Close
 • Gha Gharacha

माझी कलिंगड खरेदी

मला सगळी फळ खूप आवडतात इतकी की, मी जेवणाऐवजी फक्त फळं खाऊ शकते. आईकडे रोज रात्री जेवणानंतर फळं खाण्याचा कार्यक्रम असायचा. पण काही दिवस मात्र ह्याला अपवाद असायचे. मी आणि बाबा जाऊन कलिंगड घेऊन आलो तर आम्ही दोघही आधी कलिंगड संपवायचो आणि मग आता भूक नाही असं जाहीर करायचो. कलिंगड खाताना, कलिंगड मधोमध कापल्यावर जे दोन भाग होतात ना? त्यातला वरचा वरचा रवाळ आणि रसाळ भाग मी खायचे आणि उरलेलं मात्र आई बाबांना द्यायचे.

मी खूप लहान असल्यापासून बाबांसोबत कलिंगड आणायला जायचे. जर आई सोबत गेले तर आई कलिंगड मधून चिरून त्याची छोटीशी फोड काढून दाखवतात ना? तसं करून घ्यायची आणि मग आणायची. बाबा मात्र असं कधीच करायचे नाहीत. पण त्यांनी आणलेलं कलिंगड कधीही खराब निघायचं नाही. कलिंगड घ्यायला गेलं की, सगळ्यात मजा यायची ती कलिंगडाला थापटून बघताना. मला खूप कुतूहल वाटायचं असं का करतात हे? ह्यातून काय कळत नेमकं? एकदा बाबांसोबत गेले असताना मी त्या दुकानदार काकांना विचारलं तेव्हा त्यांनी मला खूप छान समजावून सांगितलं. कदाचित तुम्हालाही कलिंगड घेताना त्याचा उपयोग होईल.

कलिंगड घेताना ३-४ महत्वाच्या गोष्टी बघायच्या:

 • कलिंगडाचे वजन

कलिंगडाचे वजन वाढते ते त्याच्या आतल्या पाण्यामुळे. साधारण सारख्या आकाराच्या कलिंगडामध्ये जे जास्त जड असेल ते कलिंगड निवडावे. कलिंगड जेवढे जड तेवढं ते उत्तम आणि रसाळ असते.

 • कलिंगडावरील पिवळा डाग

मला असं वाटायचं की, फळ जेवढं दिसायला छान तितकं ते चवीला छान असतं. त्यामुळे पिवळा डाग असलेलं कलिंगड मी कधीच घ्यायचे नाही. पण खरंतर हे उलटं आहे. कलिंगड तयार होत आलं की, त्याचं वजन वाढतं आणि त्यामुळे ते जमिनीला टेकतं. ते ज्या भागात जमिनीला टेकतं तो भाग पिवळसर होतो. त्यामुळं हा पिवळा डाग असणारं कलिंगड हे उत्तम फळाचे लक्षण मानले जाते.

हा डाग जेवढा मोठा तेवढं कलिंगड उत्तम दर्जाचे मानले जाते. हाच जर डाग पांढऱ्या रंगाचा असेल तर कलिंगड व्यवस्थितपणे तयार नाही (किंवा कलिंगड जमिनीला टेकण्यापूर्वीच तोडले आहे) असा त्याचा अर्थ असतो. जेवढा गडद पिवळा (किंवा किंचित हलकी केशरी रंगाची झाक) असेल तेवढं ते उत्तम पिकलेले आहे असं समजतात.

 • कलिंगडाचा आकार

कलिंगडाचा आकार साधारणपणे अंडाकृती किंवा गोल असतो. पण आपण कधीकधी ओबडधोबड आकाराचे कलिंगडही  बघतो. कधीकधी कलिंगडाला मधूनच थोडा बाक आलेला असतो किंवा कलिंगडाचा मागचा किंवा पुढचा भाग खूप मोठा  झालेला दिसतो.  ज्या वेळी संपुर्ण फळाला समप्रमाणात सूर्यप्रकाश किंवा पाणी मिळत नाही तेव्हा त्याचा आकार असा ओबडधोबड किंवा विचित्र होतो किंवा मधूनच गोलाई वाढते. त्यामुळे एकसारख्या (अंडाकृती किंवा गोल) आकाराच्या कलिंगडाला प्राधान्य द्यावे.

