसाठी वापरण्यात येणारी भांडी ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी शक्यतो चौकोनी आकाराची भांडी वापरते. गोल आकाराच्या भांड्यांपेक्षा चौकोनी आकाराची भांडी जास्त मावतात किंवा जागा कमी वाया जाते. जर घरी ओवन असेल तर ओवन आणि फ्रीज दोन्हीमध्ये चालतील अशीच भांडी फ्रीजमध्ये वापरली तर ते सोयीचं पडतं. ‘out of site out of mind’ हा नियम आपल्यापैकी बऱ्याच जणांना लागू होतो. समोर दिसलं नाही म्हणून खायचं/करायचं राहून गेलं असं होतं. म्हणून शक्यतो पारदर्शक (Transperant) डब्यात साठवणूक करून ठेवायची म्हणजे समोर पटकन दिसून येतं. किंवा अगदीच काचेचे डबे वापरणे शक्य नसेल तर फेंट कलरचे डबे वापरावेत जेणेकरून आतलं थोडफार दिसू शकेल (पण खरंतर प्लास्टिकचा वापर टाळणच योग्य आहे).
हा सगळा झाला नियोजनापूर्वीचा विचार. पुन्हा भेटू पुढच्या भागात फ्रीजमधील वस्तूंचे/सामानाचे नियोजन करण्यासाठी..!!