 • कलिंगडातील पाणी

 कलिंगड एका हातात घेऊन, जेव्हा आपण वरच्या बाजूने कलिंगडावर थाप मारतो, तेव्हा ज्या हातात कलिंगड धरले आहे त्या हाताला कलिंगडातील पाण्यामुळे, कंपनं जाणवतात. कलिंगडातील पाण्याचे प्रमाण योग्य असल्याचे हे लक्षण असते. जर कलिंगडातील पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ही कंपने जाणवत नाहीत.

 • कलिंगडाचा देठ

 कलिंगडाच्या देठाकडच्या बाजूस नीट बघितलं तर एक लक्षात येईल की, संपुर्ण पिकलेल्या कलिंगडाच्या देठाचा भाग हा वाळलेला असून काळसर हिरव्या रंगाचा आणि कलिंगडाच्या बाजूला आत गेलेला किंवा खोलगट झालेला दिसतो. ह्याउलट कलिंगड जर कच्चं असताना तोडलं गेलं तर देठाचा रंग हिरवा राहतो आणि त्या भागात देठाचे टोक राहते.

 • कलिंगडाचा आवाज

जर आपण कलिंगड हातात घेऊन त्यावर थाप मारली आणि आपल्या हाताला कडक किंवा टणक लागले तर ते फळ कच्चे असते आणि त्याचा आवाजदेखील विशिष्ठ  प्रकारचा भरीव आवाज असतो . परंतू आपण थाप मारल्यानंतर आपल्या हाताला खूप टणक लागले नाही आणि आवाज पण हलका आला (म्हणजे तितकासा भरीव वाटला नाही) तर असे कलिंगड बिनधास्त घ्यावे.

 • कलिंगड खरेदीसाठी काही टिप्स :

 कलिंगड जर अत्यंत गडद हिरव्या रंगाचे आणि दिसायला डल असेल तर असे फळ दिसायला आकर्षक नसते परंतू ते पूर्ण पिकलेले असते आणि त्यामुळे असे फळ निवडावे.

 • एक खूप मोठं कलिंगड घेण्यापेक्षा २ छोटे/मध्यम आकाराचे घेतलेले कधीही चांगले. कारण चिरून ठेवलेल्या कलिंगडाला खूप पाणी सुटते आणि न चिरता फ्रीजमध्ये ठेवले तर खूप जागा अडून राहते.
 • कलिंगडाला भोक पडलेलं असेल तर असे कलिंगड घेऊ नये कारण त्यात हवा जाऊन फर्मेंटेशन सुरु झालेलं असतं.
 • कलिंगडाच्या बिया हा रसभंग करणारा प्रकार आहे. पण तरीही सीडलेस कलिंगड घेणं मला आवडत नाही. सीडलेस कलिंगड हे जेनेटीकली मोडीफाय करून बनवतात. त्यामुळे मला ते खायला नको वाटतं. (मला ह्यातलं फारसं कळत नाही, कदाचित त्यात अपायकारक काही नसेलसुद्धा फक्त मला ते आवडत नाही.)
 • कलिंगडाच्या फुलाच्या परागकणाला मधमाश्या स्पर्श करतात. जेव्हा त्या फुलाचे कलिंगडाच्या फळात रुपांतर होते तेव्हा अश्या कलिंगडावर हलक्या चॉकलेटी रंगाचे डाग/ठिपके दिसतात. अश्या प्रकारचे कलिंगड चवीला जास्त गोड असते.

तर हे सगळं झालं कलिंगडाच्या खरेदीविषयी. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि तुम्ही कलिंगड खरेदी करताना काय काय बघता ते कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा.

4 thoughts on “माझी कलिंगड खरेदी

 1. प्रिती होनकळस

  कलिंगडातील बिया उत्तम omega fatty acid देणारे स्त्रोत असल्याने त्या नक्कीच खाव्यात.

Leave a Reply to प्रिती होनकळस Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!